चंद्रपूर मेडिकल कॉलेजचा दुय्यम मुकाबला
देवनाथ गंडाटे
अनेक वादविवादानंतर चंद्रपूर
मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी
जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न झाले आणि एक सप्टेंबर हा दिवस चंद्रपूर-गडचिरोली
जिल्ह्यातील नागरिकांसाठी "मेडिकल दिन' ठरला. या बहुप्रतिक्षीत वैद्यकीय
महाविद्यालयाला एक सप्टेंबरला प्रारंभ झाला.
महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी
अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. गेल्या चार-पाच वर्षांत या मेडिकल कॉलेजसाठी अनेक
पक्षांनी प्रयत्न केले. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी आधीपासूनच प्रश्न लावून
धरला होता. प्रहारचे प्रदीप देशमुख यांनीही विविध आंदोलने, उपक्रमाच्या माध्यमातून
शासनाचे लक्ष वेधले. तात्पूर्ती मंजूरी जेव्हा मिळाली होती, तेव्हा कॉलेज कुठे
असावे, यावरून वाद सुरू झाला होता. भलेही कॉलेज चंद्रपुरला होणार होते. पण, ते
पूर्वेला की दक्षिणेला यावरूनच "भूवाद' रंगला. काहीजण दाताळा मार्गावरील जागेसाठी
हट्ट धरून होते. काहीजण वनराजीक महाविद्यालयाच्या जागी, तर काही बल्लारपूर
मार्गावरील डम्पिंग यॉर्डच्या जागेला पसंती दिली होती.
सर्वांच्या प्रयत्नांना
यश आले असतानाच निकष पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करून वैद्यक अधिकाऱ्यांनी
नामंजुरी दिली. तेव्हा मेडिकलची आशाच मावळली. त्यामुळे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना
न्यायालयाची पायरी चढावी लागली. अखेर न्याय मिळाला. जो तो श्रेय लाटण्याचा प्रयत्न
करू लागला. मात्र, सत्य कुठे लपत नाही, हेदेखील स्पष्ट झाले. आता मेडिकल कॉलेज
प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मेडिकल कॉलेजचे बारसे व्हावे, असे अनेकांना वाटते.
त्यासाठी अनेक पुढाऱ्यांची नावे पुढे येत आहे. त्यामुळे नामकरणाचा वाद पुढे
येण्याची शक्यता आहे. काहींना माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार, राणी हिराई,
फुले- आंबेडकर, सावित्रीबाई फुले, तर काहींनी संताजी जगनाडे महाराजांचे नाव रेटून
धरले. प्रत्येक नामामागे अनेकांच्या भावना, आदर आणि प्रेम जुळला आहे. त्यामुळे अनेक
नावातून एक नाव निश्चित करताना काहींच्या भावना दुखावतील.त्यावर सामूहिक भावनेचा
आदर जोपासण्याची गरज आहे. अन्यथा मेडिकलवरून दुय्यम मुकाबला होईल. त्यामुळे
चंद्रपूर मेडिकल कॉलेज हेच नाव संयुक्तिक ठरेल, असेही वाटते.