সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 22, 2011

525 रुपयांत पंढरीची वारी

श्रीकांत पेशट्टीवार : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या विठूला भेटण्यासाठी चंद्रपूरकरांना तब्बल आठशे किलोमीटरचे अंतर कापावे लागते. विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागलेल्या भाविकांसाठी हे अंतर मात्र छोटे आहे. प्रश्‍न फक्त आर्थिक असतो. आता तो प्रश्‍नही राज्य परिवहन महामंडळाने सोडविला आहे. केवळ 525 रुपयांमध्ये भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येईल आणि दर्शन मिळाल्याचे समाधान घेऊन परतही येता येईल.
पुढच्या महिन्यात पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्ताने मोठी यात्रा भरते. या कालावधीत विठ्ठलाच्या दर्शनाकरिता दूरवरून भाविक येतात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने "525 रुपये भरा आणि पंढरपूर दर्शन घ्या' अशी पास योजना सुरू केली आहे. एसटी महामंडळाची "आवडेल तेथे प्रवास' ही योजना आहे. या योजनेअंतर्गत विविध पासेसच्या योजना राबविण्यात येतात. त्यात वीस दिवसांचे भाडे भरा आणि तीस दिवस कुठेही प्रवास करा, पन्नास दिवसांचे भाडे भरून 90 दिवस प्रवास, अशाप्रकारच्या सुविधा अत्यल्प दरात प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पास योजनेलाही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे विभागीय नियंत्रक राजीव घाटोळे यांनी सांगितले. त्यामुळे या पास योजनेला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करीत आहे.
पुढील महिन्यात ता. 11 जुलैपासून पंढरपुरात आषाढीनिमित्ताने यात्रा भरणार आहे. यावेळी विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी उसळते. प्रत्येकाला परिस्थितीअभावी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल- रुक्‍मिणीचे दर्शन घेता येणे शक्‍य नाही. चंद्रपूरपासून 800 किलोमीटर अंतरावर पंढरपूर वसले आहे. येथे जाण्यासाठी साध्या बसचे फक्त जाण्याचे तिकीट 531 रुपये आहे. 531 तिकीट मोजून पंढरपूरला जाणे प्रत्येकालाच शक्‍य होत नाही. त्यामुळे सर्वसाधारण भाविकांचा विचार पाहता 525 रुपयांत पंढरपूर दर्शनाचा निर्णय घेण्यात आला आहे. "आवडेल तेथे प्रवास' योजनेअंतर्गत चार दिवसांचे 525 रुपये भरून जाणे आणि येण्याचा प्रवास करता येईल. पंढरपूर मार्गावर तुळजापूर आहे. याशिवाय शनी शिंगणापूर, अक्कलकोट ही धार्मिक स्थळे काही अंतरावरच आहेत. यामुळे पंढरपूरसोबतच ही धार्मिक स्थळेही भाविकांना पाहता येईल. सात दिवसांच्या पासची दुसरी योजना आहे. यात 900 रुपये भरून ही स्थळे पाहता येईल.


तुम्ही फक्त इतकेच करायचं
तुम्हाला पंढरपूरला जायचे आहे. त्यासाठी तुम्हाला बसस्थानकावर जाऊन पासची रक्कम भरावी लागेल. यासोबत तुम्हाला दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे द्यावी लागेल. त्यानंतर तुमचा पास तयार होऊन तुम्ही विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकाल.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.