चंद्रपूर /प्रतिनिधी:
नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहास सोमवारपासून (दि.30 ऑक्टोम्बर ) पासुन प्रारंभ होणार आहे . या सप्ताहात 4 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली.
30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या अवधीत दक्षता विषयक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्रीय दक्षता आयोगाने घेतला आहे. ‘मेरा लक्ष्य – भ्रष्टाचार मुक्त भारत’ अशी यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना आहे. 30 ऑक्टोबर 2017 रोजी एका समारंभात या सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते. सप्ताहाचे आयोजन राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत करण्यात यावे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.
नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in तसेच नि:शुल्क दुरध्वनी क्रमांक 1064 द्यावी , यासाठी चंद्रपूर येथील कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक देखील देण्यात आलेला आहे (०७१७२ -२५०२५१) असे परिपत्रकात नमूद आहे.
त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शहरातील प्रमुख भागात पथनाट्याचे (Street Plays) आयोजन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना, भ्रष्टाचार प्रतिबंध संदर्भात मी काय करु शकतो?
या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
शहरातही सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात येईल. या सप्ताहामध्ये शहर व जिल्ह्य़ातील सर्व शाळा, महाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी रुग्णालये तसेच मोक्याच्या ठिकाणी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी फलक, स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. जिल्यातील तालुका व गाव पातळीवर देखील भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती आयोजन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक डी.एम.घुगे यांनी दिली.