সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 14, 2015

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

चंद्रपूर-  चंद्रपुरातील जटपुरा गेटच्या वाहतुकीची कोंडी फोडण्याचा श्रीगणेशा शेवटी शनिवारी गेटजवळच आयोजित जनसभेने झाला. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जटपुरा गेटची वाहतूक सुरळीत करण्याचे दीर्घकालीन, तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय चर्चिले गेले. तात्पुरत्या उपायांवर लगेच कार्यवाही करण्याचे निर्देशही मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांना दिले.
मुख्य रस्त्याचे पथमार्ग लहान करणे, रामनगरच्या वनवेबाबत विचार करून तशा सूचना मागवणे, नो पार्किंग झोन तयार करून पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून देणे, शहरातून बाहेर पडणारे अन्य वळण मार्ग शोधणे, रस्त्याचे दुभाजक तोडून ते वाहतुकीला सुव्यवस्थित होईल, असे करणे आदी विषयांवर सूचना देण्यात आल्या. या सार्‍या बाबींवर विचार करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. 
शिवाय दीर्घकालीन उपायायोजना करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या प्रमुखांना येत्या सोमवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत पत्र लिहून त्यांना पाचारण करणे आणि प्रत्यक्ष जटपुरा गेट दाखवणे, त्यांच्यासोबत ही समस्या सोडविण्यासाठी चर्चा करणे, असे ठरले. 
सुधीर मुनगंटीवार हे स्वत: या कामासाठी पुढाकार घेणार आहेत. ते म्हणाले, जटपुरा गेट तोडणे हा काही शाश्‍वत मार्ग नाही. कारण किल्ला ही या शहराची ओळख आहे. या मार्गावरची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सारे मार्ग शोधून त्यावर काम करावे लागेल. रस्त्यांवरील विजेचे खांब काढून वाहिन्या भूमिगत कशा करता येईल, ते बघावे लागेल. 
तत्पूर्वी, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण यांनी, गेटच्या शेजारची भिंत तोडण्यासाठी पुरातत्व विभागाला परवानगी देण्यास काही हरकत नसावी. कारण आम्ही या वास्तूचे विद्रुपीकरण करीत नसून, उलट त्याचे सौंदर्यीकरणच करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर ती परवानगी घ्यावी, अशी सूचना केली. तर, डॉ. गोपाल मुंधड यांनी, जटपुरा गेटवरील वाहनांची कोंडी लक्षात घेता जटपुरा गेटची भिंत तोडावी आणि मनपाच्या मालकीच्या दुकानलाईनचा काही भाग तोडून त्या दुकानदारांना मागचा भाग देण्यात यावा, असे सूचवले. विनोद दत्तात्रय यांनी, अद्ययावत स्थापत्य तंत्रज्ञानाचा वापर करून तुकड्यामध्ये गेट उचलून बाजूला उभा करावा, जेणेकरून तो रस्त्याच्या मधे येईल आणि सुुंदरही दिसेल, असे सांगितले. मेघनाद जानी, तसेच सदानंद खत्री यांनी, जटपुरा गेटची भिंत तोडून दहा व चौदा फूट रुंदीचे दोन रस्ते तयार करावे. गेटच्या मधून चारचाकी जातील आणि उर्वरित रस्त्यावरून दुचाकी आणि ऑटो जातील, अशी व्यवस्था तयार करावी, असे सूचवले. रामनगर माार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे आणि या मार्गाला वनवे करावे, अशीही सूचना आली. या सार्‍या सूचनेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष गेट आणि रस्त्याची पाहणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.