সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 22, 2011

525 रुपयांत पंढरीची वारी

525 रुपयांत पंढरीची वारी

श्रीकांत पेशट्टीवार : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या विठूला भेटण्यासाठी चंद्रपूरकरांना तब्बल आठशे किलोमीटरचे अंतर कापावे लागते. विठ्ठलाला भेटण्याची ओढ लागलेल्या भाविकांसाठी हे अंतर मात्र छोटे आहे. प्रश्‍न फक्त आर्थिक असतो. आता तो प्रश्‍नही राज्य परिवहन महामंडळाने सोडविला आहे. केवळ 525 रुपयांमध्ये भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येईल आणि दर्शन मिळाल्याचे समाधान घेऊन परतही येता येईल.
पुढच्या महिन्यात पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्ताने मोठी यात्रा भरते. या कालावधीत विठ्ठलाच्या दर्शनाकरिता दूरवरून भाविक येतात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने "525 रुपये भरा आणि पंढरपूर दर्शन घ्या' अशी पास योजना सुरू केली आहे. एसटी महामंडळाची "आवडेल तेथे प्रवास' ही योजना आहे. या योजनेअंतर्गत विविध पासेसच्या योजना राबविण्यात येतात. त्यात वीस दिवसांचे भाडे भरा आणि तीस दिवस कुठेही प्रवास करा, पन्नास दिवसांचे भाडे भरून 90 दिवस प्रवास, अशाप्रकारच्या सुविधा अत्यल्प दरात प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पास योजनेलाही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे विभागीय नियंत्रक राजीव घाटोळे यांनी सांगितले. त्यामुळे या पास योजनेला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करीत आहे.
पुढील महिन्यात ता. 11 जुलैपासून पंढरपुरात आषाढीनिमित्ताने यात्रा भरणार आहे. यावेळी विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी उसळते. प्रत्येकाला परिस्थितीअभावी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल- रुक्‍मिणीचे दर्शन घेता येणे शक्‍य नाही. चंद्रपूरपासून 800 किलोमीटर अंतरावर पंढरपूर वसले आहे. येथे जाण्यासाठी साध्या बसचे फक्त जाण्याचे तिकीट 531 रुपये आहे. 531 तिकीट मोजून पंढरपूरला जाणे प्रत्येकालाच शक्‍य होत नाही. त्यामुळे सर्वसाधारण भाविकांचा विचार पाहता 525 रुपयांत पंढरपूर दर्शनाचा निर्णय घेण्यात आला आहे. "आवडेल तेथे प्रवास' योजनेअंतर्गत चार दिवसांचे 525 रुपये भरून जाणे आणि येण्याचा प्रवास करता येईल. पंढरपूर मार्गावर तुळजापूर आहे. याशिवाय शनी शिंगणापूर, अक्कलकोट ही धार्मिक स्थळे काही अंतरावरच आहेत. यामुळे पंढरपूरसोबतच ही धार्मिक स्थळेही भाविकांना पाहता येईल. सात दिवसांच्या पासची दुसरी योजना आहे. यात 900 रुपये भरून ही स्थळे पाहता येईल.


तुम्ही फक्त इतकेच करायचं
तुम्हाला पंढरपूरला जायचे आहे. त्यासाठी तुम्हाला बसस्थानकावर जाऊन पासची रक्कम भरावी लागेल. यासोबत तुम्हाला दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे द्यावी लागेल. त्यानंतर तुमचा पास तयार होऊन तुम्ही विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकाल.

Tuesday, June 14, 2011

नोटबुकांवर आता 'ताडोबाचा वाघ'

नोटबुकांवर आता 'ताडोबाचा वाघ'

