সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 18, 2012

ग्रामपंचायतीतून "निशाणी डावा अंगठा' गायब!

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हटले, की ते "निरक्षर'च असेल, अशीच कल्पना डोक्‍यात येते; मात्र चंद्रपूर तालुका याला अपवाद ठरला आहे. या एकमेव तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी 99 टक्के साक्षर आहेत. यातील काही उच्चविद्याविभूषित आहेत. सरपंचपदी असलेल्या सर्व 21 महिला साक्षर आहेत.
सत्तेच्या विक्रेंद्रीकरणात ग्रामपंचायतची महत्त्वाची भूमिका आहे. शासनाशी थेट संपर्क असलेला तो दुवा आहे. गावपातळीवर काम पाहणारी ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महत्त्वाचा भाग आहे. शासनाच्या विविध योजना जिल्हापरिषदेमार्फत ग्रामपंचायतकडून राबविण्यात येतात. पूर्वी ग्रामपंचायतमध्ये अंगठेबहाद्दर सरपंच असायचे. त्यामुळे अनेक योजना सरपंचांना ग्रामसेवकाकडून समजून घ्याव्या लागत असे. अशावेळी दिशाभूल होण्याचे प्रकार घडायचे. महिला सरपंच यांचा कारभार त्यांचे पतीदेवच चालवायचे. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेकदा त्यांची ग्रामसेवकांकडून फसवणूकसुद्धा व्हायची. याच कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर विरोधी सूर उमटला होता; मात्र साक्षरतेचे प्रमाण वाढत असल्याने सत्तेची चावी सांभाळण्यात महिलाही यशस्वी होऊ लागल्या आहेत. हे आता सिद्ध झाले आहे. विशेषत: या जिल्ह्यातील चंद्रपूर तालुका हा यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

चंद्रपूर तालुक्‍यात एकूण 48 ग्रामपंचायती असून, सदस्यसंख्या 431 आहे. यापैकी 21 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच आहेत. यात एकही निरक्षर महिला नाही. चौथीपर्यंत शिकलेल्या केवळ दोन महिला वगळता उर्वरित सर्व सरपंच बारावीपर्यंत शिकलेल्या आहेत. साक्षरतेचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक राजकारणात मोठा फायदा होऊ लागला आहे. एकूण 431 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 37 सदस्य उच्चशिक्षित असून, केवळ पाच सदस्य निरक्षर आहेत. ऊर्जानगर ग्रामपंचायतीत एकूण 17 सदस्यांपैकी नऊ जण उच्चशिक्षित आहेत. यात बीए, एमकॉम, बीकॉम, डीएडचे शिक्षण घेतलेले आहेत. बीएचे शिक्षण घेतलेल्या सरपंचांमध्ये कोळशाचे सुनील सोयाम, नागाळाचे रंजित कुमरे, छोटा नागपूरचे उमेश्‍वर काथवटे, पिपरीचे गणेश आवारी, तर वरवट येथील रोशन जुमडे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतमधील सदस्य आणि पदाधिकारी 99 टक्के साक्षर असलेला चंद्रपूर हा एकमेव तालुका आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.