-देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर- कुष्ठरोग्यांना विविध प्रयोगशील उद्योगातून जगण्याचा मार्ग दाखविणारे ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवनात शेती हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. यंदा भात, सोयाबीन आणि कापूस या पारंपरिक पिकांमध्ये गुरफटलेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना वरदान ठरावा, असा "अद्रका'च्या शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन आणि कापूस या तीन मुख्य पिकांपलीकडे शेती केलेली नाही. निसर्गावर अवलंबून असलेल्या या पिकांमुळे अनेकदा शेतकऱ्यांना नैसर्गिक अवकृपेला सामोरे जावे लागते. तरीही येथील शेतकरी त्याच पिकांची लागवड करतात. या परंपरेला फाटा देत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी अद्रकाची शेती करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार, आनंदवनचे कृषी विभागप्रमुख रामकृष्ण साटोणे यांनी काही सहकाऱ्यांसोबत साताऱ्याला जाऊन अद्रकाच्या शेतीचा अभ्यास केला. त्यानंतर मागील जुलैमध्ये याचा प्रयोग सुरू झाला. 10 एकर शेतीवर एक-एक फुटावर अद्रकाची गाठ जमिनीत पेरण्यात आली. योग्य काळजी घेतल्यानंतर चालू मार्च महिन्यात अद्रकाचे पीक आले आहे. जमिनीची नांगरणी करून जमिनीत दडलेल्या या अद्रकाची आता काढणी होत आहे. पहिल्याच वर्षी दहा एकरांत भरघोस पीक निघाले आहे.
अद्रकाच्या शेतीसाठी मंत्र
आल्याच्या पिकासाठी माती भुसभुशीत हवी. रेताळ जमीन असेल, तर अधिक उत्तम. कमी पाण्यातही ठिबक सिंचनाद्वारे हे पीक घेता येऊ शकते. याशिवाय खर्चाच्या तुलनेत फायदा अधिक असल्याने शेतकऱ्यांसाठी ही शेती फायद्याचीच आहे. या पिकासाठी प्रतिएकरी लागवड खर्च 35 ते 45 हजार एवढा आहे. मात्र, त्या तुलनेत मिळणारा फायदा हा एक लाखापर्यंतचा आहे. एकरी सुमारे 70 ते 90 क्विंटल एवढे उत्पादन होते.
अद्रक पिकासाठी आनंदवनने रासायनिक खतांचा वापर केला. शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे असे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांनी ते घ्यावे.
- रामकृष्ण साटोणे, शेती विभागप्रमुख, आनंदवन, (जि. चंद्रपूर)
या पिकावर किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नसल्याने साठवणुकीसाठीही योग्य आहे. सुंठ म्हणूनही त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. अद्रकाची मागणी मोठी असल्याने शेतकऱ्यांनी एकदा या पिकाचा अनुभव घेतल्यास फायदा होईल. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन बियाणेही उपलब्ध करू.
- प्र. अ. शास्त्रकार, उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा (जि. चंद्रपूर)
http://shetimati,blogspot.com/