সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 27, 2012

आजही चुकतात काळजाचे ठोके


चंद्रपूर- 26 नोव्हेंबर 2008. चार वर्षांपूर्वीचा तो दिवस. मुंबईतील कुलाबा पोलिस चौकीसमोर गोळीबार सुरू झाला. यात कुण्याचा पोटाला, कुणाच्या हातावर, तर कुणी पाठीवर जखम घेऊन जीव वाचविण्यासाठी धावत होते. अशातच एका तरुणाने आपल्या खिशातील रुमाल काढला. जखम झालेल्या तरुणाच्या हातावर बांधला. लगेच पोलिसांचे वाहन घेऊन रुग्णालयात नेले. मग, एकापाठोपाठ एक जखमी रुग्णालयात येऊ लागलीत. तेव्हा कळले दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला होता. जखमींना सर्वप्रथम रुग्णालयात दाखल करणारा आणि वृत्त वाहिन्यांना पहिली ब्रेकिंग सांगणारा हा तरुण चंद्रपूरकर आहे. 26/11 या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलावंत सुशील सहारे याला आजही या घटनेची आठवण झाली की त्याच्या काळजाचे ठोके चुकतात. 

सुशील सहारे हा मूळचा चंद्रपूरचा. तो गेल्या काही वर्षांपासून मुंबईत नाट्य आणि सिनेसृष्टीत नशीब आजमावीत आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री पावणे नऊची वेळ. एका मित्राचा मोबाईल चोरीला गेल्याने त्याची तक्रार नोंदविण्यासाठी तो कुलाबा पोलिस चौकीकडे निघाला होता. इतक्‍यात कुठूनतरी गोळीचा आवाज आला. क्रिकेट सामन्यांमुळे फटाके फुटत असावेत, असा समज करून पहिल्यांदा दुर्लक्ष केले. मात्र, हा आवाज काही वेगळाच होता. धड...धड करीत नॉनस्टॉप सुरू झालेली ही फायरिंग होती. इतक्‍यात एक तरुण वाचवा, वाचवा अशी विनंती करून धावत सुटला. काय झाले म्हणून सुशीलने विचारणा केली. 

खिशातील रुमाल काढून रक्तबंबाळ झालेल्या हाताला ती बांधली. त्यानंतर गुजराती भाषिक एक गृहस्थसुद्धा रक्ताने माखलेली पाठ घेऊन विव्हळत होता. या दोघांनाही त्याने पोलिसांच्या वाहनात बसवून रुग्णालयात नेले. मार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती. मार्ग कसा काढायचा, हा प्रश्‍न होता. मात्र, पोलिसांच्या सायरनमुळे वाहन विरुद्ध दिशेने कसेबसे काढले. अवघ्या काही अंतरावर असलेल्या जिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास मोठी कसरत करावी लागली. रात्रीची वेळ असल्याने रुग्णालयातही धावपळ नव्हती. मात्र, गोळीबारामुळे जखमीसह सुशीलचीसुद्धा बोबडी वळली होती. डॉक्‍टरांना काय सांगावे, सुचेना. परिस्थितीचे भान ठेवून डॉक्‍टरांनीही भरती करून घेतले. मग, काय. तासाभरात 20 जखमी पुन्हा आलेत. नेमके काय झाले कुणालाही कळले नव्हते. ड्रियडेंट हॉटेलसमोर गोळीबार सुरूच होता. तेव्हा कळले की हा दहशतवादी हल्ला होता म्हणून. आकस्मित सूचना मिळाल्यानंतर रुग्णवाहिकाही सायरन वाजवत निघाल्या. 

कुणाच्या पाठीवर, कुणाच्या हातावर, तर कुणी पोटावर बंदुकीची गोळी झेलत विव्हळत होते. या तास-दोन तासांत घटनेची बातमी मुंबईत पसरली नव्हती. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीच्या ओळखीने सुशीलनेच पहिली ब्रेकिंग दिली. तेव्हापासून रात्रभर त्याने रुग्णसेवा आणि ब्रेकींगची जबाबदारी सांभाळली. डोळ्यासमोर बघितलेले दृश्‍य आजही त्याच्या मनाला ठेचून जातात. या घटनेला आज चार वर्षे लोटली. 164 जणांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचा खातमा झाला. जिवंत सापडलेला कसाबही आता फासावर लटकला. मात्र, ज्या कुटुंबांचे कर्ते गेलेत. त्यांच्या घरी आजही प्रकाश उजाडलेला नाही, याची खंत सुशीलच्या मनात घर करून बसली आहे. 
--------------------
मदतगार, साक्षीदार अन्‌ न्यायदाता
26/11च्या घटनेतील पहिल्या जखमीला रुग्णालयात भरती करून मोलाचे योगदान देणारा सुशील सहारे, या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि कर्तव्य बजावणारा सीआरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप खिरटकर आणि जिवंत सापडलेल्या अजमल कसाब याला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायमूर्ती मदनलाल टहलियानी हे तिघेही चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीतले आहेत. 
सुशील सहारे हा चंद्रपूरचा. संदीप खिरटकर हे वरोरा, तर न्यायमूर्ती टहलियानी हे मूळचे मूल येथील रहिवासी आहेत.
--------------------
शहीद हेमंत करकरे
चंद्रपूर, गडचिरोलीच्या धोकादायक जंगलात नक्षलवाद्यांच्या पाठलाग करणारे एकमेव वाघ म्हणजे हेमंत करकरे. 1991 मध्ये चंद्रपूर या नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात ते पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले. करकरेंमध्ये एक कलासक्त रसिकही होता. या काळात चंद्रपूरच्या जंगलात फिरताना त्यांना लाकडाचे वेगवेगळ्या आकाराचे अनेक तुकडे सापडले. त्यातले वैशिष्ट्यपूर्ण तुकडे त्यांनी गोळा केले होते. त्यात गणपती, देवी, आदिमाया, नाचणारे जोडपे, येशू ख्रिस्त या आकाराचे लाकडाचे तुकडेही होते. त्याचे प्रदर्शन 1994 मध्ये भिवंडीत भरविण्यात आले होते.

 दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे गेल्या काही दिवसांत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या त्यांच्या कर्तृत्वामुळे प्रकाशात आले. लष्कराचा एक लेफ्टनंट कर्नल, एक साध्वी व साधू यांना अटक करून दहशतवादाचा हिंदू चेहराही त्यांनी प्रथमच समोर आणला होता. त्यांच्या या कृतीमुळे हिंदुत्ववादी पक्षांच्या टीकेचेही ते धनी ठरले होते. मोठा राजकीय दबाव त्यांच्यावर होता. पण दहशतवादाशीच लढत असलेला हा निधड्या छातीचा अधिकारी मुंबईत दहशतवाद्यांशीच झालेल्या चकमकीत अखेर शहीद झाला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.