সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, July 31, 2011

चंद्रपूर शहर



देवेंद्र गावंडे      9822467714           
राज्याच्या एका टोकावर वसलेल्या चंद्रपूर शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा आहे. आता विविध उद्योगांनी गजबजलेले हे शहर आधी वेगळेच होते. गोंडकालीन राजवटीत ५३५ वर्षांपूर्वी राजे बल्लारशाहने या शहराची निर्मिती केली. या राजाने नजीकच्या बल्लारपुरातून त्याची राजधानी हलवण्याचा निर्णय घेतला आणि या शहराची स्थापना झाली. भला मोठा परकोट आणि त्याला पठाणपुरा, जटपुरा, बिनबा आणि अंचलेश्वर, हे चार मोठे दरवाजे, असे या शहराचे प्रारंभीचे स्वरूप होते. राजा आला, मग त्याच्यासोबत प्रजाही आली आणि हळूहळू हे शहर स्थिरावत गेले. त्या काळात आजसारखी राज्ये नव्हती, त्यांच्या सीमा नव्हत्या पण, ठराविक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख आणि प्रतिमा आरंभापासून मिश्र संस्कृतीची राहिली. राजाला गरज पडत गेली तेव्हा दक्षिणेतून वेगळी संस्कृती व भाषा जोपासणारे लोक येथे येत गेले आणि या शहराच्या लोकजीवनात नवनव्या गोष्टींची भर पडत गेली. गोंडराजे ब्रिटिशांनाच काय पण, मोगलांनाही कधी शरण गेले नाही. त्यामुळे या शहरावर कधीही मोगलांचा अंमल राहिला नाही. ब्रिटिशांनी मात्र लढाई करून ताबा मिळवला. अशीच एक मोठी लढाई परकोटाच्या अगदी बाहेर झाली. आज तेथे रामबाग नर्सरी व वनखात्याची कार्यालये आहेत. लढाईच्या पाऊलखुणा तेवढय़ा नाहीत.



सतराव्या आणि अठराव्या शतकात या शहराला मोठी संत परंपरा लाभली. निकालस महाराज, संत हयग्रीव, भोबडतुल्लाशाह, इनाशी मिया पापामिया, गोविंदस्वामी, संत दासोबा, गुलाबराव महाराजांचे शिष्य बाबाजी महाराज पंडित, अशी अनेक नावे आहेत. सर्वधर्माचा व सर्व विचारांचा आदर करणारे हे संत होते. त्यांची मंदिरे, समाधी स्थळे व दर्गे आजही आहेत पण, आधुनिकेतचा ध्यास धरणाऱ्या या शहराचे त्याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. आजही ही मंदिरे संत-वाणीची महती सांगतात पण, थोडा अपवाद वगळता कुणीही तिकडे फिरकत नाही. या मंदिरांचा जीर्णोध्दार व्हावा, असेही कुणाला वाटत नाही.



प्रारंभीची बरीच वष्रे या शहराचे स्वरूप परकोटापुरतेच मर्यादित होते. शहराच्या दोन्ही बाजूला वाहणाऱ्या इरई व झरपट या दोन नद्या आणि त्याच्या काठाने विकसित झालेल्या वाडय़ा यातून या शहरातील वस्तीने आकार घेतला. यातूनच मग जातीनिहाय मोहल्ले निर्माण झाले. परकोटाच्या टोकावर माळी मोहोल्ला, एका बाजूला तेली, शहराच्या मध्ये मालगुजार ब्राम्हण आणि मग आजूबाजूला विखुरलेला इतर समाज, असे या शहराचे स्वरूप होते. काळाच्या ओघात आता बरेच बदल झाले असले तरी परकोटाच्या आतील मोहल्ल्यांची रचना फारशी बदलली नाही. अगदी एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत माळय़ांनी भाजीपाला पिकवायचा आणि तेली समाजाने तेलाचे घाणे चालवायचे तसेच, व्यापारपेठेची सूत्रे सांभाळायची, अशीच रचना होती. त्यामुळे तेव्हाच्या चांद्याचा भाजीपाला आणि तेलघाण्या संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होत्या. आता सर्व बदलले आहे. एखाद दुसरा अपवाद वगळता या वाडय़ा नामशेष झाल्या आहेत. तेलाचे घाणे तर कधीचेच काळाच्या उदरात गडप झाले आहेत. जमिनीला भाव आल्याने वाडय़ा विकून व शहराभोवतीच्या शेतीला किंमत आल्याने हे समाज इतर व्यवसायात स्थिरावले. आता भाजीबाजारावर स्थलांतरितांचे नियंत्रण आहे तर, बाजारपेठ पूर्णपणे हिंदी भाषिकांच्या ताब्यात गेली आहे.




