|
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे
जन्म :- २६ डिसेंबर १९१४
मृत्यू - ९ फेब्रुवारी २००८ |
हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
बाबा आमटे
यांच्या चार ओळी आपल्या सर्वांसमक्ष प्रस्तुत करत आहे.
झेपावणार्या पंखांना क्षितिजं नसतात,
त्यांना झेपेच्या कवेत येणारे आकाश असते.
सृजनशील साहसांना सीमा नसतात,
त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते.
अशी सृजनशील साहसे हवी आहेत,
जी बीजे पेरून बाट पाहू शकतील,
जी भाग ठेऊन भविष्य आखतील,
अन् बेभान होऊन वर्तमान घडवतील.....
--बाबा आमटे.
सर्वसामान्य माणूस दहा जन्मांतही जेवढे काम करू शकणार नाही, एवढे - व्याप्ती, उंची व खोली या सर्व दृष्टिकोनांतून - भव्य कार्य उभे करणारे श्रेष्ठतम समाजसेवक!
कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे आनंदवन आश्रमाची स्थापना करणार्या मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. १९३४ साली बी.ए. व १९३६ साली एल. एल. बी. ही पदवी त्यांनी संपादन केली. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रमही पूर्ण केला.
गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासहइतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली, आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्र्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये भारत जोडो अभियान योजले होते. या अंतर्गत त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.
असाध्य गोष्टींना स्वत:हून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. त्या अंत:प्रेरणेतून १९५१ साली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते कुष्ठरोग्याचे आयुष्य. प्रत्येक कुष्ठरोग्याला आपल्या कुशीत सामावून घेऊन त्याची केवळ सेवा-सुश्रुषाच करण्याचीच नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठीमहाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. (आजही ही केंद्रे कार्यरत आहेत.) देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, या बा. भ. बोरकरांच्या ओळीचा देखणा प्रत्यय या प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण - संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणार्या नद्या-नाले, जंगली श्र्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवार्याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली.
भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश व स्नुषा डॉ. मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ. प्रकाश व डॉ. सौ. मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवित आहेतच. हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे.
पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, रेमन मॅगसेसे पुरस्कार, टेंपल्टन पुरस्कार, आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार, जे. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशा असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्करांनी बाबांना गौरविण्यात आले.(प्रकाश व मंदा आमटेंनाही ऑगस्ट, २००८ मध्ये मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.) या महान जगावेगळ्या विराग्याने स्वत:ला मिळालेल्या पुरस्कारांची सर्व रक्कम (कोटयवधी रुपये) फक्त समाजकार्यासाठीच वापरली.
६ कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन याआधारे लावलेल्या रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या कार्यात बाबांच्या पत्नी श्रीमती साधनाताई यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे. साधनाताईंनी लिहिलेल्या समिधा या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणार्या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. समिधातून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.
बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कार्यरत असूनही त्यांनी ज्वाला आणि फुले आणि उज्ज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते. त्यांच्या विधायक कार्याला सौंदर्याचे परिमाण लाभले होते ते त्यांच्या प्रतिभेमुळेच! 'Our work is a Poem in action', असे स्वत: बाबा म्हणत असत.
संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्र्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प कमालीचे यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, उर्जा मिळाली. बाबा आनंदवनात मित्रमेळ्याचे आयोजन करत असत. या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहत असत. यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले, कामांना दिशा मिळाली.
समाजाने नाकारलेल्या उपेक्षितांना मोठ्या अंत:करणाने, मायेने आपल्या पंखाखाली घेऊन,त्यांना नवसंजीवनी देणारा हा महान कर्मयोगी फेब्रुवारी, २००८ मध्ये अनंतात विलीन झाला. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश, विकास आमटे व त्यांचे परिवार) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने, सातत्याने कार्यरत आहेत.
ताठ कण्याने जीवनाला सामोरे जाणारे बाबा हे प्रत्यक्षात अत्यंत हळव्या मनाचे कवी होते. 'ज्वाला आणि फुले', 'उज्वल उद्यासाठी' आणि 'करुणेचा कलाम' हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
कसं जगावं ते सांगणारे त्यातील काही अंश...
.........
... माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदुमात्र मी क्षुद खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडीवरती
नांगर धरूनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुभिर्क्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेत अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षणक्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवी क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...
... पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निमिर्तीच्या मुक्तगंगा, द्या इथे मातीत वाढू
नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते...
.. निबिडातून नवी वाट घडवण्याचे जीवनाचे आव्हान जेव्हा मी स्वीकारले
तेव्हाच त्याची चाहूल माझ्या पाठीशी असलेली मला जाणवली
अपयशांनी फेसाळलेला माझा चेहरा पाहून
आता मी कधीच हताश होत नाही
कारण जीवनाचा उबदार हात माझ्या पाठीवर फिरतच असतो
वाहणाऱ्या प्रवाहात मी आपले बिंदुत्व झोकून दिले आहे
कड्यावरून कोसळताना
आता मला कापरे भरत नाही
कारण माझ्यातला सागर सतत गर्जना करीतच असतो
भरती आणि ओहोटी यांनी तो विचलित होत नाही
कारण भरती ही जर माझी कृती आहे
तर ओहोटी ही विकृती कशी म्हणता येईल?
भरतीच्या लाटांनी मी जीवनाला आलिंगन देतो
आणि ओहोटीच्या हातांनी त्याचा पदस्पर्श करतो
आणि निबिडातल्या एकान्त साधनेत पूर्ववत् गढून जातो.
-------------------------------------------------------------------------------------------------------
बाबांच्या नंतरचे आनंदवन!
बाबा आणि साधना आमटे यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष त्यांच्याच हयातीत झाला. या वटवृक्षाच्या पारंब्याही 'आनंदवना'च्या बाहेर रुजल्या, फोफावल्या. आणखी नव्या रुजत आहेत. बाबांची मुलेसुना डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आणि डॉ. विकास व डॉ. भारती हे बाबांच्या कामात आले त्यालाही कित्येक वषेर् उलटली. आता तिसरी पिढी या कामात जोमाने उतरली आहे. बाबांना जाऊन वर्ष उलटून गेले. त्यांनी सुरू केलेली सारी कामे नेटाने चालू आहेतच. नवी उभी राहतायंत. या साऱ्याविषयी सांगतोय 'आनंदवना'तच रमलेला त्यांचा नातू...
बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या वरोरा इथल्या महारोगी सेवा समितीच्या कामाचा परिचय सर्वांना आहेच. बाबांनी कुष्ठरुग्णांसाठी १९४९मध्ये चंदपूर जिल्ह्यात वरोरा या तालुक्याच्या ठिकाणाजवळ आनंदवनात ही संस्था सुरू केली. तिचे कार्यक्षेत्र कुष्ठरुग्णांवरील उपचार, त्यांचे प्रशिक्षण आणि मानसिक, सामाजिक व आथिर्क पुनर्वसन याबरोबरच अंध, अपंग, मूकबधिर यांच्यासाठीही विस्तारले. या सर्वांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन ही कामेही समितीने आपली मानली. त्यानंतर समाजातील अनाथ, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार उपेक्षित घटकांना आधार देऊन समितीचे कार्यकतेर् माडिया गोंड या आदिवासी जमातीपर्यंत पोहोचले. या आदिवासींना शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा तर देण्यात आल्याच पण शेती करण्याचे आणि अन्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम संस्थेने केले. त्याचप्रमाणे पूर, भूकंप अशा नैसगिर्क आपत्तींमध्ये सापडलेल्या जनतेच्या मदतीला संस्था त्या त्या वेळी धावून गेली. या कामातील नवा अध्याय म्हणजे, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांपासून समितीने काम सुरू केले आहे. या कामाचा मुख्य हेतू, विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देता यावा आणि शेतीच्या अर्थशास्त्रात काही नवा मार्ग काढता यावा, हा आहे. या नव्या कामाला आता हळुहळू आकार येतो आहे.
समितीच्या साऱ्या कामाचा भर कुष्ठरुग्ण किंवा अपंग यांच्या साऱ्या क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यावर आहे. त्यामुळे, संस्थेत राहिलेल्या ज्या ज्या व्यक्तीने काही ना काही व्यावसायिक कौशल्य आत्मसात केले ते संस्थेत स्वाभिमानाने कार्यरत राहिले. शिवाय, त्यातल्या अनेकांनी बाहेर जाऊनही आपली कुवत समाजाला दाखवून दिली. बेकारीचे संकट समाजाला ग्रासत असताना अपंगांनी केलेली ही कामगिरी उठून दिसणारी आहे.
संस्थेतील रहिवाशांच्या कामाची नुसती यादी केली तर शेतीमधून धान्य, भाजीपाला, फळे, दुग्धशाळेतून दूध, इमारत बांधणीचे तंत्र व कौशल्य, त्यात आवश्यक असणारे लाकूडकाम व लोखंडकाम, इमारतींमधील इलेक्ट्रिक फिटिंग, याशिवाय, बॅगा, चपला, बॅन्डेज, कापड, शुभेच्छा पत्रे, वह्या, रजिस्टर लेटरपॅड, पाकिटे यांची निमिर्ती...अशी ही यादी न संपणारी आहे. या श्रमशक्तीमुळेच आनंदवनाच्या बहुतेक गरजा तिथेच भागवल्या जातात. यातली सर्वांत महत्त्वाची गरज असते ती पाण्याची. आज आनंदवनातील तीन हजार रहिवासी, दुभती जनावरे, इतर पशुधन, शेती, फळफळावळ यांची पाण्याची गरज तर भागतेच. याशिवाय, आनंदवनातील विज्ञान, कला व वाणिज्य तसेच कृषि महाविद्यालयीन विद्याथीर् आणि प्राध्यापकांचीही पाण्याची गरज भागते. कॉलेजच्या प्रयोगशाळा, शेती कॉलेजचे शेत यांनाही आनंदवनातीलच पाणी पुरते. साध्या विहिरी, कूपनलिका आणि तलावांची साखळी यांतून हे पाणी पुरवले जाते. धरण किंवा कालव्याचे पाणी न आणता भर उन्हाळ्यात 'आनंदवना'तील ५० एकर जमीन सिंचनाखाली असते, हे आवर्जून सांगावेसे वाटते.
बाबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही सारी कामे. आता बाबांचे निधन होऊन एका वर्षापेक्षा अधिक काळ लोटला. मात्र, यातले एकही काम थांबलेले नाही. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे बाबांनी उभी केलेली जिवाभावाच्या कार्यर्कत्यांची लढाऊ पण तितकीच समर्पणशील फौज. या सर्वांच्या कामाची पद्धतही बाबांनीच आखून दिली आहे. यामुळेच आजही कित्येक देशी-विदेशी विद्याथीर्, स्वयंसेवक व एमबीएचे विद्याथीर् संस्थेचे व्यवस्थापन समजावून घेण्यासाठी 'आनंदवन' तसेच इतर प्रकल्पांत येतात. फार पूवीर्पासून प्रशिक्षण चालू असताना केंदीय प्रशासकीय सेवेतील अधिकारीही इथे येतात.
तुटपुंजे औपचारिक शिक्षण असणारे अपंग बांधव आपल्या कामाने समाजापुढे सकारात्मक उदाहरण ठेवतात. म्हणूनच विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात झरी-जामणी तालुक्यात मूळगव्हाण या खेड्याजवळ एक नवा प्रकल्प संस्था उभारत आहे. कोलाम या विदर्भातील आदिवासी जमातीची या गावात बहुसंख्या आहे. तिथे मुख्यत: सूक्ष्म पाणलोट विकास व जल व्यवस्थापनातून शाश्वत शेती विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. याचबरोबर प्राथमिक तसेच तातडीची आरोग्यसेवा इथे दिली जाते. तसेच, शिवणकला, संगणक प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत. या कामाचा एक भाग म्हणून प्लॅस्टिक, वाहनांचे जुने टायर अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करून अत्यंत कमी खर्चात बंधारा बांधण्यात आला. लोकांच्या सहभागातून हा बंधारा झाल्याने मूळगव्हाणला परिसरातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच गव्हाचे पीक घेतले. सूक्ष्म पाणलोट विकास व जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून आजवर दोनशे एकरांपेक्षा अधिक शेतजमिनीवर चार लहान-मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ३६ अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. शेतीचा शाश्वत विकास हाच या सामाजिक प्रकल्पाचा ध्यास आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना आज नेमकी अशाच कामाची गरज आहे.
