সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 22, 2015

बैलबाजाराचे कोदामेंढी

बैलबाजाराचे कोदामेंढी
गावात हवे उद्योग, रुंद रस्ते, पिण्याचे पाणी

कोदामेंढी हे गाव रामटेक-भंडारा मार्गावरील सूर नदीच्या काठावर वसलेले आहे. ब्रिटिशकालीन राजवटीतील हे गाव बाजारपेठ प्रसिद्ध होते. पूर्वी येथे मुंबई येथून वॅगनने किराणा माल यायचा. पूर्वी गुरुवार व शुक्रवारी दोन दिवस बाजार भरायचा. येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांना राहण्यासाठी येथे विडी कारखान्यात सोय होती. येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. कोदा म्हणजे बैल आणि मंडी म्हणजे बाजार. या बाजारपेठेवरून गावाला कोदामंडी असे नाव पडले. कालांतराने कोदामंडीचे सुधारित कोदामेंढी असे झाले. येथे ब्रिटिशकालीन पोलिसठाणेसुद्धा होते. पूर्वी येथे 149 गावांसाठी एकमेव टपाल कार्यालय होते. हाकी व केसरीमल पोरवाल अशी दोन विडीचे नावाजलेले कारखाने होते. येथील सोनकेळी प्रसिद्ध होती. तशी नोंद पूर्वीच्या शालेय भूगोलाच्या पुस्तकात नोंद होती. हातमागाचा व्यवसाय चालायचा. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

दृष्टिक्षेपात ः
ग्रामपंचायत स्थापना ः 1948
लोकसंख्या ः 4,123
वॉर्ड ः 4
भौगोलिक क्षेत्रफळ ः 745.59 हे. आर.
वनविभाग व झुडपी जंगलाची जागा ः 73.57 हे.आर.
कनिष्ठ महाविद्यालय ः 1
प्राथमिक शाळा ः 2
माध्यमिक शाळा ः 1
खासगी कॉन्व्हेंट ः 3
ग्रामपंचायत कर्मचारी ः 4
अंगणवाडी ः 5
हातपंप ः 12
राष्ट्रीयीकृत बॅंक ः 1
सहकारी पतसंस्था ः 3
टपाल कार्यालय ः 1
प्राथमिक आरोग्यकेंद्र ः 1
पशुवैद्यकीय दवाखाना ः 1

समस्या यांना सांगा ः
सरपंच, प्रतिभा निकुरे ः 9730827980
ग्रामविकास अधिकारी, प्रल्हाद मुंढे ः 7507454827
ग्रामपंचायत कार्यालय ः 07115-232029
तहसीलदार शिवराज पडोळे ः 7798350538
खंडविकास अधिकारी, सी. व्ही. आदमने ः 9890296796
कनिष्ठ अभियंता, श्रीरंग मुत्तेपवार ः 7875024909
पोलीस निरीक्षक, अरुण गुरनुले ः 9130494100
खासदार, कृपाल तुमाने ः 9823288322
आमदार चंद्रशेखर बावनकुळे ः 9049444444
वैद्यकीय अधिकारी झेड.ए.ए. अली ः 9823183202
वैद्यकीय अधिकारी, राजू मेश्राम ः 9423110318
विद्युत वितरण कंपनी, अरोली ः 7875760280
पोलिस ठाणे, अरोली ः 07115-235400
प्राथमिक आरोग्यकेंद्र ः 07115-232116

संत महात्म्यांचे दर्शन ः
कोदामेंढी गावाला तुकडोजी महाराज, गुलाबबाबा, सती अनसूया माता, खराटे महाराज आदी संत महात्म्यांचे दर्शन लाभलेले आहे. त्यामुळे संतनगरी असेही म्हणायचे.