१९ मे १८६७ ला येथे नगर पालिकेची स्थापना झाली. त्यानंतर या शहराच्या विकासाने हळूहळू आकार घेतला. आता जेथे शहर पोलीस ठाणे आहे तेथे आधी कोतवाली होती. त्यातूनच पालिकेचा कारभार सुरू झाला. याच दशकात पालिकेची इमारत व टाऊन हॉल झाला. आता पालिकेची भव्य इमारत नाहिशी झाली आहे. त्या ठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे तर, पुढे नेताजीनगर भवन, असे नामकरण झालेला टाऊन हॉल दहा वर्षांपूर्वीच पाडण्यात आला. त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या सातमजली इमारतीत नेताजी सभागृह आहे पण, त्याचा वापर आता सार्वजनिक मुतारी म्हणून केला जातो! राजकीय नेत्यांच्या जाहीर सभांची हौस भागवणारा गांधी चौक शतकानुशतके या शहराचा केंद्रबिंदू राहिला. देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा या चौकाला महात्म्याचे नाव देण्यात आले. त्याआधी शहरात गोल बाजारात एक मैदान होते. स्वातंत्र्य लढय़ात लोकमान्य टिळकांची जंगी सभा येथे झाली तेव्हापासून त्याला टिळक मैदान, असे नाव पडले. आज हे मैदान लुप्त झाले आहे. तेथे भाजीबाजार बांधण्यात आला पण, आता तेथे गुरांचे साम्राज्य असते! तेथून भाजी व धान्याचा बाजार गंजवार्डात आला. आता तो तेथूनही हटला तरी या जागेची अवस्था जशीच्या तशी आहे.




अगदी स्वातंत्र मिळेपर्यंत हे शहर परकोटाच्या बाहेर गेले नव्हते. हद्द ओलांडली की, जंगल लागायचे. जटपुरा गेटच्या बाहेर ब्रिटिशांनी त्यांच्या कचेऱ्या सर्वात आधी उभारल्या. आता जेथे जिल्हा परिषदेची इमारत आहे तेथे डिस्ट्रिक्ट कौन्सिल होती. आजही ही इमारत कृषी खात्याच्या वापरात आहे. आता जेथे प्रशासकीय इमारत आहे तेथे उसाचा मोठा घाणा होता. लोक रात्री या भागात जायला घाबरायचे. मग हळूहळू इकडे वस्ती होत गेली. आताचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे; घर नागपूर मार्गावरचे याच काळातले. १९५८ ला या भागात जनता कॉलेज दिवं. श्रीहरी जीवतोडे यांनी सुरू केले आणि उच्च शिक्षणाची संधी मिळायला सुरुवात झाली. लोकांचा वावर वाढला आणि तेव्हापासूनच परकोटाच्या बाहेरची वस्ती वसायला सुरुवात झाली. आता सुमारे एक लाख लोकवस्तीचा तुकूम परिसर तेव्हा देवई गोविंदपूर हे तलावाकाठी वसलेले लहानसे गाव होते. स्वातंत्र्य लढय़ात मा. सा. कन्नमवारांचे नेतृत्व या शहरात उदयास आले आणि मग विकासाच्या वाटचालीवर अनेक स्थित्यंतरे वेगाने घडू लागली. त्यांनी उड्डाणपूल तयार करून घेतला. त्यामुळे तुकूमचा भाग शहराला जोडला गेला. त्यांच्याच प्रयत्नाने विविध उद्योग या भागात येऊ लागले आणि मग शहराचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात झाली.




