সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, August 11, 2011

आरोपी आत; 'मास्टर माइंड' मोकाट!


Thursday, August 11, 2011 AT 04:00 AM (IST)
चंद्रपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांच्या खुनामागे एका राष्ट्रीय पक्षाच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. चार दिवसांत त्याचे नाव समोर करू, अशी वल्गना त्यांनी केली होती; मात्र आठवडा उलटूनही त्यांनी आपली चुप्पी तोडली नाही. त्यामुळे या खूनप्रकरणाकडे लक्ष असलेल्या नागरिकांमध्ये तो नेता कोण? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, जिल्ह्यातील बड्या नेत्यांकडे संशयाने बघणे सुरू झाले आहे.
सूर यांचा गोळ्या घालून खून केल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. माजरी, वरोरा आणि वणी परिसरात जाळपोळ झाली. परप्रांतीयांना मारहाण करण्यात आली. या खुनाचे पडसाद कमीअधिक प्रमाणात जिल्हाभरात उमटले. या प्रकरणात आतापर्यंत लुकडी यादव, सचिन यादव, शंकर सिंग, राकेश सिंग, फिरोज कय्यामुद्दीन यांना अटक करण्यात आली आहे. लुकडी यादव व सचिन यादव हे खुनाचे सूत्रधार आहेत. ते मुख्य आरोपी आहेत. त्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. या दोन्ही यादव बंधूंना 16 पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. पोलिस तपासात कदाचित खूनप्रकरणाची नेमकी पार्श्‍वभूमी समोर येईल; मात्र मुख्य आरोपी आत झाले असताना मनसेच्या सांगण्यानुसार यातील "मास्टर माइंड' अद्याप बाहेरच आहे. या खूनप्रकरणातील आरोपींची एका राजकीय पक्षाशी जवळीक होती. तोच धागा पकडून मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, उपाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी खूनप्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी घेतलेल्या पत्रपरिषदेत राष्ट्रीय पक्षाचा एक बडा नेता सूर यांच्या खुनामागे असल्याचा आरोप केला होता. चार दिवसांत त्याचे नाव जनतेसमोर आणू, अशी गर्जनाही त्यांनी केली होती. या पत्रपरिषदेला आठवड्याभराचा कालावधी होऊनसुद्धा त्याचे नाव मनसेने समोर आणलेले नाही. आता या प्रकरणात ते बोलायलाही तयार नाहीत; मात्र त्यांच्या आरोपामुळे राजकीय पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता माजली होती. जनतेमध्येही तो नेता कोण? याविषयी तर्कवितर्क लावणे सुरू झाले. जिल्ह्यातील प्रत्येक बड्या नेत्याकडे नागरिक संशयाने बघायला लागले; मात्र जसजसा कालावधी लोटायला लागला, तशी या आरोपातील हवा निघणे सुरू झाले. केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी हा खोडसाळपणा केला, अशी चर्चा सुरू झाली. त्यांच्या या खोडसाळपणामुळे मात्र चांगल्या लोकप्रतिनिधींना संशयाच्या पिंजऱ्यात काही कालावधीसाठी उभे व्हावे लागले. त्यांच्यावरील संशयाचे मळभ अद्याप दूर झालेले नाही. सूर यांचा खून अवैधरीत्या चालविल्या जाणाऱ्या धंद्यांतील वर्चस्वातून झाला होता. राजकीय पक्षाचे पाठबळ घेऊन अवैध धंदे चालविण्याची अनेक उदाहरणे या जिल्ह्यात आहेत. अनेक नेत्यांनी अशा प्रकारच्या टोळ्या पाळल्या आहेत. त्यामुळेच सूर यांच्या खुनामागे एखादा बडा नेता असावा, या मनसेच्या आरोपावर वरकरणी तथ्यही दिसून आले; मात्र त्यांनी अद्याप नाव समोर न केल्याने त्यांच्या या आरोपातील गांभीर्य आता कमी होत आहे. 

'आम्ही उगाच कुणावर आरोप केले नाहीत. एका बड्या नेत्याचा हात सूर यांच्या खुनात असल्याचा दाट संशय आम्हाला आहे. त्याचे नाव आम्ही नक्कीच जाहीर करणार. त्याला आणखी थोडा वेळ लागेल. यासंदर्भातील पुरेसे पुरावे आमच्याकडे आलेले नाहीत. ते गोळा करणे सुरू आहे. पोलिस तपासातही मुख्य आरोपींकडून नाव समोर येऊ शकते.'
- सूरज ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे, चंद्रपूर

कुठल्याही गुन्ह्यात कुणावर संशय असल्यास त्याची रीतसर तक्रार पोलिसांत करावी. गुन्हेगारांचा आणि गुन्ह्याचा शोध लावण्यास पोलिस यंत्रणा सक्षम आहे; मात्र विनाकारण कुणाच्या नावाने समाजात संशय निर्माण करू नये. त्यामुळे यात चांगली माणसंही भरडली जातात. आरोप करणाऱ्यांना मात्र प्रसिद्धी मिळते.
-नितीन बन्सोड, कार्यकर्ता, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.