यवतमाळ जिल्ह्यातले संस्थेचे हे काम सर्वांत नवे असले तरी चंदपूर, गडचिरोली, नागपूर व यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या विविध प्रकल्पांत पाच हजार जणांचा संसार गेली अनेक वषेर् चालला आहे. हे शिवधनुष्य समितीने अर्थातच समाजाच्या सहकार्यातून, देणग्यांमधून पेलले. तसेच, अन्नधान्यापासून चपलांपर्यंत, फनिर्चरपासून कपड्यांपर्यंत आणि स्टेशनरीपासून दुधापर्यंत बहुतेक गरजा आम्ही इथेच भागवतो. यातून संस्थेने मोठे स्वावलंबन गाठले असले तरी वीज, खाद्यतेले, चहा, साखर, मीठ, इंधन, औषधे, जुन्या इमारतींची देखभल व डागडुजी या साऱ्यांसाठी रोख पैसा लागतोच. यातील काही बाबींसाठी मर्यादित अनुदान मिळत असले तरी ते पुरेसे नाही. शिवाय, त्यात अनियमितता आहे.
संस्थेला मिळणाऱ्या देणग्या पैशाची अडचण दूर करतात, यात शंकाच नाही. पण बाबांच्या पाठीमागे या सर्व कामाला एक शाश्वत आथिर्क स्थैर्य लाभावे, असे आम्हा कार्यर्कत्यांना वाटते. त्यासाठी हवा आहे एक कायमस्वरूपी निधी (कॉर्पस फंड.) संस्थेचा व्याप लक्षात घेऊन आम्ही केंद सरकारच्या अर्थखात्याकडे ३७ कोटी ५० लाख रुपयांचा कायमस्वरूपी निधी उभारण्याची अनुमती मागितली होती. अर्थखात्याने नुकतीच ही मान्यता कळवली आहे.
या कायमस्वरूपी निधीला देणगी दिल्यास कंपनी, व्यावसायिक व पगारदार या साऱ्यांनाच प्राप्तिकरातून सवलत मिळणार आहे. हा कायमस्वरुपी निधी उभा राहिल्यास बाबांनी सुरू केलेल्या कामांची मजबुती आणि विस्तार करता येईल, असा विश्वास आम्हा तरुण कार्यर्कत्यांना वाटतो आहे. 'महारोगी सेवा समिती, वरोरा' या नावाने काढलेला धनादेश आनंदवन, ता. वरोरा जि. चंदपूर, ४४२ ९१४ इथे पाठवता येईल.
बाबा आणि माझी आजी साधना आमटे यांनी अनेक दशके केलेले काम त्यांच्या मुला-सुनांकडून आता माझ्या पिढीपर्यंत येऊन पोहोचले आहे. मी आणि माझी भावंडे बाबांचे आणि आमच्या आईबाबांचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. या कामाला सर्वांचे आशीर्वाद मिळावेत, अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्र तसेच जगभरातील लाखो लोक गेल्या साठ वर्षांत 'आनंदवना'त येऊन गेले आहेत. आजही येत आहेत. चार जिल्ह्यांमध्ये चालू असणाऱ्या संस्थेच्या प्रकल्पांमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२००८ मध्ये साधनाताई आमटे यांना चतुरंग प्रतिष्ठानचा पुरस्कार आनंदवनातच प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्त पसिद्ध करण्यात आलेल्या विशेष पुस्तिकेसाठी घेतलेल्या मुलाखतीत आपल्या लहानपणीच्या तसेच बाबांसोबतच्या खडतर जीवनाच्या काही आठवणी साधनाताईंनी सांगितल्या होत्या.
मूळच्या तुम्ही कर्मठ घरातल्या. मात्र करुणेचा पाझर तुमच्या मनात लहानपणापासूनच होता. त्याबाबची एखादी आठवण सांगा.
माझ्याकडे सेवावृत्ती आणि करुणा पहिल्यापासूनच आहे; ते काही मी बाबांकडून शिकले नाही. जात-पात, धर्म पाळायचा नाही हे मी बाबांकडून शिकले. तुम्ही माझ्याकडून करुणा शिका, असं मी बाबांना म्हणते. लहान असताना आमच्यासमोर म्युनिसिपालिटीचा नळ होता. त्या नळावर पाणी भरायला बायका यायच्या. स्पृश्य एका बाजूला बसायच्या आणि अस्पृश्य एका बाजूला. नळ गेला की अस्पृश्य बायका तशाच रहायच्या. हिरमुसल्या व्हायच्या. त्यावेळी मी असेन नऊ-दहा वर्षांची. मला खूप दया यायची. पण माझ्यावर इतके कर्मठ संस्कार होते की, नुसता थेंब जरी उडाला, कपडे जरी लागले, तरी आंघोळ करायची. स्वत:मध्ये बंडखोरी नव्हती. आमच्या अंगणात विहीर होती. अस्पृश्य बायकांना लांब बसवून त्यांची सर्व मडकी मी पूर्ण भरून द्यायची. असं अनेकदा व्हायचं.
समाजसेवेला वाहून घेतलेल्या बाबांसोबत संसार करताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यातल्या काही सांगा.
साम्ययोगाच्या प्रयोगादरम्यान आमचं जीवन कष्टाचं होतं. घरात काय होतं? फक्त लोणच्याच्या बरण्या होत्या. प्रकाशच्या वेळी नऊ महिने पूर्ण होत असताना एकदा लिंबाच्या लोणच्याची बरणी काढायला गेले आणि बरणी घेऊन धाडकन् जमिनीवर पडले. बरणीचा चुराडा. खाली असलेला कंदील, कपबशी यांचा चुरा झाला. माझं डोकं फुटलं. रात्री डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी माझे बरेच केस कापले आणि स्टिच घातले.
बाबांसोबत कोणत्या विषयावर मतभेद आहेत?
मतभेद असे नाहीत. जे आहेत, ते आपण अॅक्सेप्टच केलं आहे. आता मतभेद म्हणजे, काही गोष्टी आवडत नाहीत बघा. ज्या गोष्टी मला नीट, बाबांपेक्षा जास्त समजतात, त्या मला सांगितल्यावर खूप राग येतो. कोणी आलं, गेलं की त्यांच्याबरोबरचे ड्रायव्हर, मदतनीस यांना जेवण दिलं की नाही, असं विचारतात. मी आता म्हणते, असं विचारणं हा माझा अपमान आहे. तुमच्यापेक्षा जास्त समजतं मला!
आयुष्यातल्या अस्थिरतेबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का?
नाही... मी कधी विचारच केला नाही. आम्ही सगळं डिसओन केलं. बंगला वगैरे ज्याचं त्याला देऊन टाकलं. माझ्या मुलांना आज एक हक्काची झोपडीही नाही. आमच्याकडे दया-करुणा पूवीर्पासूनच आहे. त्यामुळे फाटक्यातुटक्या कपड्यातली मुलं पाहिली की मला गिल्टी वाटतं...माझ्या मुलांचं बालपण असंच निघून गेलं.. कधी बिस्किटांचा पुडा नाही की स्वेटर्स नाहीत. माझे ब्लाउज घालून पोरं निजायची, थंडी वाजते म्हणून!
