वेगळा विदर्भ राज्याचा लढा ११५ वर्षांपासून सुरू आहे. आता प्रतीक्षा संपली आहे. सद्याचे राज्य सरकार व केंद्र सरकार वेगळा विदर्भ राज्यासाठी अनुकूल परिस्थिती असूनही विरोधात आहे. त्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा विरोध करत नागपूर विधान भवनावर विदर्भ राज्याचा झेंडा फडकवला जाईल. त्यासाठी सर्व जाती-धर्म, पक्ष, पंथ विसरून विदर्भ राज्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांनी केले.
स्वतंत्र विदर्भ राज्य मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने गडचांदूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अर्थतज्ञ आ. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महाराष्ट्र राज्य मुस्लिम आरक्षण समितीचे कार्याध्यक्ष अॅड. फरहत बेग, पुरातत्व विभाग केंद्राचे माजी प्रमुख डॉ. सय्यद ख्वॉजा गुलाम (रब्बानी) यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी भाजप सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.
रजा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष शेख ख्वाजाभाई, नुराणी मित्र मंचचे सय्यद अली, मदिन मस्जिदचे हाजी जुबेर, मोहमदीया मस्जिदचे शेख सादीक यांनी सभेचे आयोजन केले होते. मंचावर माजी उपसभापती रऊफ खान, माजी उपसरपंच शेख सरवर , माजी सरपंच शेख रउफ, हसन रमेश नळे, मदन पाटील सातपुते, माजी जि. प. सभापती निळकंठ कोरांगे, अरुण निमजे, रफीक निझामी, प्रवीण गुंडावार, मुमताज अली, संतोष पटकोटवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी विदर्भ राज्याचा लढा आता तीव्र केल्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन रफीक शेख यांनी केले. प्रास्ताविक नासीर खान यांनी केले तर आभार रफीक निझामी यांनी मानले. यावेळी सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.