সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 22, 2010

"तो' बिल्डर 15 दिवसांच्या रजेवर

"तो' बिल्डर 15 दिवसांच्या रजेवर

सकाळ वृत्तसेवा
Monday, November 22, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: municipal employee, builder, leave, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - पालिकेत शिपाई पदावर कार्यरत कर्मचारी बिल्डर व्यवसाय करीत असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रकाशित करताच पालिका प्रशासनात खळबळ माजली आहे. दरम्यान, कारवाईच्या भीतीपोटी सदर बिल्डर 15 दिवसांच्या रजेवर असून, दक्षिणेतील कर्नाटक राज्यात फिरायला गेल्याची माहिती आहे.
चार लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर नगरपालिकेत जवळपास 200 हून जास्त शिपायांची नियुक्ती आहे. प्रत्यक्षात मात्र, बहुतांश कर्मचारी काम न करताही वेतन घेत असल्याची धक्कादायक माहिती "सकाळ'ने प्रकाशित केली होती. शासनाने नेमून दिलेले काम न करता कर्मचाऱ्यांनी स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. केवळ पालिकेच्या हजेरीबुकावर स्वाक्षरी करून करून महिन्याचे मासिकवेतन उचलत असल्याची माहिती आहे. यातील काही लिपिक बिल्डर, बार व्यावसायिक किंवा अन्य उद्योगाचे मालक म्हणून काम करीत आहेत. यातीलच एक स्वच्छता झोनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याची काही वर्षांपूर्वी काम करीत नसल्याच्या तक्रारीवरून नगराध्यक्षांच्या कक्षात बदली करण्यात आली. तिथेही या शिपायाने पदाधिकाऱ्यांना लालूस देऊन वैयक्तिक उद्योग सुरू केलेत. सदर कर्मचारी सकाळी दहाला वेळेवर पालिकेत येतो. हजेरीबुकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचा पत्ताच नसतो. दिवसभरात बांधकाम बिल्डर आणि आपले व्यवसाय सांभाळत आहे. ही बाब अनेकांना ठाऊक आहे. मात्र, ठरलेली रक्कम वेळीच आणि नियमित मिळत असल्याने अनेकांनी चुप्पी धारण केली आहे. याच व्यवसायातून बंगला आणि आलिशान कारने त्याचा घर ते पालिका असा प्रवास सुरू आहे. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी नवीन असल्याने कारवाईच्या भीतीपोटी सदर कर्मचाऱ्याने 15 दिवसांची रजा घेतली आहे. आपण तो नव्हेच, असे दाखवून देण्यासाठी कर्मचारी खटाटोप करीत आहे. दरम्यान, विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बिल्डर शिपायाने हजेरी बुकावर दुसऱ्याच्या हाताने हजेरी लावली आहे. याचाच अर्थ हा कर्मचारी पालिकेत येतच नाही, असे स्पष्ट होते. याशिवाय पालिकेतील अनेक कर्मचारी एलआयसी, विविध खासगी विमा कंपन्या, नेटवर्क मार्केटिंग, प्लॉटविक्री, बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करतात. पालिकेत काम नसल्यामुळेच त्यांचे हे फावल्या वेळेतील उद्योग सुरू असल्याचे बोलले जाते. 15 वर्षांपूर्वी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत एका पदाधिकाऱ्याला पालिकेने एक शिपाई नियुक्त केला होता. तो आजही तत्कालीन नगराध्यक्षांच्या घरी काम करीत आहे.

Saturday, November 20, 2010

'फोर्ब्ज'च्या यादीत दादाजी खोब्रागडे

'फोर्ब्ज'च्या यादीत दादाजी खोब्रागडे

Agrowon- Main Page....
Thursday, November 18, 2010 AT 12:00 AM (IST)


देवनाथ गंडाटे
चंद्रपूर : गेल्या चार दशकांत केवळ दीड एकर शेतीत विविध प्रयोग करून ख्यातनाम "एचएमटी'सह भाताची (धान) नऊ वाण विकसित करणाऱ्या 72 वर्षीय दादाजी खोब्रागडे या अल्पभूधारक शेतकऱ्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. दरवर्षी "फोर्ब्ज' मासिकातर्फे जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत श्री. खोब्रागडे यांच्यासह सात भारतीय शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्‍यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे मूळचे रहिवासी. अल्पभूधारक असलेल्या दादाजींनी आपल्या शेतात नवीन काहीतरी करण्याच्या उद्देशाने प्रयोग सुरू केले. 1983मध्ये त्यांनी अत्यंत बारीक आकाराचे आणि खाण्यास चवदार असे भाताचे वाण शोधण्यास सुरवात केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांनाही पीक घेण्यास सांगितले. त्यावर कुणी विश्‍वास ठेवला नाही; मात्र गावातील भीमराव शिंदे या शेतकऱ्याने या वाणाची पेरणी केली आणि पहिल्याच वर्षी 90 क्विंटल भाताचे उत्पादन निघाले. या यशस्वी प्रयोगाने मग एकामागून एक शेतकरी पुढे येऊ लागले. पहिल्या हंगामात निघालेले धान तळोधी येथील बाजार समितीत नेण्यात आले. तेव्हा या धानाचे नावही कुणाला ठाऊक नव्हते. कुणाच्या तरी मनगटावर असलेले घड्याळ बघून "एचएमटी' हे नाव देण्यात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील "एचएमटी' संपूर्ण जिल्ह्यात गेले. आज सुमारे पाच राज्यांमध्ये एक लाख एकरावर "एचएमटी'ची लागवड होऊ लागली आहे.


