कोल्हापूर-सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने आज मध्यरात्री पासून संपाची हाक दिली आहे.त्यामुळे प्रवासी वर्गाची चांगलीच हेळसांड होत आहे.अशातच कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बेळगाव-पुणे आणि होसपेट-पुणे या दोन बसेस वर कागल(जि.कोल्हापूर)या आणि सीमाभागात संतप्त एसटी कर्मचारी आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली.हा प्रकार मध्यरात्री आंदोलन सुरू झाल्यानंतर 2.30 वाजण्याच्या सुमारास घडला.
आज(मंगळवार)सकाळी कोल्हापूर शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर कोल्हापूर-गोकाक आणि अन्य तीन केएसआरटीसी च्या बसेस मधील संतप्त कोल्हापूर आगारातील महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांनी हवा सोडली.सकाळी मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडलेल्या कोल्हापूर गोकाक या कर्नाटक परिवहनच्या बसला संतप्त आंदोलकांनी येथील सुब्राया हॉटेलजवळ थांबवले,बस पुढे नेल्यास फोडण्याची धमकी दिली.त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवून बस मधील हवा सोडली.ऐन दिवाळीत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4 हजार महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संपात उतरल्याने प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत.
खासगी बसेसच्या भाड्यात वाढ
दिवाळीच्या सणात एसटी कर्मचारी संपात उतरल्याने पुणे मुबईकडे धावणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक बसेस च्या भाड्यात भरमसाठ वाढ झाली आहे.प्रवाश्यांना दिवाळी सणासाठी गावाकडे पोहचावयाचे असल्याने हा भूर्दंड सोसावाच लागणार आहे.