ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
दिवसेंदिवस वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढतच जात असून चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे
बिबट्याच्या हल्यात एका दहा वर्षीय चिमुकली जखमी झाली आहे.अक्षरा बाळकृष्ण शेंडे असे या जखमी मुलीचे नाव असून तिला उपचारकरीता आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णायात दाखल करण्यात आले होते.
सध्या तीची प्रकृती स्थिर आहे.
सदर घटना मंगळवारी ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचगाव येथे पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहिती नुसार अक्षरा ही सकाळी नेहमीप्रमाणे बरड किन्ही चिंचगाव रोड वर फिरायला जाते त्या प्रमाणे आज सुद्धा ती सकाळी ५ वाजताच्या सुमारास फिरायला गेली असता चिंचगाव बसस्टॊप पासून परत येत असताना मध्यंतरी रोड वर अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने अक्षरा बाळकृष्ण शेंडे वय १० वर्ष रा.बरड किन्ही या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर झडप घालून तिला गंभीर जखमी केले आहे. या पूर्वी हि त्या रोडवर अनेक नागरिकांवर नरभक्षक बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या भागात नरभक्षक बिबट्याची नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने त्वरित या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राउंड ऑफिसर सूर्यवंशी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून त्वरित मदतीचे आश्वासन देण्यात आले. आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.