आनंदवनाच्या यशोदा
नागपूर येथील कृष्णशास्त्री घुले यांची इंदू ही मुलगी. इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण. इंदूचा जन्म पाच मे 1926 चा. पुढे 18 डिसेंबर 1946 ला बाबा (मुरलीधर) आमटे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या साधनाताई आमटे झाल्या. त्यांना डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास ही दोन मुले आहेत. अत्यंत संपन्न परिवारातील साधनाताई, बाबांनी प्रचलित रूढी आणि परंपरेच्या विरोधात आरंभलेल्या यज्ञात तेवढ्याच समर्पितपणे अंतिम क्षणापर्यंत सहभागी झाल्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्या आनंदवनाच्या यशोदा म्हणूनच वावरल्या. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांना त्यांनी मायेची उणीव जाणवू दिली नाही. सबंध देशात समाजकार्याचा आदर्श असलेल्या आनंदवनाच्या उभारणीसाठी त्यांनी आयुष्यभर प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या. त्यांनी "समीधा' हे आत्मचरित्र लिहिले आहे. ते हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांतून प्रकाशित झाले आहे. नऊ फेब्रुवारी 2008 रोजी बाबांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आनंदवनातील निराधारांना प्रेमाची, मायेची उणीव भासू दिली नाही. बाबा गेल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने आनंदवनाचा आत्माच होत्या. त्यांच्या निधनाने आता आनंदवनाचा आत्माच हरवला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुष्ठरुग्णांच्या झडू पाहणाऱ्या आयुष्यात चैतन्याची फुंकर मारण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या बाबा आमटे नावाच्या वादळाला साथ करणे, ही सोपी गोष्ट नव्हती. ती साध्य करणाऱ्या साधनाताईंनी परस्परपूरक सहजीवनाचाही एक आदर्श निर्माण केला. बाबांएवढ्याच उत्कटतेने त्यांच्या कार्याशी समरस झालेल्या असूनही त्यांनी आपले स्निग्धपण जपले. त्यांच्या जाण्याने करपलेल्यांचे जगणे अभंग करणारी प्रसन्नता लोप पावली आहे. आपल्या सहवासाने जखमांनाही ममत्वाचा सुगंध देणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या आड गेले आहे. श्रमनगरीतील सच्च्या पाईकांना शोकाकुल करून टाकले आहे. भामरागड पल्याडच्या आदिवासी प्रदेशात मानवतेची नवी पहाट जागविण्याची बाबांना लागलेली ओढ पूर्ण करण्यात साधनाताईंच्या मातृहृदयी प्रयत्नांचा मोठा वाटा होता. दुर्लक्षित प्रदेशातील जगण्याच्या औचित्यांचा शोध बाबांनी घेतला. त्यांच्या या संकल्पातील घट्टपणा ताईंच्या सोशीकतेने तोलून धरला होता.
बाबांच्या इच्छाशक्तीतून स्फुरलेल्या कल्पनांचा सरधोपट अंमल आखीव वळणावर नेऊन ठेवण्याचे महत्कार्य ताईंनी केले. बोलणे म्हणजे काय, याचा मुळीच गंध नसलेल्या आनंदवनातील आद्य रहिवाशांना पुढे अनेक सन्माननीयांपुढे बेधडक व्यक्त होण्याचे धडे खऱ्या अर्थाने ताईंच्या सहजवृत्तीने दिले. अविश्रांत श्रमाला मिळणाऱ्या परम आदरामुळे आनंदवनातील कुष्ठरुग्णांमध्ये आत्मतेजाचे स्फुल्लिंग चेतविले गेले होते. अडचणी निर्माण करणाऱ्या अनेकांचे गंड आपल्या अथक सेवेतून नेस्तनाबूत करण्याचा पायंडा आनंदवनाने घालून दिला होता. बाबांच्या वज्रनिर्धाराने अपंगांमधील न्यूनगंड नाहीसा झाला. ताईंच्या ममत्वाने अशा शेकडो अपरिचितांना जगण्याची नवसंजीवनी दिली. बाबांची जिद्द आणि साधनाताईंची सहृदयता यांचा हा संगम एवढा अद्भुत होता की, हातापायाची बोटे गळालेल्या महारोग्यांनी "अवसान गळणे' हा शब्दच आपल्या उर्वरित आयुष्यातून हद्दपार करून टाकला. एखादे काम करताना त्यात पूर्णपणे झोकून देणे, हा बाबांचा स्थायी भाव होता. अशा कार्यातील अनेक मानवी अडथळ्यांचा सामना करताना कमालीचे संतप्त झालेले बाबा अनेकांनी अनुभवले होते. त्यांच्यापुढे कसे जायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडायचा. अशा समयी शांत आणि समन्वयी भूमिका घेणाऱ्या साधनाताईंचा आधार कार्यकर्त्यांना वाटत असे. निराधारांचे काळोखी जग उजळून टाकण्याच्या बाबांच्या सर्व संकल्पांना नंदादीपातील पणतीप्रमाणे शांतपणे तेवत साधनाताईंनी बळ दिले होते. बाबांची निष्ठा मेहनतीवर होती. पूजाअर्चांचे अवास्तव स्तोम त्यांना मान्य