সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 27, 2012

'घायाळ पाखरा' ने रेखाटले आदिवासींचे दु:ख

नाट्य समीक्षा
आदिवासी समाज म्हणजे दर्‍याखोर्‍यात,रानावनात राहत खर्‍या अर्थाने निसर्गाशी समरस झालेली रानपाखरेच.पण, प्रस्थापित व्यवस्थेत अनेक ठिकाणी या रानपाखरांचे शोषण होते. त्यांचे आदिम दु:ख लोकजागृती संस्था, चंद्रपूरच्या 'घायाळ पाखरा'च्या नाट्यप्रयोगातून सर्मथपणे रेखाटण्यात आले आहे. काल राज्य नाट्यस्पर्धेत सादर झालेल्या या नाटकाचा प्रयोग तंत्र, आंगिक, वाचिक अभिनयाच्या दृष्टीनेही उत्तम झाला.
गडचिरोलीतील एका दुर्गम खेड्यातील आदिवासी समाजातील एक बुद्धीमान तरूण विद्यापीठात प्रथम येतो. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार पटकावतो.पण, त्याचे नाव व खोटे कागदपत्रे वापरून भलतीच व्यक्ती त्याची नोकरी हिसकावते. तो अन्यायाविरोधात दाद मागायला जातो. तेव्हा त्याला अपमानित करून पोलीसांकरवी मारहाण करण्यात येते. त्याचा इन्सपेक्टर मित्र त्याच्या आईचा खून करतो.पण, तो नक्षलवादाची वाट धरता भारतीय संविधानावर विश्‍वास ठेवत न्यायालयातून आपला हक्क मिळवतो,असे या नाटकाचे कथानक आहे. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक असलेले अभिनेते अनिरूद्ध वनकर यांनी गौतमची भूमिका आपल्या खास शैलीत साकारली आहे. त्यांची संवादफेक, भावाभिव्यक्ती, मंचावरील वावर नव्या कलावंतांना अभ्यासण्यासारखेच आहे. यशोधरेच्या भूमीकेत तेजश्री बापट यांनीही आपल्या भूमिकेत प्राण ओतला आहे. भास्करची भूमीका रवींद्र धकाते यांनी उत्तम साकारली. पहिल्या अंकात विनोदी आणि दुसर्‍या अंकात गंभीर होणारी ही भूमिका प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. मागील स्पर्धेतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. विजय कुळकर्णी हा खलनायक गौतम ढेंगरे यांनी आपल्या अभिनयातून जिवंत केला.
इन्स्पेक्टरची भूमिका परमेश्‍वर पवार यांनी कौशल्याने साकारली. त्यांची देहबोली व्यक्तीरेखेला अगदी साजेशी होती. संजीव रामटेके यांची रामदासची भूमिकाही विनोदी व लक्षवेधक झाली. नाटकात अधूनमधून प्रवेश करणारे अधिकारी , न्यायालयाचे जज , अधिवक्ता, तपास अधिकारी यांच्या भूमीकाही चांगल्या होत्या. केवींद्रनाथ बारसागडे यांनी प्रकाशयोजना कौशल्याने सांभाळली, आदेश राऊत यांचे संगीत श्रवणीय होते. संजय रामटेके यांनी एकाच झोपडीच्या आधारे संपूर्णगावाचे दृश्य उभे करून नेपथ्यात कल्पकता दाखवली. या नाटकाचा प्रयोग उत्तम असला तरी, काही उणीवा नक्कीच आहेत. नाटकात काही ठिकाणी झालेला शिवराळ भाषेचा उपयोग टाळता आला असतो. आदिवासी समाजातील परिवार दाखवताना मुख्य पात्रांची नावे महामाया, यशोधरा, शुद्धोधन, गौतम अशी दिली आहेत. अशी नावे आदिवासी समाजात सहसा दिसत नाहीत.न्यायालयाचा प्रसंग आणखी रंगवता आला असता. नायकाची हिरावण्यात आलेली नोकरी खासगी कंपनीची दाखवली आहे ती शासकीय दाखवली असती, तर अधिक प्रभाव पडला असता.या काही बाबी वगळल्या तर नाटकाचा प्रयोग अतिशय उत्कृष्ट झाला. नायकाची नोकरी जाते, आईचा खून होतो तेव्हा तो नक्षलवादाची भाषा बोलतो. यानंतर त्याला सहज नक्षलवादी दाखवता आले असते.पण, तसे न करता सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळेच हे नाटक खास झाले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.