बसस्थानकाचे विस्तारीकरण
बसस्थानक परिसरात अवैध वाहतूक जोरात आहे. बसस्थानक परिसरात जीप, ट्रॅक्‍स, काळीपिवळी उभ्या असतात. त्यामुळे एसटी बस वळायला जागा राहत नाही. बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. रस्त्यावरील झाडे, पाणठेले आणि दूरसंचार विभागाचा खांब असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. बसस्थानक चौकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रवाशांसाठी प्रसाधनगृहाची आवश्‍यकता आहे. बसस्थानक परिसरात पावसाळ्यात तळे साचते. त्यामुळे सिमेंट कॉंक्रिटचे प्लॅटफॉर्म हवे.

औद्यागिक प्रकल्प हवा
गावालगत झुडपी जंगल, वनविभाग आणि सरकारी पडीत जमिनीचे क्षेत्र असलेली 300 हे. आर. रिकामी पडीत जागा आहे. या जागेवर एखादा औद्योगिक प्रकल्प उभारल्यास सुशिक्षित बेरोजगार कामाला लागतील. या भागाच्या विकासाच्या दृष्टीने औद्योगिक प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाव मिळेल. व्यावसायिक व मजूरवर्गांना मोबदला अधिक मिळेल. नितीन गडकरी पालकमंत्री असताना कागदी खरडा कंपनी उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, तेही हवेत विरले. आता केंद्रीय मंत्री असल्याने एखादा औद्योगिक प्रकल्प उभारतीलल, अशी आशा आहे. औद्योगिक प्रकल्प निर्माण झाल्यास या भागाचा कायापालट होईल. वेगवेगळे उद्योग भरभराटीला येतील. बेरोजगारीचा वाढलेला उच्चांक कमी होईल.

स्मशानघाटाचे सौंदर्यीकरण
स्मशानघाटावर अंत्यसंस्काराकरिता मृतदेह नेताना नरकयातना भोगाव्या लागतात. स्मशानघाट परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दुर्गंधीयुक्‍त भागातच अंत्यसंस्कार करावे लागते. दिवाबत्तीची सोय नसल्याने रात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी गैरसोय होते. येथे पिण्याचे पाणी, बसण्याकरिता आसन, शेड, सौंदर्यीकरणाची गरज आहे.

सुसज्ज आरोग्यकेंद्र
कोदामेंढी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात अरोली, रेवराल, धानोली व कोदामेंढी "ब' या चार उपकेंद्रांचा समावेश होतो. परिसरातील जवळपास 26 हजार लोकसंख्या असलेल्या गावांच्या अंतर्गत येथील आरोग्यकेंद्रात सुविधेचा अभाव दिसून येतो. 25 ते 30 गावांतील रुग्ण येथील आरोग्यकेंद्रात तपासणी व औषाधोपचाराकरिता येत असतात. येथील आरोग्यकेंद्रात आवश्‍यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना रेफर टु भंडारा किंवा नागपूर करावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा तर खर्च होतोच. पण, जीव हाती लागेल याचाही नेम नसतो. तसे बरेचदा घडले आहे. त्याकरिता येथे एक्‍स-रे क्‍लिनिक सेंटर, सीटी स्कून मशीन, गर्भावस्थेत बाळाची स्थिती जाणून घेण्याकरिता अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, कमी वजनाच्या बाळाला वाचविण्याकरिता फोटोथेरपी युनिट, ब्लड बॅंक युनिट आवश्‍यक आहे. पॅथॉलॉजी लॅब आहे. पण, सर्वच प्रकारच्या तपासण्या होत नसल्याने नमुन्याचा रिपोर्ट येईपर्यंत वाट बघावी लागते. त्याकरिता सर्वच तपासण्या होतील, अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्याकरिता यंत्रसामग्री लावणे महत्त्वाचे आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया होते. पण, सिझरिंग असल्यास गरोदर मातेला रेफर करावे लागते. त्यामुळे ती सुविधा येथे हवी. पिण्याच्या पाण्याकरिता मोठे वॉटर फिल्टर, वॉर्ड वॉर्मर, सोलर पथदिवे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला चेकर, वृक्षलागवड, उद्यानाचे सौंदर्यीकरणाची गरज आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. कामाचा ताण बघता तीन वैद्यकीय अधिकारी आणि खाटांच्या संख्येत वाढ व्हावी. रामटेक-भंडारा मार्गावरील या भागात नेहमीच अपघात घडत असतात. अशावेळी गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास रुग्णांना रेफर टू भंडारा किंवा नागपूर असे हलविण्यात येते. त्याकरिता येथे पूरक सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्यांचा जीव वाचू शकेल.

