সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 01, 2012

चंद्रपूर महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगूल


नवनिर्मित  चंद्रपूर महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले. गेल्या सहा महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आता दोन हात करण्याकरिता सज्ज आहेत. १५ दिवस निवडणुकीचे धुमशान रंगणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 15 एप्रिलला मतदान होणार आहे त्यामुळे ही लढाई लक्षवेधी ठरणार असल्याची  चर्चा आहे. मनपा निवडणुकीत उमदेवारी मागे घेण्याच्या अखेरीच्या दिवशीनंतर निवडणुकीतील चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारांनीही प्रचाराला जोरात प्रारंभ केला असून निवडणुकीत रंग भरु लागला आहे.
मागील नोव्हेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. प्रभागरचना, आरक्षण आदी सोपस्कर पूर्ण झाले होते. एका-एका प्रभागात निवडणुकीसाठी तीन-तीन उमेदवारांना सांगड घालून प्रचाराला सुरवातही केली होती; पण तेव्हाच शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळणार असल्याची कुणकुण लागली होती. अखेर लोकसंख्येच्या निकषावर चंद्रपूर, महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. निवडणूक तयारीला लागलेल्या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले; पण तयारी कधीतरी उपयोगाची पडणारा म्हणून पुन्हा ते प्रभागरचना, आरक्षणाची प्रतीक्षा करू लागले.
आरक्षण झाले, प्रभागरचना झाली, तीन उमेदवारांच्या एका प्रभागाचे दोन उमेदरांचा एक प्रभाग असा बदल झाला. अपवाद वगळता सर्व आजी-माजी नगरसेवकांच्या मनासारखी प्रभागरचना झाली. सर्वकाही सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या मनासारखे झाल्यामुळे त्याबाबत फार वादही निर्माण झाला नाही. नव्या प्रभागांची व्याप्ती वाढल्यामुळे पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या वाढली. ज्यांना सोयीचे प्रभाग मिळाले नाहीत, त्यांनी नवे प्रभाग शोधून तयारी सुरू केली होती. अनेक प्रभागांत लाखो रुपयांची विकासकामे सुरू झाली. बैठका होऊ लागल्या होत्या. नेतेमंडळी, उमेदवारांचा प्रभागातील वावर वाढला होता; पण निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होत नसल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. निवडणूक लांबणार, अशीही शक्‍यता या चर्चेत होती. त्यामुळे इच्छुक सबुरीनेच घेत होते. प्रभागात निर्माण झालेले वातावरण टिकून ठेवण्यासाठी धडपड करीत होते. काहींनी मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली होती. मंदिरे, समाजमंदिरे, रस्ते, नाले आदींची कामे युद्धपातळीवर सुरू झाली होती. अनेक इच्छुक प्रभागाचा कसून अभ्यास करीत होते. प्रभागाचा कानाकोपरा तपासून पाहात होते. कच्च्या मतदारयाद्या ताब्यात घेऊन नगरनिहाय, जातीनिहाय तपशील गोळा करण्याची तयारी सुरू केली होती. त्यांचे प्रमुखदेखील निवडले गेले होते; पण निवडणूक जाहीर कधी होणार, याबाबतचे प्रश्‍नचिन्ह अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. नेतेमंडळींनादेखील इच्छुकांना झुलवत ठेवणे कठीण जात होते. अखेर एकदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला सर्वांनाच दिलासा मिळाला. आता ते खऱ्या अर्थाने मैदानात उतरणार आहेत. रखरखत्या उन्हात शहराच्या चोहोबाजूंनी वाजत गाजत निघालेल्या मिरवणुका, गळ्यात रुमाल, खांद्यावर झेंडा घेऊन वाद्यांच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावले, समर्थकांचा प्रचंड जयघोष, पन्नास टक्के आरक्षणामुळे महिलांचा अभूतपूर्व उत्साह अशा वातावरणात प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस असल्याने उमेदवार, समर्थकांनी तो गाजवला. सारे शहर जणू निवडणूकमय होऊन गेले.
आपआपल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ शहराच्या चोहोबाजूंच्या प्रभागांतून मिरवणुका निघाल्या. हातात झेंडे, पताका, गळ्यात रुमाल, डोक्‍यावर टोप्या घालून आलेल्या हजारो समर्थकांनी आपल्या उमेदवारांसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

महापालिकेचे पहिले सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांसह दुसऱ्या फळीतील विविध पदांवरील नेतेमंडळीदेखील इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. व्यापारी, डॉक्‍टर, वकील आदींसह काही अधिकाऱ्यांनादेखील या सदस्यत्वाने भुरळ घातल्याचे दिसून येत आहे. तेदेखील आपापल्या पक्षाकडे तिकीट मागण्याच्या तयारीत आहेत. काहींनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
--
Devnath Gandate
Reporter Sakal Newspaper
chandrapur
9922120599

http://kavyashilpa.blogspot.com/

http://www.epapergallery.com/






শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.