नव्हते. परंपरागत कर्मठ कुटुंबातून आल्यानंतरही ताईंनी आपल्या सर्व श्रद्धा बाबांवर समर्पित केल्या. बाबांना देव मान्य नव्हता. ताईंनी बाबांच्याच कार्यात देव शोधला. त्यांच्या नेमक्या या सात्विक आणि संवेदनशील स्वभावाचे गारुड बाबांनी मोठ्या अभिमानाने मिरविले. सेवेचा सहवास सोपविण्याने वृद्धिंगत होतो, थोपविण्याने नव्हे; हे मर्म ताईंनी खऱ्या अर्थाने ओळखले होते. अवघड कार्यालाही साधेपणाची जोड देण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रत्येक दुःखात एक सर्वस्पर्शी आवाहन असावे, हा त्यांचा आग्रह होता. व्यथा आणि वेदनांशी त्यांनी आपणहून जोडलेल्या नात्यावर आयुष्याच्या कोणत्याही वळणांवर खंत, खेद वा विषादाची अस्पष्ट लकेरही उमटू दिली नाही. केवळ आनंदवनच नव्हे, तर सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा, नागेपल्ली आदी सेवाप्रकल्पांवर राबणाऱ्या शेकडो हातांना त्यांनी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे दान मुक्तहस्ते वाटले. अशा सर्व सेवकांना व्यथासंपन्न आयुष्यातही हसरेपण न विसरणाऱ्या साधनाताई सदोदित आठवत राहणार आहेत. प्रेम, सहानुभूती, दयेहून दुसरे अमोघ अस्त्र नाही, या जीवनसंहितेवर ताईंचा जीव होता. त्यांच्या लेखणीतूनही ही सौहार्दता पुरेपूर झळकली आहे. अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचे आनंदवनासोबतचे स्नेहबंध क्षीण होऊ न देण्यात ताईंच्या पत्रव्यवहारांनी मोलाची भूमिका बजावली होती. आनंदवनाला भेट देणाऱ्या देशविदेशातील मान्यवरांना त्यांच्या निकोप स्वभावाचे सतत आकर्षण वाटत होते. आदिवासी प्रांतातील साध्याभोळ्या माडियांनी त्यांच्यात "आई' शोधली. शरीराची नासधूस झाल्याने जीवलगांना पारखे झालेल्या कुष्ठरुग्णांना त्यांच्यातील करुणेने जीव लावला. नर्मदा तीरावरील बाबांच्या वास्तव्यात त्या सोबत होत्या. गांधी-विनोबांच्या शिकवणुकीप्रमाणे त्या वागल्या. समाजातील अतिसामान्यांनी आपल्यावर अधिकार गाजवावा, असा उत्कट सहवास त्यांनी क्षणोक्षणी सर्वांना दिला. यातनाहीनांना स्वप्ने नसतात, असे बाबा म्हणत. बाबा नसते तर आयुष्य बेचव आणि मिळमिळीत झाले असते, ही ताईंची भावना होती. आधी बाबा गेले. आता ताईही नाहीत. आमटेंची नवी पिढीही समाजसेवेत उतरली आहे. "या भूमीला क्षरण नाही', हा आनंदवनातील सेवाव्रतींचा विश्वास त्यामुळेच अक्षुण्ण राहणार आहे. समाजकार्य उभे करण्यासाठी संसार उधळून टाकावा लागतो, हा समज आमटे दाम्पत्याने खोटा ठरविला. कारण त्यांत "ज्वाला' होती आणि ती पेलणारे "फूल'ही
------------
विशेष ओळख :
‘आमटे कुटुंब’ म्हणजे
महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी कुटुंब.
बाबा आमटे-साधनाताई आमटे
यांचा समाजकार्याचा वसा त्यांची
मुले-नातवंडे समर्थपणे सांभाळत
आहेत. याच कुटुंबातील कार्यकर्ती
सून भारती आमटे यांचं हे शब्दचित्र.
‘आनंदवनाच्या वहिनी’ म्हटल्यावर जे रूप समोर यावे असे वाटते अगदी तसेच त्यांचे रूप आहे. स्नेहशील सौदर्ंय, डोळ्यातून सांडत, ओठातून उमटताना समोरच्याला आश्वासक करणारे हसू आणि शांत स्वरातले बोलणे! अशा या आनंदवनातल्या, आनंदवनाच्या वहिनी- भारतीवहिनी!
डॉ. भारती आमटे ही खरी तर त्यांची ओळख! पण त्या आधी कुटुंबातील नात्यांच्या विणींतून त्या अधिक परिचयाच्या झाल्या होत्या. म्हणजे बाबा आमटे-साधनाताईंची सून, विकासभाऊंची पत्नी, पंडित नेहरूंच्या काळातील राज्यसभेचे खासदार भाऊसाहेब वैशंपायन यांची कन्या. आणि गेल्या दशकातली त्यांची ओळख म्हणजे कौस्तुभ व डॉ. शीतल आमटे यांची आई! इरावती कर्व्यांच्या ‘परिपूर्ती’ लेखाची आठवण करून देणारी ही ओळख. एक डॉक्टर म्हणून, एक व्यक्ती म्हणून भारतीताईंना जाणून घ्यायची ओढ, आनंदवनाला पहिली भेट दिली, तेव्हापासून मनात होती. प्रत्यक्षात योग आला जुलै २०१२ मध्ये. एक योजना घेऊन वसईचा आमचा ग्रुप पाच-सहा दिवस आनंदवनात राहिला तेव्हा भारतीताईंची भेट झाली. दोघींत संवादाचे छान सूर जुळले. आपली आनंदवनाची पहिली भेट, लग्न, बालपण, माहेर, विवाहानंतरचा काळ, डॉ. विकास यांच्याबरोबरचे आपले सहजीवन. आपले आईपण, आपला आनंदवनाच्या कामातला सहभाग अशा अनेक विषयांवर गप्पांच्या ओघात त्या मोकळेपणाने बोलल्या.