दादाजींच्या या प्रयोगाची पहिली दखल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सिंदेवाही येथील कृषी संशोधन केंद्राने घेतली. 1994मध्ये हे वाण तज्ज्ञांनी अभ्यासासाठी घेतले; मात्र चार वर्षांनी याच केंद्राने हे वाण "पीकेव्ही' नावाने बाजारात आणले. तेव्हापासून दादाजींनी शासकीय यंत्रणेसोबत लढा सुरू केला. यानंतर दादाजींनी "विजय नांदेड', "नांदेड 92', "नांदेड हिरा', "डीआरके', "नांदेड चेन्नूर', "नांदेड दीपक', "काटे एचएमटी' आणि "सुगंधी' हे नऊ वाण विकसित केले आहेत. या कामासाठी दादाजींना 12 पुरस्कार मिळाले असून, राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील संस्थेतर्फे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या हस्ते दादाजींना पुरस्कार देऊन गौरविले. आज अमेरिकेतील फोर्ब्ज मासिकाने दखल घेतल्याने दादाजींसह ग्रामीण शेतकऱ्यांची मान उंचावली आहे.
कृषी क्षेत्रात जगाच्या पातळीवर नाव कमावलेले दादाजी एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. मध्यंतरी मुलाच्या आजारपणामुळे काही शेतीही विकावी लागली. मुले मजुरी करून पोट भरतात. त्यामुळे "हातावर आणून पानावर खाणे' अशी स्थिती दादाजींची आहे.

फोर्ब्जच्या यादीतील इतर भारतीय ग्रामीण उद्योजक

मनसुखभाई जगानी ः दुचाकी ट्रॅक्‍टरची निर्मिती. सुमारे 16,000 रुपये इतकी या ट्रॅक्‍टरची किंमत आहे. अर्ध्या तासामध्ये दोन लिटर पेट्रोल खर्च करून या ट्रॅक्‍टरद्वारे एक एकराचे क्षेत्र नांगरता येते.



मनसुखभाई पटेल ः मूळचे शेतकरी असलेले मनसुखभाई पटेल यांनी कापूस बोंडे वेचण्यासाठी यंत्र विकसित केले आहे. यामुळे मानवी श्रम कमी करणे शक्‍य झाले आहे.



मनसुखभाई प्रजापती ः मनसुखभाई प्रजापती हे व्यवसायाने कुंभार आहेत. त्यांनी मातीचा तवा आणि मातीचा फ्रिज विकसित केला आहे. मातीच्या तव्याची किंमत 100 रुपये आहे. मातीचा फ्रिज चालवण्यासाठी विजेची गरज लागत नाही.



मदनलाल कुमावत ः केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले श्री. कुमावत यांनी बहुमळणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे विविध धान्यपिकांची मळणी करता येते, धान्याला आपोआप वारा देऊन ते पोत्यांमध्ये भरणे शक्‍य होते.



किशोर बियाणी ः भारतातील "सॅम वॉल्टन' म्हणून ओळखले जाणारे आणि "फ्युचर' समूहाचे चेअरमन असलेले किशोर बियाणी यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांनी 25 शहरांमध्ये "बिग बझार' मॉलची साखळी उभारली आहे. याद्वारे अन्नधान्यासह शेतीमालाच्या विक्रीला "मॉल'च्या माध्यमातून नवा आयाम दिला आहे.



अंशू गुप्ता ः आपल्या व्यवसायाला सामाजिक अधिष्ठान देऊन श्रीमतांच्या घरांतून वापरात न असलेले कपडे गरिबांपर्यंत पोचवण्याचे काम "गूंज' या संस्थेच्या माध्यमातून श्री. गुप्ता यांनी चालवले आहे. याद्वारे अनेकांना रोजगार तर मिळालाच आहे. पण दर महिन्याला 30 टन वजनाचे कपडे गोळा करून ते गरिबांपर्यंत पोचविले जाते.