देवनाथ गंडाटे
चंद्रपूर - पूर्वी नोटबुकांच्या कव्हरपेजवर चित्रपटातील अभिनेते आणि क्रिकेट खेळाडूंचे राज्य होते. त्यांचे सौंदर्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला भुरळ घालायचे. त्यानंतर कंपन्यांनीदेखील विद्यार्थ्यांची मानसिकता बघून कॉर्टून आणि ऍनिमेशनला प्राधान्य दिले. आता दुर्मिळ होऊ पाहत असलेला वाघ नोटबुकांवर दिसू लागला आहे. तोसुद्धा आपल्याच ताडोबातील असून, अभयारण्यातील महत्त्वपूर्ण संदर्भ माहितीचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानाचा खजिना उपलब्ध झाला आहे.
'साध्या कागदाच्या 30 पानांची वही नको. करकरीत पानांचे नोटबुक हवे' असा हट्ट करीत प्राथमिक शिक्षण घेणारे चिमुकले विद्यार्थीसुद्धा बदलत्या काळानुसार मागणीत बदल घडवीत असतात. शिवाय कंपन्यादेखील विद्यार्थ्यांची मानसिकता आणि आवड बघून कव्हरपेज तयार करीत आहेत. 10 वर्षांपूर्वी नोटबुकांवर विविध अभिनेत्री, अभिनेते असायचे. यात ऐश्‍वर्या रॉय, गोविंदा, अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमामालिनी यांचा समावेश होता. दरम्यानच्या काळात क्रिकेटचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा विद्यार्थ्यांचा चाहता झाला. त्यामुळे विविध कंपन्यांनी सचिनचे कव्हरपेज छापणे सुरू केले. काही वर्षांत शक्तिमान, स्पायडरमॅन, सुपरमॅन यांच्या कव्हरपेजची मागणी होती. नंतर ऍनिमेशनच्या प्रगतीतून साधलेला बालगणेश, बालहनुमान, श्रीकृष्ण यांनी भुरळ घातली. कव्हरपेजवर एखादे आवडीचे छायाचित्र असले की, ते खरेदी करण्यासाठी विद्यार्थीदेखील पालकांकडे हट्ट करतात. त्यामुळे कंपन्यांनीदेखील विद्यार्थ्यांची पसंत लक्षात घेऊन कव्हरपेज तयार करणे सुरू केले आहे. नागपुरातून निर्मिती होणाऱ्या नोटबुकांच्या एका कंपनीने यंदा "ताडोबाच्या वाघाला' कव्हरपेजवर प्राधान्य दिले. शिवाय ताडोबातील हरिण, रानगवे आणि पशुपक्ष्यांची चित्रे छापली आहेत. शेवटच्या पानावर संबंधित छायाचित्रांची माहिती देण्यात आली. शेवटून दुसऱ्या पानावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची संपूर्ण माहिती आहे. या माहितीमुळे विद्यार्थ्यांत पर्यावरणासंदर्भात जनजागृती होत आहे.



निखिलच्या छायाचित्रांची दखल
येथील हौशी छायाचित्रकार निखिल तांबेकर यांनी कॅमेराबद्ध केलेली छायाचित्रे नोटबुकांच्या पहिल्या पानावर आहेत. त्यावर मॅजेस्टिक टायगर, नेचर गिफ्ट सेव्ह नेचर, सेव्ह वाइल्ड लाइफ, ऑलव्हेज बिलिव्ह इन ऍबिलिटी ऍण्ड इन्फर्ट आदी घोषवाक्‍ये लिहिलेली आहेत.

Monday, June 13, 2011

Sunday, June 12, 2011

बाबा रामदेव यांनी नऊ दिवसानंतर उपोषण सोडले

बाबा रामदेव यांनी नऊ दिवसानंतर उपोषण सोडले

बाबा रामदेव यांनी अखेर नऊ दिवसानंतर उपोषण मागे घेतले. बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा आज नववा दिसून बाबांच्या शरीरातील प्रोटीनची कमी झाली आहे. त्यामुळे बाबांना सक्त आहाराची गरज आहे, असे बाबा रामदेव यांच्यावर उपचार करणाऱय़ा डॉक्टरांनी रविवारी सकाळी सांगितले.

मात्र त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिल्याने आम्ही त्यांना जबरदस्तीने जेवण देऊ शकत नाही. याबाबतचा विस्तृत अहवाल प्रशासनाला पाठविला आहे. दरम्यान श्री श्री रविशंकर हे बाबांना भेटून पुन्हा एकदा उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करणार आहेत.
बाबांवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले की, बाबा रामदेव यांची प्रकृती अजूनही अस्थिर असून, त्यांचा बीबी १०९/७१ असा आहे. त्यांचा बीपी सर्वसाधारण राहावा, म्हणून डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत आहेत. तसेच बाबांच्या रक्तात विटामीनची कमतरता आहे. त्यामुळे बाबांना सलाइनद्वारे प्रोटीन, विटामीन व मीनरल्स देण्यात येत आहे.
आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर रविवारी पुन्हा बाबा यांची भेट घेणार असून उपोषण सोडवे यासाठी विनंती करणार आहेत गेल्या दोन दिवसातील श्री श्री रविशंकर यांनी बाबांना तिसरयांदा उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र बाबा रामदेव उपोषणावर अडून बसले आहेत. मात्र त्याचे उपोषण आपण थांबवूच असा चंग रविशंकर यांनी बांधला आहे. तसेच बाबा जोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत. तोपर्यंत आपण बाबांबरोबरच राहू, असे सांगितले आहे. बाबा रामदेव आपली विनंती मान्य करतील व उपोषण सोडतील असा विश्वास रविशंकर यांनी व्यक्त केला आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी बाबा रामदेव यांनी उपोषण थांबवावे, अशी विनंती केली आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, हरियाणातील नेते ओम प्रकाश चौटाला यांनी बाबांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. अखेर नऊ दिवसानंतर बाबांनी रविवारी सकाळी ११ वाजता ज्यूस घेऊन उपोषण सोडले.