भारतीताईंनी आमट्यांच्या घरात पाऊल टाकले ते माहेरचे मानवतावादी विचारांचे व समाजसेवेचे संस्कार घेऊनच. त्यांचे आई-वडील दोघे स्वातंत्र्यसैनिक. रामानंदतीर्थ स्वामींच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, वाघमारे यांच्याबरोबर भारतीताईंचे वडीलही हैद्राबाद मुक्तीसंग्रामात सहभागी झाले होते. १९४२ मध्ये त्यांचे लग्न झाले होते तरी प्रत्यक्षात त्यांचा संसार सुरू झाला मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर. २५ डिसेंबर १९५२ चा भारतीताईंचा जन्म. वडील भूमिगत राहून देशकार्य करत असताना आईने शिक्षकीपेशा स्वीकारून, कष्टातून संसार सांभाळला. देशकार्यासाठी अंगावरचे सोने देऊन टाकले. आईवडील देशकार्यासाठी झटताहेत, दलित मुलांना शिकवताहेत, चतुर्थश्रेणीच्या कर्मचार्यांशी प्रेमाने, आदराने वागताहेत हे पाहत त्या मोठ्या झाल्या. त्यात वडिलांनी खाऊ म्हणून हातावर नेहमी तर्हेतर्हेची पुस्तके ठेवली; अद्भुतरम्य गोष्टींपासून ‘फ्रेंच राज्यक्रांती’सारख्या विषयावरील पुस्तकापर्यंतची. क्रांतिकारकांची चरित्रे वाचताना आत्मशक्तीची जाण वाढत गेली. कॉलेजात गेल्यावर जयश्री कुलकर्णी, मंगल सांगवीकर या मैत्रिणींबरोबर ‘साधना’, ‘माणूस’सारख्या साप्ताहिकांचे वाचन होऊ लागले, सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा होऊ लागल्या. ‘आपण समाजाचे देणे लागतो’ हा विचार मनात दृढ होऊ लागला. ‘साप्ताहिक साधना’मधून यदुनाथजी थत्ते यांनी आनंदवनाचा, बाबांच्या कार्याचा करून दिलेला परिचय तिघी मैत्रिणींच्या वाचनात आला त्याच वेळी त्यांना भेटायची तीव्र इच्छा तिघींच्या मनात निर्माण झाली. दोघी मैत्रिणी आनंदवनात जाऊन बाबांना भेटूनही आल्या. भारतीताईंना मात्र तेव्हा जाणे शक्य झाले नाही. त्या एम.बी.बी.एस. झाल्या. पेडिऍट्रिक्सच्या चार हाऊसपोस्ट्स त्यांनी केल्या. १९७५ मध्ये एकदा हिंगणघाटला मैत्रिणीकडे त्या आल्या असताना आनंदवनात जायचा योग आला. त्या आणि त्यांच्या आई वरोरा स्टेशनवर उतरल्या तेव्हा धुवांधार पाऊस कोसळत होता. कमरेएवढ्या पाण्यातून चालत त्या आनंदवनात पोहोचल्या तेव्हा बाबा नेमके सोमनाथला गेलेले होते. साधनाताई पत्रे वाचत बसलेल्या होत्या. त्यांनी विचारपूस केली. दोघींना बदलायला साड्या दिल्या. सिंधूमावशींना चूल पेटवायला सांगून गरम चहा दिला. डॉ. विकासना बोलावून त्यांची भेट करून दिली, त्यांच्याकडून आनंदवनाची माहिती घेऊन मायलेकी परतल्या अन् महिनाभरात ताईंकडून विकाससाठी भारतीला मागणी घालणारे पत्र वैशंपायनांकडे आले. डॉ. विकास आनंदवनातच राहील व कुष्ठरोग्यांच्या क्षेत्रातच काम करील हे त्यांनी स्पष्टपणे लिहिले होते.
‘केवळ पैशासाठी प्रॅक्टीस करणे व अवाच्या सव्वा पैसे मिळवणे हा गुन्हा आहे’ असे भारतीताईंचे मत होतेच. पण आपल्या लेकीला खडतर आयुष्य जगायला लागेल यामुळे वडील फारसे अनुकूल नव्हते. आईने मात्र लेकीवरच तिचा निर्णय सोपवला. ‘मला हवे तसे विश्व मिळतेय’ या जाणीवेने भारतीताई सुखावल्या. बाबांनी त्यांना सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिराला यायला सांगितले, तेव्हा वडिलांचा रोष पत्करून त्या शिबिराला गेल्या व हे लग्न पक्के ठरले. तरी त्यांच्या लग्नसमारंभाचा एक किस्सा झाला.
भारतीताईंकडील माणसांची एकच अट होती, लग्न औरंगाबादला व्हावे. बाबांचा हट्ट होता, लग्न आनंदवनातच करण्याचा. ‘‘माझे इथले सगळे वर्हाडी तिथवर कसे येणार? लग्न इथेच व्हायला हवे.’’ लग्नाची बोलणी करायला आलेली गोविंदभाई श्रॉफ वगैरे मंडळी सरळ एका झाडाखाली जाऊन बसली. इकडे ताई घाबरल्या. ‘विकास कुष्ठरोग्यांत काम करणार म्हटल्यावर आधी मुली लग्नाला तयार होत नव्हत्या; आता हे जुळत आलेले लग्न मोडतेय की काय?’ ताई-बाबांचा जोरदार वाद झाला. अखेर लग्न औरंगाबादला करण्याचे निश्चित झाले. विकासभाऊ आजही आपल्या तिरकस शैलीत सांगतात, ‘‘आमचे लग्न लंडनला झाले, बकिंगहॅम पॅलेसमध्ये!’’
डॉ. विकास मद्रासला जाऊन लेप्रसी ट्रेनिंग घेऊन आले होते. रुग्णसेवा करत होते, परंतु त्यांना खरा रस होता तो इंजिनिअरींग, आर्किटेक्चर या विषयात. बाबांची स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी त्यांच्या मनात अनेक योजना होत्या आणि त्या त्यांना प्रत्यक्षात आणायच्या होत्या. एकापरीने आपले रुग्णसेवेचे काम हाती घ्यायला येणार्या डॉक्टरपत्नीची ते वाटच पाहत होते. लग्नानंतर भारतीताईंनी वर्ध्याला जाऊन लेप्रसी ट्रेनिंग घेतले आणि कुष्ठरुग्ण सेवेला आरंभ केला. त्यावेळी त्यांच्या मदतीला गीताबाई या नर्स व तारा, मंदोदरी, विठ्ठल, कबडू हे कुष्ठरोगमुक्त पेशंट्स होते. समाजकार्याची आवड असली तरी प्रत्यक्षात समाजकार्य असे त्यांनी यापूर्वी केलेले नव्हते. हाताची बोटे वा पंजे, नाक-भुवया गळून पडलेले रुग्ण पाहिल्यावर प्रथम आपल्याला त्यांची वाटणारी किळस व भीती अकारण आहे व तीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे हे त्यांनी