शेतकरी सुकाणु समितीने दिले रामनगर पोलिसांना निवेदन
चंद्रपुर/:प्रतिनिधी:(ललित लांजेवार)
सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडले, शेतकऱ्यांची फसवणूक केली व शेतकरी विरोधी धोरणे घेऊन एका प्रकारे शेतकऱ्यांचा खूनच केला या गुन्ह्यांसाठी सरकारवर खटले दाखल करावे या साठी चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम शेतकरी बलिप्रतिपदेच्या दिवशी सरकारच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात खटले दाखल करण्याच्या मागणीसाठी पोहोचले होते. सरकारने सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे घेतली आहे. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले.शेतकऱ्यांच्या या आत्महत्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या सरकारने केलेल्या हत्याच आहेत.शेतकऱ्यांनी आंदोलन करीत सरकारकडे कर्जमुक्तीची मागणी केली. सरकारने कर्जमुक्ती केली खरी पण कर्जमुक्त करताना मात्र सरकारने आपले आश्वासन न पाळता अनेक अटी लावत शेतकऱ्यांची फसवणूक केली. आकडेवारी नुसार राज्यभरात ८९ लाख बँक खातेदार शेतकरी आहेत. त्यातील केवळ ५८ लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीसाठी राज भरता आले. व उर्वरित ३१ लाख शेतकरी कर्जमाफीचे फॉर्म भरू शकले नाही. शेतकरी सरकारच्या अटींमध्ये बसतील त्यांनाच कर्जमाफीचा लाभ होईल.परिणामी बहुतांश शेतकरी कर्जमाफीतून वगळले गेले आहेत. अश्या पार्श्वभूमीवर सरकारवर फसवणुकीचा,शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा,शेतकऱ्यांचा हत्या केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत शेतकरी सुकाणु समितीने दिले रामनगर पोलिसांना निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करा,शेतमालाला रास्त हमीभाव द्या,स्वामिनाथन आयोग लागू करावा,शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. यावेळी शेकडो नागरिकांनी रामनगर चे ठाणेदार यांना निवेदन दिले आहे.