केतन पटेल ः ट्रॉयका फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक असलेले श्री. पटेल यांनी जगातील पहिले वेदनारहित आयक्‍लोफेनॅक इंजेक्‍शन विकसित केले आहे. या इंजेक्‍शनमुळे रुग्णाची वेदना कमी केली जाते, तसेच सूजही कमी करता येते.



चिंतनकिंडी मल्लेश्‍याम ः श्री. मल्लेश्‍याम यांनी "लक्ष्मी आसू' यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे हातमागाद्वारे होणाऱ्या वस्त्रनिर्मिती क्षेत्रात नवी क्रांती आली आहे. या यंत्राद्वारे दिवसात सहा साड्या तयार करता येतील इतक्‍या स्वरूपाचा धागा तयार करता येतो. या यंत्रामुळे मानवी श्रम कमी करणे शक्‍य झाले आहे.


http://www.agrowon.com/

Wednesday, November 17, 2010

झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये मोहन जोशी, कुलदीप पवार

झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये मोहन जोशी, कुलदीप पवार

सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: drama, entertainment, chandrapur

चंद्रपूर - दिवाळीपासून एप्रिल महिन्यापर्यंत झाडीपट्टीत चालणाऱ्या नाट्यप्रयोगांना सुरवात झाली असून, बुकिंगसाठी नाट्यकंपन्या आणि आयोजक नाट्यमंडळांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यंदा झाडीपट्टीच्या नाटकात चित्रपट अभिनेते मोहन जोशी आणि कुलदीप पवार दाखल झाले आहेत.
झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात नाटकांचे आयोजन केले जाते. भंडारा-गोंदियात मंडई किंवा यात्रेनिमित्त, तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात शंकरपटांनिमित्त नाटके होतात. गावातील स्थानिक नाट्यमंडळे या नाटकांचे आयोजन करीत असतात. तारीख आणि योग्य नाटक मिळविण्याठी आयोजक मंडळे नाट्यकंपन्यांशी संपर्क साधत आहेत. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नवरगाव, वडसा-देसाईगंज आणि पाथरी येथे नाट्यकंपन्या कार्यरत आहेत. आजघडीला सर्वच कंपन्यांच्या तारखा बुकिंग झाल्या आहेत. वडसा येथील राजसा नाट्य कंपनीच्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या तारखा हाऊसफुल्ल असून, जानेवारी आणि फेब्रुवारीची बुकिंग सुरू असल्याचे नाट्यकलावंत हिरालाल पेंटर यांनी सांगितले. यंदा खरीप पिकात भरघोस उत्पन्न मिळाले असल्याने नाट्यव्यवसाय जोरात आहे. त्यामुळे नाट्यप्रयोगाच्या तारखा बिझी असल्याचे लोकजागृती रंगभूमीचे प्रमुख कलावंत अनिरुद्ध वनकर म्हणाले. मागील वर्षी गाजलेल्या काही नाटकांची यंदाही मागणी असून, काही नवीन नाटकांची भर पडली आहे. मागीलवर्षी नवरगाव येथील व्यंकटेश नाट्यमंडळाचे "आत्महत्या' हे नाटक गाजले होते. प्रसिद्ध नाट्यकलावंत सदानंद बोरकर यांच्या दिग्दर्शनातून यंदा "नवरे झाले बावरे' हा नाट्यप्रयोग सुरू आहे. यशकुमार निकोडे लिखित भानामती, अहंकार, भोवरा या नाटकांनाही चांगली मागणी आहे. त्यांची नाटके चंद्रकमल थिटअर्सद्वारे प्रदर्शित केली जातात. चंद्रकमलने विनाश, काही क्षणाचे सौभाग्य आणि स्पर्श या नाटकांचे यशस्वी प्रयोग केले आहेत. शिवराज नाट्यमंडळाचे गरिबी, संघर्ष तर लोकजागृती रंगभूमीतर्फे घायाळ पाखरा, राजसातर्फे राया गेली वाया, लिलाव, सून सांभाळा पाटलीन बाई आणि अनिल नाकतोडे यांच्या मंडळात झुंज एका वादळाची आदी नाटकांचा समावेश आहे. ही सर्व नाटके स्थानिक नाट्यलेखकांचीच असून, कलावंतही याच मातीतील आहे. महिला कलावंत म्हणून पुणे, मुंबई आणि नागपूर येथील कलावंतांचा समावेश आहे. यंदाही नाटकांची बुकिंग मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्या प्रचारासाठी पत्रके, बॅनरची छपाई सुरू असल्याचे मुद्रणालयाचे संचालक केशव कावळे यांनी सांगितले.