स्वतःला समजावले. बाबांचे बोल लक्षात ठेवून त्यावर त्या सतत विचार करू लागल्या. बाबा सांगत, ‘‘ज्याला समाजकार्य करायचे आहे त्याने तीन सी ध्यानात ठेवले पाहिजेत. 1) Courage 2) Compassion 3) Conviction. धैर्य, करुणा व आपण स्वीकारलेल्या मार्गावरील श्रद्धा. बाबांचे हे बोल लक्षात ठेवूनच त्यांचे काम आजतागायत चालू आहे. १९८० ला ड्रग्ज ट्रायल घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचे त्यांना समाधान वाटते कारण त्यामुळे कुष्ठरुग्ण अल्पावधीत निगेटिव्ह होण्यास मदत झाली. तसेच या रोगामुळे येणारी विद्रूपता यामुळे कमी झाली. निगेटिव्ह झालेल्या कुष्ठरोग्यांना संसारसुख घेता यावे यासाठी त्यांचे विवाह लावून देण्याचे कामी साधनाताईंनी पुढाकार घेतला होता. आता या निगेटिव्ह झालेल्या दांपत्यांना अपत्य होऊ देण्यात धोका नसल्याचे डॉ. विकास व डॉ. भारतीताई यांनी बाबांना पटवून दिले व या दांपत्यांना माता-पिता होण्याचा हक्क मिळवून दिला. भारतीताई बालरोगतज्ज्ञ म्हणून १९७८ पासून बालकांवरही उपचार करू लागल्या. जन्मतः अपंग असलेल्या बालकांसाठी त्यांनी फिजिओथेरपी सुरू केली. बालकांच्या पालकांसाठी समुपदेशन केंद्र त्यातून आपोआप चालू झाले. १९९२ पासून आनंदवनात साईबाबा हॉस्पिटल उभे राहिले. भारतीताईंना आनंदवनातील मदतनीस मिळाले. रोगनिदान, औषधोपचार, ऑपरेशन्स यासाठी भारतीताईंनी अनेक शिबिरांचे आयोजन केले. देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्लॅस्टिक सर्जरी, कॅटरॅक्टस् व इतर मिळून सुमारे सोळा हजार ऑपरेशन्स इथे केली गेली. २००२ पर्यंत भारतीताई अधिकतर रुग्णविभागात काम करत राहिल्या, त्यानंतर त्यांना आनंदवनाच्या कार्याच्या प्रशासनात भाग घ्यायला संधी मिळाली. २००७ मध्ये निधी गोळा करून, एका जर्मन कंपनीशी संपर्क साधून त्यांनी ‘नवचैतन्य कृत्रिम अवयव निर्मिती विभाग’ सुरू केला. २०१० मध्ये स्वतंत्र फिजिओथेरपी विभाग सुरू केला. भारतीताईंना इतर उपचारपद्धती या ऍलोपथीला पूरक वाटतात. त्यांना स्वतःला झालेल्या तीव्र पाठदुखीच्या दुखण्यात योगोपचार त्यांना खूपच दिलासा देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी योगाचे प्रशिक्षण घेतले आणि योगशिक्षक होऊन, विशेषतः अंध, मूकबधिरांसाठी बरेच योगवर्ग घेतले. निसर्गोपचार, पुष्पौषधी, होमिओपॅथी, रेकी, ऍक्युप्रेशर या उपचार पद्धतींचा त्यांनी अभ्यास केला. त्यांचा ऍलोपथीला पूरक म्हणून त्या काही प्रमाणात वापर करतात. स्पर्शाची भाषा रुग्णाला संजीवन देणारी आहे, असा त्यांचा विश्वास आहे. आनंदवन विश्वस्तांनी या कार्यकर्तीची रुपये २२५ इतक्या मानधनावर नेमणूक केली होती, १९९५ पर्यंत हे मानधन रुपये ६२५ इतके झाले. त्यातले पाच-दहा रुपये मुलांच्या शिक्षणासाठी त्या बाजूला टाकत. पन्नास-साठ रुपये वर्षातून एकदा माहेरी जाण्यासाठी खर्च करत. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात भारतीताईंच्या आजोळची माणसे, आत्या, भाऊ यांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. कुष्ठरोगाबद्दल वाटणार्या भीतीमुळे आजही माहेरची माणसे आपल्या मुलांना त्यांच्या घरी राहायला पाठवत नाहीत.
मुलांच्या उच्च शिक्षणाच्या वेळेपर्यंत मानधन अधिक वाढले तेव्हा त्यांना आश्वस्त वाटले. कुटुंबप्रमुख म्हणून विकास यांचे मुले-बायको यांच्याकडे फारसे लक्ष नसायचेच. ते सतत कामात, माणसांत व्यग्र. आनंदवनात अंतिम शब्द असायचा तो बाबांचा. बाबा नर्मदेला जाऊन राहिले तोवर आनंदवनाबाहेर पडून वरोरा गावही भारतीताईंनी पाहिले नव्हते. बाबांच्या स्वभावाला खूप पीळ होता, ताईही तशा ‘खाष्ट’, बाबांची त्यांची अटीतटीची भांडणे व्हायची. काटकसरी बाबांपुढे डॉ. विकास काही योजना मांडायचे तेव्हा असेच जोरदार वाद झडायचे. भारतीताईंचे माहेर सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेले, गरिबीत दिवस काढणारे होते पण तेथे घरात लोकशाही वातावरण होते. त्यामुळे हे सगळे पाहताना त्यांना काही वेगळेच वाटायचे. त्या बाबांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकायच्या, ताईंशी त्यांचा खूप संवाद होई. बाबांना सगुण पूजा मान्य नव्हती, ताई मात्र उपवास, पूजा, सोवळे-ओवेळे, देवदर्शन या गोष्टी मनःपूर्वक करत. त्यावेळी हे सर्व बघून भारतीताईंना आश्चर्य वाटे, पण ताईंच्या वर्तनाचा त्या अर्थ लावू लागल्या. ‘‘बाबांचे सर्व प्रकल्प जंगलात, तिथे हिंस्र श्वापदे असत. शिवाय बाबा नेहमीच अतिश्रम करत, त्यामुळे आजारी पडत. त्यांची शुश्रूषा ताईंनाच करावी लागे. बाबांसारखा पती स्वीकारल्यामुळे अखंड प्रवास, जागरणे, श्रम त्यांच्या वाट्याला आले. पूजेमुळे त्यांना स्वतःचा असा वेळ मिळत असला पाहिजे. या एकांतात त्यांचे शरीर-मन शांत होत असले पाहिजे. बाबांची गृहिणी, सचिव, सखी, प्रिया अशा सर्व भूमिका ताईंनी निभावल्या. बाबांनी मात्र ताईंना वाढायला त्यांचा असा अवकाश दिला नाही.’’ असे भारतीताईंना वाटे.
