সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 25, 2016

समारंभासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात कपात

समारंभासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात कपात

 एकनाथराव खडसे

मुंबई : राज्यातील मद्य निर्माण करणाऱ्या निर्माण्यांकडून मिळणारे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याची पध्दत सध्या उत्पादनाच्या टप्प्यावर आहे. या पध्दतीत मद्याचे कमी उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस जास्त अनुज्ञप्ती शुल्क व जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस फारच कमी प्रमाणात अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येते. परीणामी लहान उद्योजकांचे नुकसान होत होते. त्यामुळे या पध्दतीत बदल करुन आता मद्य निर्माता तो उत्पादित करीत असलेल्या प्रत्येक बॉक्स मागे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या निर्मात्यास सध्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात शुल्क भरावे लागेल. तर, कमी उत्पादन करणाऱ्या मद्य उत्पादकास कमी शुल्क भरावे लागेल. यामुळे महसुलामध्ये वाढ होईल, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मंत्रालयात दिली.

Monday, February 22, 2016

फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज

फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज

चंद्रपूर - शहरातील अतिक्रमणदारांना सरंक्षण आणि त्यांचे व्यवसायाला संवर्धन देणारा 'वेंडर अॅक्ट' केंद्र सरकारने मंजूर केला असून, या कायदयाची अमंलबजावणी करण्यात यावी यादृष्टीने जनजागृती करण्यासाठी फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज (दिनांक 23 फेब्रु.)घेण्यात येत आहे.
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात श्रमिक एल्गारचे वतीने दुपारी 12 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्री. दिपक मैसेकर राहणार आहे. या निमीत्ताने 'वेंडर अॅक्ट' या पुस्तिकेचे प्रकाशन चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास चंद्रपूर मनपाचे आयुक्त सुधिर शंभरकर, कामगार नेते विलास भोंगाडे, प्रा. डॉ. जयश्री कापसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
केंद्र सरकारने 2014 मध्ये शहरातील फुटपाथ व्यावसायीकांसाठी 'वेंडर अॅक्ट' मंजूर केला आहे, मात्र या कायदयाची अमंलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. विशेष म्हणजे या कायदयाची माहीतीही फुटपाथवरील व्यावसायीकांना अजूनपर्यंत नाही. ही माहिती या व्यावसायीकांना मिळावी तसेच या कायदयाचे अमंलबजावणीच्या दृष्टीने महानगर पालीका, नगर पालिका प्रशासनाने निर्णय घ्यावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हयातील फुटपाथवरील व्यावसायीकांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी, उपाध्यक्ष विजय सिध्दावार, महासचिव विजय कोरेवार यांनी केले आहे.

Thursday, February 04, 2016

दोषींना फाशी

दोषींना फाशी

युग चांडक अपहरण आणि हत्येप्रकरणी

नागपूर : नागपुरातील युग चांडक या 8 वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने, आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना दोषी मानत दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

शहरातील एका 8 वर्षीय युग चांडक असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती.  
एक सप्टेंबर 2014 रोजी युगचे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि आपल्या राहत्या गुरुवंदन अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बेग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला.
इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले.
ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे काल संध्याकाळ पासूनच नागपूर पोलिसांचे अनेक पथक नागपूर आणि आजू बाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होते.
या घटनेनंतर सर्वत्र नाकेबंदीही करण्यात आली होती, मात्र तरीही युगचा शोध लागू शकला नाही. त्यानतंर काल संध्याकाळी नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर लोणखैरी गावाजवळ एका निर्जनस्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला. अपहरणाची घटना समोर आल्यापासूनच पोलिसांनी अनेक संशयितांना पकडून चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

राजेश डावरे आणि अरविंद सिंग अशी या दोघांची नावं आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात अकाऊंटटण्ट म्हणून कामाला होता. मात्र त्याने अकाऊंट्समध्ये काही घोळ केल्याने काही दिवसांपूर्वी त्याला डॉ. चांडक यांनी कामावरून काढले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने युगचे अपहरण केले.