शहरातले महाकाली मंदिर हे अनादी काळापासून शहराचे श्रध्दास्थान. तेथे भरणाऱ्या यात्रेला योग्य स्वरूप देण्यात कन्नमवारांचा मोठा वाटा होता. एकेकाळी खून, मारामाऱ्या व तमाशातील दौलतजादीने गाजलेली ही यात्रा आता पूर्णपणे कोमेजून गेली आहे. दरवर्षी लाखो भाविक येतात आणि दर्शन आटोपून परत जातात. १९५४ पर्यंत या शहराचे नाव चांदाच होते. ब्रिटिशांनी उच्चारासाठी सोयीचे जावे म्हणून चांदा शब्द निवडला. कन्नमवारांनी पाठपुरावा करून ‘चांदा’चे चंद्रपूर करून घेतले. १९७५ ला येथे औष्णिक वीज केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हा तुकूमच्या पुढे घनदाट जंगल होते. नऊ वर्षांत या केंद्राची उभारणी झाली आणि या भागाचा पूर्णपणे कायापालट झाला. शतकभरापूर्वी हे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जायचे. दोन नद्या व त्यात मध्ये तलाव, असे तेव्हाचे स्वरूप होते. घुटकाळा, तुकूम, लाल तलाव, लेंडाळा, कोनेरी व रामाळा अशी तलावांची मोठी यादीच होती. आता काळाच्या ओघात रामाळा वगळता सारे तलाव बेपत्ता झाले आहेत. घुटकाळा, तुकूम तलावाच्या भागात दाट लोकवस्ती आहे. तेथे तलाव होता, हे आज कुणाला सांगितले तर आश्चर्य वाटेल. काही दशकापूर्वी घुटकाळा भागात पालिकेने विकासकामे हाती घेतली तेव्हा या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या भूमीपूजनाचा दगड एका घरी धुण्याचा गोटा म्हणून सापडला. दीडशे एकरात असलेला रामाळा तलाव तेवढा वाचला आहे पण, त्याच्यावरही चारही बाजूने अतिक्रमणाचा मारा होतच आहे. लेंडाळा व लाल तलाव कुठे होते, हे अनेक जुन्याजाणत्यांनाही ठावूक नाही. कारण, त्यावर उभ्या राहिलेल्या वस्त्यांची नावे बदलली आहेत.




आता हे शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जात असले तरी उद्योग व या शहराचा संबंध अतिशय जुना आहे. एकेकाळी हे शहर काच, लाकूड व कोळशाच्या उद्योगांसाठी प्रसिध्द होते. पटेल कुटुंबाचा एस.जी.ग्लास वर्क्‍स हा अतिशय जुना कारखाना. आता महाकाली मंदिराच्या समोरच्या भागात त्याचे भग्न अवशेष तेवढे उरले आहेत. लाकडाचा व्यापार आता शासनाच्या हातात तर, कोळसा उद्योग केंद्राच्या मालकीचा झाला आहे. उद्योगांची परंपरा अतिशय जुनी असल्याने स्थलांतरितांचा मोठा ओघ या शहराकडे कायम वळत राहिला. देशाच्या कानाकोपऱ्यातून या शहरात शेकडो लोक रोजगार व व्यापाराच्या निमित्ताने आधीपासून येत राहिले. यातील बहुसंख्य येथेच स्थायिक झाले आणि मिश्र लोकवस्तीचे हे शहर दिवसेंदिवस जास्त अठरा पगड जाती समूहांचे होत गेले. या शहराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. एवढेच नाही तर, त्यांना राजाश्रय सुध्दा दिला. परका, बाहेरचा असा वाद येथे कधी निर्माण झाला नाही. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हाती सामावलेल्या आहेत. कोळसा व्यापार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अगदी कफल्लक झालेला पण, डोके असलेला माणूस या शहरात आला तरी काही वर्षांत कोटय़धीश बनतो. अशी असंख्य उदाहरणे आहेत. मिश्र संस्कृतीमुळेच या शहराला कधीही दंगलीचे गालबोट लागले नाही. दक्षिण आणि उत्तर भारतीय संस्कृतीचा सुंदर मिलाफ बघायचा असेल तर या शहराएवढे दुसरे चांगले ठिकाण नाही. यामुळेच येथील भाषेला एक वेगळय़ा प्रकारचा बहुश्रृतपणा लाभलेला आहे. या शहरात विसाव्या शतकात अतिशय लोकप्रिय असलेली ‘गादी’ नावाचा प्रकार आता संपुष्टात आला आहे. गादी म्हणजे चार मान्यवरांनी एकत्र गप्पा करण्याचे ठिकाण. जुन्या जाणत्यांच्या आठवाप्रमाणे आधी नुराभाईची गादी अतिशय प्रतिष्ठेची होती. तेथे बसायला मिळणे मानाचे समजले जायचे. आता त्या ठिकाणी यंग इंडिया बुक स्टॉल आहे. नंतर छगनलाल खजांची व भास्करवारांची गादी काही दशके लोकप्रिय होती. साऱ्या शहराचे राजकारण या गाद्यांवरून चालायचे. यातून मोठे झालेले विलास मुत्तमेवार आजही राजकारणात सक्रिय आहेत. आता आधुनिकतेच्या काळात या गप्पा बंद पडल्या आहेत.