साधनाताई आमटे यांची प्रकृती अत्यवस्थ

साधनाताई आमटे यांची प्रकृती अत्यवस्थ

साधनाताईंवर आनंदवनात उपचार

चंद्रपूर - ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्यावर आनंदवनात उपचार सुरू आहेत. डॉ. विजय पोळ आणि वैद्यकीय चमू उपचार करीत आहेत.
गेल्या आठ ते 10 दिवसांपासून साधनाताईंनी अन्नग्रहण करणे सोडले आहे. त्या केवळ एक-दोन चमचे फळांचा रस घेत असल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत नसल्याची माहिती आनंदवनाच्या सूत्रांनी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅंसर झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. 86 वर्षीय साधनाताईंच्या किडनीवर गतवर्षी सूज आल्याने त्यांना 29 एप्रिलला नागपूरच्या धंतोली येथील अवंती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर डॉ. श्रीखंडे व डॉ. एस. एम. पाटील यांनी उपचार केले. तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे त्यांना नऊ मे रोजी सुटी देण्यात आली. तेथून आनंदवनात परतल्यानंतर आनंदवनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ हे त्यांची देखरेख करीत आहेत. साधनाताईंची प्रकृती खालावत असल्याने त्यांचे अनेक हितचिंतक आनंदवनात येऊन त्यांची चौकशी करीत आहेत. गोवा न्यायालयाच्या न्यायाधीशांनीदेखील आज आनंदवनात भेट देऊन ताईंच्या तब्येतीची विचारपूस केली. डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. शीतल आमटे, डॉ. अभय बंग आणि आमटे परिवारातील सर्व सदस्य आनंदवनात दाखल झाले आहेत

Tuesday, June 07, 2011

प्रियांका जर्मनीला चालली

प्रियांका जर्मनीला चालली

गुणी प्रियांकाने काढले मायबापाचे नाव

-
Tags: football competition, priyanka, chandrapur, vidarbha
वडील दिवसभर लाकडावर करवत फिरवून सुतारकाम करतात आणि आई अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करते. तुटपुंज्या कमाईवर चालणाऱ्या कुटुंबातील प्रियांकाला परदेशात जाण्याची संधी आली. मात्र, जिथे दोन वेळ खाण्याची चिंता. तिथे परदेशात जाण्याचे स्वप्न म्हणजे फुकटचा टाइमपास! मात्र, प्रियांकाचे हे स्वप्न पूर्ण झाले. युवाशक्तीकडून मदत मिळाली अन्‌ प्रियांका जर्मनीला चालली आहे.
समाधी वॉर्डातील काळाराम मंदिराजवळ राहणारे विठ्ठल वांढरे हे सुतारकाम करतात. पत्नी शारदा या अंगणवाडीत मदतनीस आहेत. प्रियांका ही त्यांची मुलगी. ती एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाला शिकते आहे. प्राथमिक शिक्षण घेत असताना ती खो-खो, कबड्डी खेळायची. पुढे व्हॉलीबॉल खेळू लागली. यात तिने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. खेळातील तिचे कौशल्य पाहून महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक वानखेडे यांनी तिला फुटबॉलकडे वळविले. त्यातही ती पारंगत झाली. यंदा नागपूरच्या क्रीडा विकास संस्थेतर्फे तिला चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यातही तिने सर्वांना जिंकले. त्यातूनच जर्मनीतील बर्लिन येथे होणाऱ्या डिस्कवर फुटबॉल वुमेन्स टुर्नामेंटसाठी तिची निवड झाली. त्यासाठी पाच हजार रुपये नोंदणी शुल्क, 50 हजार रुपये प्रवास, निवास, साहित्य खर्च आणि एक लाख रुपये अतिरिक्त खर्च होता. यातील एक लाख रुपये क्रीडा विकास संस्थेने भरले. मात्र, उर्वरित 60 हजार रुपयांचा खर्च कुठून करायचा, याची चिंता प्रियांकाचे वडील विठ्ठल वांढरे यांना लागली होती. त्यामुळे ते खासदार-आमदारांच्या दारी फिरत होते. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पाच हजार रुपये, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाच हजार आणि आमदार विजय वडेट्टीवारांनी पाच हजार रुपये दिले. मात्र, ही रक्कम कमीच पडत होती. अशातच ऍड. महेश काबरा यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी युवाशक्तीचे अध्यक्ष बंटी भांगडिया यांच्याशी बोलणे करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी उर्वरित संपूर्ण खर्च युवाशक्ती करेल, असे आश्‍वासन देत 50 हजार रुपयांचा धनादेश दिला. वेळेत मिळालेल्या या मदतीमुळे प्रियांकाला जर्मनीला जाण्याची संधी मिळाली आहे. संबंधित बातम्या

 प्रतिक्रिया

On 01/06/2011 11:38 AM amol said:

हे एक प्रेरणा देणारी घटना आहे.परिस्थिती शी लडून कसा विकार सादावा हे चंद्रपूर वासियान साठी चांगले उदहरण आहे.

On 01/06/2011 09:41 AM renuka said:

अभिनंदन....Best luck

On 01/06/2011 09:09 AM Bhagyesh said:

Good , keep it up