रविवारी सकाळी भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातिल बोरिया जंगलात पोलिस नक्षलवादी यांच्यात चकमक झाली या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.या चकमकीत काही डीव्हीसी व कमांडर्सचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सी-६० पथकाचे जवान ताडगाव परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना बोरिया जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. ही चकमक तब्बल ११ वाजतापर्यंत सुरु होती. या चकमकीत १४ नक्षलवाद्याचा संपूर्ण दलमच ठार झाल्याचे सांगण्यात येत असून, काही कमांडर व उच्चपदस्थ नक्षली या चकमकीत ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे.
नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य साईनाथ, सिनू व अन्य काही कमांडर या दलमसोबत होते. पोलिसांनी १३ नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जिल्ह्यात नक्षल चळवळीचा शिरकाव झाल्यापासूनच्या ३८ वर्षांतील पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.२०१३ मध्ये अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथे पोलिसांनी ६ नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. त्यानंतर ६ डिसेंबर २०१७ रोजी सिरोंचा तालुक्यातील कल्लेड येथील जंगलात पोलिसांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला होता. या दोन घटनांनंतरची ही १४ नक्षली ठार करण्याची सर्वांत मोठी कारवाई आहे.