मोगरे व हजारेंची मिठाईची दुकाने आणि सेवासदन व मिलन हॉटेल हे एकेकाळी शहरातील प्रसिध्द ठिकाणे होती. मिलन हॉटेलने तर कॉलेजकुमारांची एक पिढीच घडवली. आता ही सारी प्रतिष्ठाने बंद पडली आहेत. असाच जुना महिमा सांगणारे गणपत बालाजी साळवे हे स्टीलचे दुकान अजूनही सुरू आहे. याच दुकानाच्या बाजुला हमालांचा गणपती बसायचा. काळाच्या ओघात हमाल बदलत गेले तरी त्यांचा गणपती कायम आहे. हे शहर फार उत्सवप्रिय कधीही नव्हते. मात्र, एकेकाळी पतंग उडवण्याचा शौक शहरात सामूहिकपणे साजरा व्हायचा. आता राजकारणात सक्रिय असलेले पोटदुखे व पुगलिया यांचे पतंग उडवणे अगदी शाही असायचे. नंतर ही पतंगबाजी थांबली व राजकारणातील सुरू झाली. शोभाताई फडणवीस, हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार ही त्यापुढच्या पिढीतील अग्रेसर नावे. बदलत्या काळासोबत हे शहर सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस समृध्द व प्रगल्भ होत गेले. शास्त्रीय गायन, साहित्य संमेलने, विविध कार्यक्रम यांची रेलचेल सतत वाढत गेली. याला प्रामुख्याने हातभार लावला तो शांताराम पोटदुखे, मदन धनकर, श्रीहरी जीवतोडे व बोझावारांनी. सुरेश व्दादशीवारांनी तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचे नेतृत्व काही काळ सांभाळले. या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली अनेक नव्या सांस्कृतिक संघटना या शहरात स्थिरावल्या. पोटदुखे यांनी शिक्षण क्षेत्रात विणलेले जाळे हा विसाव्या शतकातील लक्षणीय बदल म्हणावा लागेल. यामुळे हे शहर शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाऊ लागले. काळाच्या ओघात जुन्या काळी नावाजलेल्या काही शाळांची पार रया गेली. शैक्षणिक बदल न स्वीकारणे व संस्थागत भांडणे यामुळे या शाळांची अशी दशा झाली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्राची बेमालूम सांगड घालत शहराला एक वेगळी श्रीमंती मिळवून दिली. याच शतकात व्यंगचित्रकार व काष्ठशिल्पी मनोहर सप्रे यांचे नाव देशपातळीवर पोहोचले. वाढत्या उद्योगांमुळे या शहराला पडलेला प्रदूषणाचा विळखा, हेही एक मोठे स्थित्यंतर म्हणावे लागेल. शहरात एवढे बदल घडूनही परकोटाच्या आतील भाग व बाबूपेठचा परिसर अजूनही जुन्या वैभवांची साक्ष पटवणारा आहे. दोनशे वर्षांच्या इमारती आजही या शहरात दिसतात. बाबूपेठ या शहराचा भाग बनले पण, अजूनही तेथील घरांची रचना जुनीच आहे. फार पूर्वी बाबूपेठमधून या शहरात येऊन राहण्याची एक फॅशन होती. आजही ती कायम आहे.