ताई-बाबांना भेटायला विविध क्षेत्रातली मोठमोठी माणसे येत. त्यांची बोलणी, विचार त्या मनात साठवत. इथले सर्व जगणे सार्वजनिक होते. विकास-प्रकाश लहान असताना ताई घरी स्वयंपाक करत पण नंतर नंतर ‘समान जीवन समान जेवण’ या न्यायाने सार्वजनिक मेसमधले जेवण सर्वजण जेवू लागले. या काळात भारतीताईंची मुले मोठी होत होती. त्यांना धान्य ओळखता येईना. भारतीताईंना सतत वाटे की ज्या वास्तूत अग्निदेवता नाही ती वास्तू भकास असते. तेव्हा वरणभात घरी करायला त्यांनी सुरुवात केली. त्या माहेरहून जसे समाजसेवेचे संस्कार घेऊन आल्या तसेच कलेचेही. वाचनाची आवड त्यांनी जपलीच, त्यांचा आवाज मधुर. पु.ल. देशपांडे आनंदवनात येत तेव्हा भारतीताईंना आवर्जून गाणे म्हणायला सांगत. डॉ. विकासभाऊंनी आनंदवनातील अपंगांचा ‘स्वरानंदवन’ हा गाण्याचा कार्यक्रम सुरू केला, तेव्हा या गायकांची किती तरी गाणी त्यांनी बसवली आहेत. रुग्णसेवा करत असताना कुष्ठरोगी, अपंग, कर्णबधिर, मूक अशा स्त्रियांच्या ‘स्त्री’ म्हणून असणार्या वेदना, समस्या त्यांच्यासमोर आल्या. अशा स्त्रियांना आर्थिक आधाराबरोबर भावनिक आधाराचीही गरज असते हे त्यांनी जाणले. आतापर्यंत अशा स्त्रियांना व्यक्तिगत पातळीवर त्या मदत करत होत्याच परंतु आता आनंदवनाच्या वतीने स्त्रीसबलीकरणाचा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे. चंद्रपूर, नागपूर, वणी अशा जवळच्या ठिकाणच्या स्त्रीसंस्थांशी त्या अलीकडे जोडल्या गेल्या आहेत.
साधनाताईंची शिस्त आणि वात्सल्य या दोन्ही गुणांनी भारतीताई प्रथमपासूनच प्रभावित झाल्या. त्यांनी अनेक मुला-मुलींना आधार तर दिलाच पण सुधाकर, संगीता, प्रभा ही मुले त्यांच्या कौस्तुभ, शीतलप्रमाणे त्यांचीच झाली. साधनाताईंनंतर आनंदवनातील छोट्यामोठ्या भांडणात भारतीताईंना न्यायाधीशाची भूमिका करावी लागते. भांडणे घेऊन येणार्याला शंातपणे ऐकून घेणे, युक्तीने त्यांच्यातील तिढे सोडवणे हे त्या सहजतेने करतात.
आमटे कुटुंबाचा समाजसेवेचा वसा डॉ. विकास-भारतीताई यांनी नीट सांभाळला. त्यात भर घालून मुलगा-सून, मुलगी-जावई यांच्यापर्यंत पोहोचवला. अजून खूप काही करायचे बाकी आहे याची जाणीव उभयतांच्याही मनात आहे. जे केलंय त्यात आपण काही त्याग केलाय, वेगळं केलंय असा भाव भारतीताईंच्या मनात अजिबात नाही. किंबहुना एक खंत मात्र आहे. त्या म्हणतात, ‘‘मला हवी तेवढी स्पेस हवी तेव्हा नाही मिळू शकली, आता स्पेस मिळतेय तर शरीराने मी थकलेय.’’ आत्ता डिसेंबरच्या २५ तारखेला भारतीताईंनी साठी ओलांडली. तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते, ‘भारतीताई, मी थकलेय असे म्हणू नका. आत्ता तर कुठे तुमचा साठावा वाढदिवस झालाय. तुमच्या मनात खूप काही संकल्प आहेत. ते आपल्याला पूर्ण करायचेत. त्यासाठी आपल्याला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे व आपल्या मनातले संकल्प पूर्ण व्हावेत यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा!
-----
प्रतिभा कणेकर
pratibhakanekar@gmail.com
http://www.miloonsaryajani.com/node/1130
-----------------------------------------------------------------
१९७० मध्ये बाबा आमटे सोमनाथला गेले. तेव्हापासून डॉ.विकास आमटे यांनी साधनाताई आणि बाबा आमटे यांनी फुलवलेले आनंदवन त्याच सामाजिक हेतूने सांभाळत असून, त्यांनी अनेक हितकारक बदल घडवून आणले. बायोगॅस संयंत्रांपासून निर्धूर चुलींपर्यंत आणि मत्स्यशेतीपासून युवाग्राम केंदापर्यंत आनंदवनाची व्याप्ती वाढवण्यात विकास आमटे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अंध-अपंग, मुकबधीर यांचा मेळ घालून साकारलेला स्वरानंदन जगभर प्रसिध्द आहे.
आनंदवनातील अर्धगोलाकार छतांच्या भुकंपरोधक घरांचे प्रात्यक्षिक त्यांनी किल्लारीतील भूकंपग्रस्त भागात दाखवले. 'युवाग्राम' प्रशिक्षण केंदाच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगारसंधी निर्माण करण्यात विकास आमटे यांची भूमिका महत्त्वाची होती. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी-जामणी तालुक्यातील मुळगव्हाण गावी डॉ.विकास यांनी विशेष सामाजिक कृती व पर्यावरण संवर्धन केंद सुरू केले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण घटलेच, पण परिसरातील ४००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी शेतीत आमूलाग्र बदल घडवले.
भूमीतील श्रमसिद्धांताचा परीघ यवतमाळ जिल्ह्यातील झरीझामणीपर्यंत नेऊन ठेवला. कुष्ठरुग्णांपासून सुरू झालेल्या चळवळीसाठी राबणारे हात आता आत्महत्याग्रस्त भागात दिलासा देण्यासाठी झटत आहेत.
आनंदवनाच्या वाढत्या गरजा ओळखून विकासभाऊंनी बदल केले. सांडपाण्याच्या निचरा यंत्रणेचा अभ्यास करून त्याधारे स्वच्छतागृहांची उभारणी, त्यावर बायोगॅस संयंत्रे उभारून ऊर्जानिमिर्ती, बेंगळुरूतील तज्ज्ञांच्या मदतीने निर्धूर चुलींची बांधणी, फुटलेल्या कपबश्यांचे तुकडे वापरून उभारलेले कठडे, श्रमदानातून तयार केलेले साठवण तलाव, टाकाऊ प्लास्टिक व टायरपासून उभारलेले बंधारे अशी विकास आमटेंचे व्यवस्थापन कौशल्य आणि कार्यकुशलत यांची उदाहरणे आज आनंदवनात ठिकठिकाणी पहायला मिळतात.
आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी त्यांनी रोजगाराची साधनेही उपलब्ध करून दिली. कोलकात्यातून माशांची पिले आणून सुरू केलेली मत्स्यशेती, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड आदी उपक्रम सुरू केले. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळेच आनंदवनातील कुटिरोद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांची संख्या आज सव्वाशेवर पोहोचली आहे.
विडीओ