नागपूरातील हत्या आणि अपहरणाच्या घटना-
  1. आदित्य पारेख- 2003 साली वर्मा ले-आऊट परिसरातून अपहरण
  2. हरेकृष्णा ठकराल- 2004 साली इतवारी भागातून अपहरण
  3. कुश कटारिया- 2011 साली छापरू नगर भागातून अपहरण
  4. यश बोरकर- 2012 साली खापरी परिसरातून अपहरण

शिक्षा?
*लहान मुलाचे अपहरण केल्याने फाशी
*अपहरण करून हत्या – फाशी
*अपहरण-हत्येचा कट – जन्मठेप
*पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न – 7 वर्षांची शिक्षा
*दोन्ही आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा


न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण

  • जरी पहिलाच गुन्हा असला, तरी हा गुन्हा अपघाताने नाही. आरोपींनी अत्यंत शांत डोक्याने, विचारपूर्वक केलेलं हे क्रूर कृत्य आहे.
  • फक्त वय कमी आहे म्हणून दोषींना मोकळं सोडणे चुकीचं आहे. त्यामुळे या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही.
  • दोषींनी 8 वर्षाचा बालक जो स्वसंरक्षण करण्यास असमर्थ होता, अशा युगचं अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या केली. त्यामुळे हा गुन्हा माफ करण्यासारखा अजिबात नाही.
  • आरोपींचं कृत्य पाहता, पालक वर्गात भयभीतता आहे. त्यामुळेच आरोपींना जरब बसण्यासाठी दोषींना कठोर शासन आवश्यक आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Monday, February 01, 2016

मुरुडला 13 पुण्याचे विद्यार्थी बुडाले

मुरुडला 13 पुण्याचे विद्यार्थी बुडाले

9 मुली, 4 मुलांचा समावेश


मुरुड, - पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेल्या 20 ते 22 विद्यार्थ्यांपैकी 14 विद्यार्थी बुडाले. त्यापैकी काहींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर 14 हुन अधिक विद्यार्थी समुद्रात बेपत्ता झाले. स्थानिकांच्या मदतीने 13 विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रात बाहेर काढण्यात यश आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांत 9 मुली व 4 मुलांचा समावेश आहे.

पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता अकरावी व बारावीतील सुमारे 126 विद्यार्थी आज सकाळी पुण्यातून तीन लक्झरी बस क्रमांक एमएच 12, जीटी 3456, एमएच 12 केए 1687, एमएच 12, एफडी 3456 या तीन लक्झरी बसमधून आले होते. करून रायगडमधील मुरूड बीचवर फिरायला गेले होते. आज सकाळी पुण्यातून निघाल्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास तेथे ते पोहचले. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर तीनच्या सुमारास हे विद्यार्थी मुरूड किना-यावरील समुद्रात पोहायला उतरले. अनेक मुले एकाच वेळी समुद्रात पोहायला गेली. अनेक मुले समुद्रात पुढे पुढे पोहत गेली. मात्र, अनेकांना पाण्याचा अंदाज न आल्याने व दमल्याने बुडू लागले. काय घडतयं हे कोणालाच कळेना. अनेक मुले बुडू लागल्याने आरडाओरड सुरु झाला व एकच गोंधळ उडाला. यात अनेक मुले समुद्रात खेचली गेली व बुडाली.
त्यांचा आक्रोश पाहून सभोवतालची लोक जमा झाले पण खोलवर पाण्यात गेल्याने त्यांना वाचवणे खूप मुश्कील झाले. यातील 9 मुली व चार मुले यांचे मृतदेह सापडले आहेत. यातील काही जणांना समुद्रात जाणार्‍या बोटीने वाचवल्याने 7 जणांना जीवनदान लाभले आहे. अद्याप समुद्रकिनारी गर्दी असून यातील काही मुलांचा शोध सुरु आहे. तीन लक्झरी बसमधील नेमकी किती मुले समुद्रात गेली याचा तपास सुरु आहे. ग्रामीण रुग्णालयात या सर्वांचे शव असून अत्यवस्थ असणार्‍यांवर इलाज सुरु आहे. मदत कार्यासाठी सर्व हिंदू मुस्लीम लोक एकवटले होते. मृतांमध्ये सर्वात जास्त मुली आहेत. सदरील घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. शिफा काझी, सुमय्या अन्सारी, सफिया काझी, युसुफ अन्सारी, फरीद सय्यद, इफ्तेकार शेख, साजिद चौधरी, समरीन शेख, शफी अन्सारी, रफिया अन्सारी, राज तंजनी, स्वप्नाली संगत, सुप्रिया पाल, एकाचे नाव समजले नाही. एकजण अत्यवस्थ आहे.