केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ते 30 एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत असून सौभाग्य योजनेतून दलितवस्तीत 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानाची राज्यात आजपासून सुरूवात झाली असून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंत्यानी क्षेत्रीय स्तरावर विशेष शिबीरांचे आयोजन करावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.संजीव कुमार यांनी व्हीडीओ कॉन्फरेन्सद्वारे आज दिले.
या अभियानात राज्यातील 192 गावांत सौभाग्य योजनेतून वीजजोडणी देण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता (संचालन व सुव्यवस्था) यांच्यावर ही जबाबदारी टाकून त्यांनी त्यांच्या मंडलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी संबंधित विभागाचे प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता यांना देण्यात आले. यासाठी स्थानिक पातळीवरील जनमित्र, तंत्रज्ञ यांच्या मदतीने वीजजोडणी नसलेल्यांची आकडेवारी घेऊन ती तपासून त्यांना वीजजोडणी तात्काळ देण्यात यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
ज्या खेडी, पाडे, वाडी-वस्तीतील ग्राहकांना महावितरणच्या पायाभूत सुविधेतून वीजजोडणी देणे शक्य नाही अशा ग्राहकांची यादी तयार करून त्यांना अपारंपारिक पध्दतीने सौरऊर्जेची वीजजोडणी देण्यात यावी. तसेच त्याप्रमाणे कृतीकार्यक्रम तयार करून 192 गावात तातडीने वीजजोडणी देण्यासाठी दि. 05 मे 2018 ची वाट न बघता दि. 30 एप्रिल 2018 पर्यन्त ही कामे पूर्ण करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबांपर्यन्त वीज पोहचविण्याचे धोरण असून ग्रामीण व शहरी भागातील वीज नसलेल्या प्रत्येक घरात वीजजोडणी देण्यात येणार आहे