आजूबाजूच्या परिसरात औद्योगिकदृष्टय़ा प्रगत होऊन सुध्दा हे शहर मात्र त्या अर्थाने विकसित झाले नाही. आजही या शहराचा कारभार केवळ गांधी व कस्तुरबा या दोनच रस्त्यावर चालतो. परकोटाच्या बाहेर शहर वाढले पण, तिकडे सर्व सोयी निर्माण करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. त्यामुळे काही भाग वगळता वाढलेली वस्ती बकाल राहिली. आज या शहरातील चाळीस टक्के लोक झोपडपट्टय़ांमध्येच राहतात. यातील काही भागात साधा फेरफटका मारला तरी वेगळय़ात शहरात फिरत असल्याचा भास अनेकदा होतो. इतकी भिन्न संस्कृती या भागात जोपासली गेली आहे. एकीकडे आत्यंतिक श्रीमंती व दुसरीकडे टोकाची गरिबी, असे सरळ सरळ दोन भागात या शहराचे विभाजन झालेले आहे. काही दशकापूर्वी या शहरात सामूहिक जबाबदारीचे भान बाळगणारे अनेक जण होते. आता अशा जबाबदारीचा देखावा उभा करणारे जास्त झाले आहेत. त्यामुळे या शहराच्या विकासाचा एकजिनसी विचार मागे पडत चालला आहे. मिश्र संस्कृतीतून येणारी परकेपणाची भावना कदाचित याला कारणीभूत असेल. मूळात या संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र आलेला समाजातील मोठा वर्ग राजकीय व सामाजिक जबाबदार बांधीलकीपासून स्वत:ला दूर ठेवत आला आहे. गेल्या तीन दशकात ही बाब ठळकपणे दिसून आली. त्यातून निर्माण झालेली पोकळीच या शहराचे स्वरूप बकाल करत गेली आहे, हे सत्य कटू आहे पण, हेच वास्तव आहे.

शहरातले महाकाली मंदिर हे अनादी काळापासून शहराचे श्रध्दास्थान. तेथे भरणाऱ्या यात्रेला योग्य स्वरूप देण्यात दिवं. कन्नमवारांचा मोठा वाटा होता. एकेकाळी खून, मारामाऱ्या व तमाशातील दौलतजादीने गाजलेली ही यात्रा आता पूर्णपणे कोमेजून गेली आहे. दरवर्षी लाखो भाविक येतात आणि दर्शन आटोपून परत जातात. १९५४ पर्यंत या शहराचे नाव चांदाच होते. ब्रिटिशांनी उच्चारासाठी सोयीचे जावे म्हणून चांदा शब्द निवडला. मा.सा. कन्नमवारांनी पाठपुरावा करून ‘चांदा’चे चंद्रपूर करून घेतले. १९७५ ला येथे औष्णिक वीज केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हा तुकूमच्या पुढे घनदाट जंगल होते. नऊ वर्षांत या केंद्राची उभारणी झाली आणि या भागाचा पूर्णपणे कायापालट झाला.




या शहरात विसाव्या शतकात अतिशय लोकप्रिय असलेली ‘गादी’ नावाचा प्रकार आता संपुष्टात आला आहे. गादी म्हणजे चार मान्यवरांनी एकत्र गप्पा करण्याचे ठिकाण. जुन्या जाणत्यांच्या आठवाप्रमाणे आधी नुराभाईची गादी अतिशय प्रतिष्ठेची होती. तेथे बसायला मिळणे मानाचे समजले जायचे. आता त्या ठिकाणी यंग इंडिया बुक स्टॉल आहे. नंतर छगनलाल खजांची व भास्करवारांची गादी काही दशके लोकप्रिय होती. साऱ्या शहराचे राजकारण या गाद्यांवरून चालायचे. आता आधुनिकतेच्या काळात या गप्पा बंद पडल्या आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.