- श्रीमती स्वराज विद्वान
* अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून आढावा
नागपूर दि. 10 : अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या सर्वच वसतीगृहात आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. श्रीमती स्वराज विद्वान यांनी आज दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या श्रीमती स्वराज विद्वान यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. श्रीमती कादंबरी बलकवडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विजय वाकुलकर, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या सदस्या डॉ. श्रीमती स्वराज विद्वान यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या वसतीगृहांना भेट देऊन पाहणी केली. तसेच येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर विभाग प्रमुखांच्या बैठकीत विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असलेले सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता उपलब्ध करुन देण्याबद्दल सूचना दिल्यात.
डॉ. श्रीमती स्वराज विद्वान यांनी यावेळी पोलिस विभाग, महानगरपालिका, वन, आदिवासी, आरोग्य, पाटबंधारे, समाजकल्याण, कृषी, पुरवठा अशा विविध विभागांचा आढावा घेतला.
डॉ. श्रीमती स्वराज विद्वान म्हणाल्या, अनुसूचित जातीच्या संदर्भात होणाऱ्या घटनांची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी. तसेच संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करावी. दलित वस्तीमध्ये पथदिवे, स्वच्छता, आरोग्य याबाबत दक्षता बाळगावी. कंत्राटी स्वरुपाच्या पदभरतीसाठी रोस्टरप्रमाणेच पदभरती करण्यात यावी. जात वैधता प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करुन द्यावे. आरोग्य विभागाने आदिवासी लोकांसाठी शिबिर आयोजित करुन मोफत उपचार उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत करुन अनुसूचित जाती संवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात यावेळी माहिती दिली.