Thursday, November 11, 2010

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे


 यशवंतराव चव्हाण - १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
                                         शंकरराव चव्हाण

                                        वसंतदादा पाटील




 शरद पवार



 सुशील कुमार शिंदे
 विलासराव देशमुख
अशोक चव्हाण
मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार नारायण राणे


 
मनोहर जोशी

Wednesday, November 10, 2010

पृथ्वीराज चव्हाण यांचा अल्पपरिचय

पृथ्वीराज चव्हाण यांचा अल्पपरिचय

नाव - पृथ्वीराज चव्हाण

वडिलांचे नाव - आनंदराव चव्हाण

आईचे नाव - श्रीमती प्रेमलाताई चव्हाण

जन्मतारीख - 17 मार्च 1946

जन्मठिकाण - इंदोर (मध्यप्रदेश)

पत्नीचे नाव - श्रीमती सत्त्वशीला

मुले - एक मुलगा, एक मुलगी

कायमचा पत्ता - पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड. जि. सातारा (महाराष्ट्र), 415410.

सध्याचा पत्ता - 11, रेस कोर्स रोड, नवी दिल्ली 110001.


शिक्षण - कऱ्हाड नगरपालिका शाळा क्रमांक सातमध्ये सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली येथे, त्यानंतर बी. ई. (ऑनर्स), एम. एस. (बीआयटीएस) पिलानी (राजस्थान) आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ (अमेरिका).

व्यवसाय - इंजिनिअर, टेक्‍नॉलॉजिस्ट



कारकीर्द

1991-1995, 1995-1998 - लोकसभा सदस्य, सायन्स व टेक्‍नॉलॉजीच्या मंत्रालयाचे सल्लागार समिती सदस्य

1992-93 - इलेक्‍ट्रॉनिक ऍटोमिक एनर्जीचे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य

1994-1996 - सायन्स, माहिती आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वनखात्याच्या मंत्रालयातील सल्लागार समितीचे सदस्य

1995-96 - अर्थ आणि नियोजन मंत्रालयातील स्थायी समितीचे सदस्य, ग्रामीण आणि शहरी भाग मंत्रालयातील रचनात्मक विकास समितीचे सल्लागार सदस्य, सार्वजनिक विकास क्षेत्रातील समितीचे सल्लागार सदस्य, कनिष्ठ कायदा मंडळाचे विशेष निमंत्रीत, व्यवसाय मार्गदर्शन समितीचे सदस्य

1996-99 - कॉंग्रेसचे सचिव, संगणक पुरवठा समिती सदस्य

1997 - विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मूलभूत विकासासह त्याच्या धोरणाच्या अंमलबजावणी समितीचे सल्लागार सदस्य

1998-99 - राज्यसभा सदस्य. केंद्रीय गृहखात्याच्या विविध धोरणांच्या समितीचे सदस्य, 1998-99 व एप्रिल 2002 ते फेब्रुवारी 2004 ः अर्थ नियोजन समितीचे सल्लागार सदस्य. 2000-2001 - कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते.

एप्रिल 2002 - राज्यसभा सदस्य

ऑगस्ट 2002 ते फेब्रुवारी 2004 - संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य

मे 2004 ते 22 मे 2009 व 28 मे 2009 ते आजपर्यंत - पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री



क्रीडा व अन्य क्षेत्र -

सदस्य- इंडियन इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली, इंडियन हॅबीटॅट सेंटर नवी दिल्ली, जिमखाना क्‍लब नवी दिल्ली

परदेश दौरे - अमेरिका, फ्रान्स, जपान, इंग्लंड, पाकिस्तान, बांगला देश, तैवान, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, ओमन, बहामास, चीन, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, इटली, मलेशिया, नेदरलॅंड, पनामा, पोतुर्गाल, सिंगापूर, स्विर्त्झलॅंड, तजाकीस्तान, थायलंड.



पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असलेली सध्याची खाती -

* पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री

* विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

* भूविकास शास्त्र विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

* पर्सोनेल पब्लिक ग्रॅव्हन्सी ऍण्ड पेन्शन विभागाचे राज्यमंत्री

* संसदीय कार्यालयीन मंत्री

 
पृथ्वीराज चव्हाण -


अभ्यासू, देशपातळीवर काम केलेला नेता अशी प्रतिमा.

निर्विवाद निष्ठावान घराणे.

वडील दाजीसाहेब ऊर्फ आनंदराव चव्हाण हे पंडित नेहरूंपासून 11 वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात.

आई प्रेमलाकाकी चव्हाण खासदार.

1991, 96 आणि 98 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी.

2002 पासून आजपर्यंत राज्यसभा सदस्य.

2004 मध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री.

2009 पासून केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान कार्यालयाबरोबरच विज्ञान तंत्रज्ञान, संसदीय कार्य, कार्मिक आदी खात्यांचे राज्यमंत्री.

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस.

हरियाना आणि जम्मू-काश्‍मीर राज्याचे प्रभारी.