उपबाजाराची स्थापना व्हावी
येथील बाजारपेठ जुनी आहे. दूरवरून व्यापारी येतात. धान, मिरची बरोबरच बागायती फळे, पालेभाज्याचे उत्पादन होते. शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि बाजारपेठेच्या दृष्टीने येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असायला पाहिजे. गुरुवारला येथे आठवडीबाजार भरतो. येथे उपबाजार झाल्यास व्यापारी व शेतकऱ्यांना सोयीचे होईल.

नायब तहसील कार्यालय
येथून 25 किलोमीटर अंतरावर मौदा येथे तहसील कार्यालय आहे. शासकीय कामकाजांकरिता व प्रमाणपत्रांकरिता लोकांना तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात. त्याकरिता लोकांचा वेळ आणि पैसा अधिक खर्ची होतो. कोदामेंढी येथे नायब तहसील कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांची सोय होईल.

एच. पी. गॅसधारकांची लूट
येथे तिवारी गॅस एजन्सी कामठीचे जवळपास 500 व कोचे गॅस एजन्सी भंडाराचे 250 एच. पी. गॅसधारक आहेत. मात्र, येथे एच. पी. गॅस सिलिंडरचे वाहन येत नसल्याने गॅसटंचाई निर्माण होते. दलालांच्या माध्यमाने गॅस सिलिंडरची गाडी बोलाविण्यात येते. त्याकरिता एका सिलिंडरमागे 80 ते 100 रुपये ग्राहकांना अधिकचे मोजावे लागतात. नियमानुसार एच. पी. गॅस वितरकाने सिलिंडर घरपोच किंवा गावात तरी गाडी आणावी जेणेकरून एच. पी. गॅसधारकांची लूट होणार नाही. सिलिंडर संपल्यास सात दिवसांनंतर दलालाच्या माध्यमाने सिलिंडरची गाडी येत असल्याने ग्राहकांना अधिकच मनस्तःप सहन करावा लागत आहे.

वाचनालय बंद
गावात एकमेव वाचनालय आहे. मात्र, तेही नियमित सुरू राहत नसल्याने वाचक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. वाचनालयात आवश्‍यक वृत्तपत्रे तसेच महत्त्वाची पुस्तके उपलब्ध नसल्याने तयारी कशी करावी, असा प्रश्‍न त्यांना सतावतो. गावाच्या दृष्टीने वाचनालय नियमित सुरू असायला पाहिजे आणि आवश्‍यक वृत्तपत्रांबरोबरच पुस्तके व स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता पुस्तकांचा साठा हवा.

क्रीडांगणाचा अभाव
गावात क्रीडांगण नसल्याने बालकांचा भौतिक कलागुणांचा विकास खुंटत चालला आहे. पूर्वी येथील खेळाडू ज्या मैदानावर खेळायचे ते मैदान भूखंड दलालाच्या घशात गेले आहे. खेळण्याकरिता मैदान नसल्याने येथील बालक व खेळाडू इतरत्र फिरताना दिसतात. ज्यांच्या मनात खेळण्याची आवड आहे आणि खेळाडू बनून देशपातळीवर नाव कमाविण्याचे स्वप्न आहेत ते साकारू शकत नाहीत.

ले-आउटवर सुविधेचा अभाव
गावात तीन ले-आउट पडलेले आहेत. भूखंडाची विक्री करताना व्यावसायिकांनी नानातऱ्हेची आमिषे दाखविली. भूखंडाची विक्री होऊन कालावधी लोटला. मात्र, ते ले-आउट ओसाड दिसत आहेत. येथे पाण्याची सुविधा, वीजपुरवठा, रस्त्यांची सुविधा झालेली नाही.

