चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
वाघाच्या दर्शनासाठी पर्यटकांना उत्सुकता असते, नव्हे त्यासाठीच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली जाते. पण ताडोबातील माया वाघिणीने पर्यटकांना जवळून दर्शन दिले तर खरे, मात्र तिच्या खुनखार नजरेसोबत तिची गाडीवर उडी घेण्याची तयारी बघून पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. प्रसंगावधानाने जिप्सी चालकाने गाडी सुरु केली आणि समोर नेली. आणि जीव मुठीत घेऊन पर्यटनवारी करायला निघालेल्या पर्यटकांचा जीव भांड्यात पडला.
जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. ताडोबा जंगलात सध्या उन्हाळयामुळे वाघोबांचे दर्शन सुलभ झाले आहे. त्यामुळे पर्यटकांची प्रकल्पात गर्दी दिसून येत आहे. पण अशातच ताडोबा वनपरिक्षेत्रातील एका घटनेने पर्यटक चांगलेच धास्तावले आहेत. या भागात टी-१२ या वनविभागाच्या दफ्तरी नोंद असलेल्या माया या वाघिणीने पर्यटकांना दर्शन दिले. ती दिसताच पर्यटक काही क्षण खुश झाले. पण जिप्सीमधील पर्यटकांना निरखून बघत दोन पावले मागे जात चक्क चढाईची तिने तयारी केली आणि पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. माया गाडीवर उडी घेण्याच्या तयारीत असताना गाडीत बसलेल्या पर्यटकांना चांगलाच घाम फुटला. मायाच्या मागे चालत येणाऱ्या बछड्यांसाठी कदाचित आईने मार्ग मोकळा करून दिला असेल. मात्र मायाचा आक्रमक मूड ओळखून जिप्सी चालकाने सफाईदारपणे वाहन पुढे नेले आणि दुर्घटना टळली. माया आणि बछडे यांचे हे कुटुंब पर्यटकांनी डोळ्यात साठवले. सध्या हा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवरून ताडोबात फिरताना पर्यटकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.