तलावाचे सौंदर्यीकरण
गावात एकमेव तलाव आहे. मात्र, गावातील सांडपाणी तेथे सोडले जाते. तलावाला जंगलाचे साम्राज्य आहे. या तलावाचे खोलीकरण करुन सौंदर्यीकरण व्हावे. नागरिक फिरायला येतील बालकांना मनसोक्‍त आनंद लुटता येईल.

रेल्वेचे विस्तारीकरण
येथून खात, रेवराल, रामटेक रेल्वेस्थानक अनुक्रमे बारा, सात आणि पंचवीस किलोमीटर अंतरावर आहेत. मुंबई-हावडा रेल्वे लाइन खात व रेवराल स्टेशन येथून गेली आहे. रामटेक येथून अरोली, कोदामेंढीला जोडून खात किंवा वरठी (भंडारा रोड) रेल्वे स्टेशनला रेल्वेलाइन जोडल्यास या मार्गावरील दोनशेच्या जवळपास गावांचा संपर्क येईल. या भागात मिरची, धान आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कोदामेंढी गावालगत रेल्वे लाइनचे विस्तारीकरण झाल्यास व्यापारी व शेतकऱ्यांना माल वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये नेण्याकरिता सोयीचे होईल. त्याचप्रमाणे येथील उद्योगधंद्यामध्ये झपाट्याने वाढ होईल.

व्यायामशाळेत अपुरे साहित्य
येथे व्यायामशाळेची इमारत आहे. पूर्वी साहित्यसुद्धा होते. पण, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण साहित्य चोरीला गेलीत. जिल्हा क्रीडा विभागामार्फत साहित्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र, समाधानकारक साहित्य नाहीत. व्यायामशाळेत साहित्याचा पुरवठा करून त्यावर योग्य देखरेख व नियोजन असायला पाहिजे.

जनता तहानलेलीच
गावात एक लाख व दहा हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याचे दोन जलकुंभ आहेत. मात्र, अजूनही वॉर्ड क्र. 4 व 2 मध्ये पाण्याचा पुरवठा होत नसल्याने येथील जनता तहानलेलीच आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 37 लाखांच्या पाण्याच्या विहिरीचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासेल. दलितवस्ती योजनेअंतर्गत वॉर्ड क्र. 4 करिता स्वतंत्र पाण्याची टाकी बनायला पाहिजे. जेणेकरून पाण्याची टंचाई भासणार नाही. गावात आजही शेवटच्या टोकापर्यंत आणि उंचसखल भागात नळयोजनेचे पाणी पोहोचत नाही.

पदवीचे अभ्यासक्रम
गावात जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. येथे परिसरातील 25 खेड्यापाड्यांतील विद्यार्थी येतात. केवळ कला शाखेचे अभ्यासक्रम असल्याने वाणिज्य व विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते. वेळ आणि पैसा अधिक खर्ची होतो. ग्रामीण भागातील पालकांना ते झेपावत नाही. नाईलाजास्तव कला शाखेच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घ्यावा लागतो. येथील महाविद्यालयात वाणिज्य, विज्ञान शाखेसह पदवीचे अभ्यासक्रम आवश्‍यक आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची व व्याख्याताची पदे रिक्त आहेत.
-----------------
नागरिकांच्या अपेक्षा ः
गावांत आणखी एक राष्ट्रीयीकृत बॅंक, बालकांसाठी क्रीडांगण, बालउद्यान, नायब तहसीलदार कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार, शेतकऱ्यांच्या हितासाठी 16 तास थ्री फेज वीजपुरवठा आणि सूर नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधायला पाहिजे.
- उषाताई बावनकुळे, तनिष्का गटप्रमुख

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, व्याख्याता व कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे तातडीने भरण्यात यावी. येथे सेमी इंग्रजीबरोबरच वाणिज्य व विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम सुरू व्हायला पाहिजे.
- विष्णू बावनकुळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती

गॅस सिलिंडरची घरपोच सुविधा मिळावी. प्राथमिक आरोग्यकेंद्रात महिला स्त्रीरोगतज्ज्ञ, औषधशास्त्रीय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांचा बागायती माल साठवणूक करण्याकरिता शासकीय शीतगृह हवे.
- खुशाल शिवणकर, तरुण युवक

पूर्वी गावात दोन विडीचे कारखाने होते. त्यामुळे हजारो कामगारांना रोजगार होता. गावालगत झुडपी जंगलाची रिकामी जागा आहे. तिथे औद्योगिक प्रकल्प उभारावा. औद्योगिक प्रकल्प निर्माण झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल.
- आनंदराव श्रावणकर, माजी सरपंच

भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीला ओलित करण्याकरिता पाण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे. त्याकरिता थ्री फेज विद्युत 16 तास मिळाल्यास मोटारपंप चालू शकेल. भारनियमन प्रथा बंद करावे.
- उत्तम मेश्राम, तालुका उपाध्यक्ष युवा सेना

येथील महाविद्यालयात वाणिज्य व विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम सुरू व्हायला पाहिजे. त्याचबरोबर पदवीचे अभ्यासक्रमाकरिता वरिष्ठ कॉलेज उघडल्यास गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना सोयीचे होईल.
-प्रकाश मेश्राम, माजी उपसरपंच

बससथानकावर सिमेंट कॉंक्रिटचे प्लॅटफॉर्म आवश्‍यक आहे. स्मशानघाट, पाणीपुरवठा, वीज, औद्योगिक प्रकल्प आदींसारखे कामे प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात पाठपुरावा झाल्यास प्रश्‍न मार्गी लागतील.
- वसंतराव उरकुडकर, प्रतिष्ठित नागरिक

बांबूपासून तयार होणाऱ्या सुशोभित वस्तू तयार करण्यासाठी प्रकल्प सुरू व्हावा. सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल.
सुमनताई बावनकुळे, माजी जि. प. अध्यक्ष

गावात विकासकामे नियोजनबद्ध व्हावी. नियोजन करताना स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घ्यावे. विकासात्मक कामाकरिता निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
शकुंतला हटवार, जि. प. सदस्य अरोली/कोदामेंढी

बसस्थानक, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे. मुख्य रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वाहतुकीला सोयीचे होईल. येथे नायब तहसील कार्यालय सुरू करावे.
रियाज्युल सय्यद, अध्यक्ष साईबाबा ग्रामीण पतसंस्था

गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते याकरिता गावातील प्रत्येकाने सकारात्मक विचार मनाशी बाळगून सहकार्य करावे.
- प्रतिभा निकुरे, सरपंच

गावात अनेक सुविधा उपलब्ध नाहीत. गावात व्यायामशाळा असूनही तिथे साहित्य नाहीत. गावातील मोकळ्या जागी सौंदर्यीकरण करून बगीचा तयार करण्यात यावा.
स्वामी दबेटवार, तरुण युवक

गावाला जोडणाऱ्या सावंगी रस्त्यावरील सूर नदीवर पूल बांधल्यास नदीपलीकडील जवळपास 20 गावांतील लोकांना सोयीचे होईल. त्यातूनच बंधारा तयार करता येईल. त्यामुळे पाणीपातळी कायम राहील. आणि भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही.
- उमाकांत देवतळे, माजी सरपंच

गावात एखादा औद्योगिक प्रकल्प व्हायला पाहिजे. आपल्या भागात विजेचा खूप मोठा गंभीर प्रश्‍न सतावतो. नियमित वीजपुरवठा मिळायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा मिळायला पाहिजे.
- अनिल मेश्राम, तरुण युवक

गावात मालगुजारांची पाच ते सहा एकर जागा आहे. ती आबादानातील जागा गावठाणात घेऊन शासनाने अधिग्रहीत करून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन करावी. याबाबत तसा ठराव पाठविण्यांत आलेला आहे. वॉर्ड क्र. 4 मध्ये दलितवस्ती योजनेअंतर्गत पाण्याची टाकी मंजूर होणे जरुरी आहे.
- भगवान बावनकुळे, उपसरपंच
----------
संकलन : संदीप गौरखेडे (9764784099) 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.