आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असलेल्या नदी टिटवी या दुर्मिळ पक्ष्याच्या विणीची महाराष्ट्रात प्रथमच नोंद करण्यात आली आहे. मेळघाटातील तापी नदीत ‘नदी टिटवी’चे प्रजनन आढळून आले.
अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे (वेक्स) पक्षीअभ्यासक गेल्या पाच वर्षांपासून विदर्भातील विविध भागातील नद्यांमध्ये या प्रजातीचा शोध घेत आहेत. आतापर्यंत मेळघाटातील तापी, सिपना, मध्यप्रदेश सीमेवरील पेंच, चंद्रपूर, गडचिरोली भागातील वैनगंगा तसेच अप्पर वर्धा व तोतलाडोह धरण आदी ठिकाणी ‘नदी टिटवी’च्या अस्तित्वाची नोंद घेण्यात त्यांना यश आले. यावर्षी या चमूला मेळघाटात तिच्या प्रजननाची नोंद घेण्यात यश आले. संस्थेचे पक्षी अभ्यासक प्रा.डॉ. गजानन वाघ, डॉ. जयंत वडतकर यांना मेळघाटातील तापी नदीत धारणी ते बैरागड या भागात एकूण १२ पक्षी व तीन घरटी शोधून काढण्यात यश आले आहे. या प्रकल्पादरम्यान त्यांना हयात कुरेशी, निखिल बोरोडे, पंकज भिलावेकर आदींचे सहकार्य मिळाले. घरटय़ाच्या व यशस्वी विणीच्या नोंदीमुळे ‘नदी टिटवी’च्या विणीची ही राज्यातील प्रथमच नोंद असल्याची माहिती डॉ. वाघ यांनी दिली. या नोंदीची माहिती बीएनएचएसचे डॉ. राजू कसंबे यांना कळवण्यात आली. त्यांनीही याला दुजोरा दिला. नदी सुरक्षित राहिली तर हा संकटग्रस्त पक्षी त्याचे अस्तित्व टिकवून ठेवू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नदी टिटवी ही प्रजाती भारतातील असून उत्तर भारत ते पूवरेत्तर राज्ये व मध्यप्रदेशपर्यंतच्या भागातील मोठय़ा नद्यांमध्ये ही सामान्यपणे आढळून येते. महाराष्ट्रातील पूर्व भागात म्हणजेच विदर्भ प्रदेशातील तापी, पेंच, वर्धा, वैनगंगा या नद्यांमध्ये तिचे अस्तित्व आहे. अलीकडे अप्पर वर्धा, तोतलाडोह किंवा बोर धरण याठिकाणीसुद्धा ही प्रजाती आढळून आली. तिचा प्रजनन काळ मार्च ते एप्रिल दरम्यानचा असतो. इ.स. १९५३ साली प्रकाशित डी. अबरु यांच्या सी.पी. बेरार प्रदेशातील पक्षी नोंदीच्या संदर्भानुसार या पक्ष्याची वीण नर्मदा व इंद्रावती या नद्यांमध्ये होते, असे नमूद आहे. त्यानंतर या प्रजातीची वीण महाराष्ट्रात होत नसल्याची नोंद नाही.
‘नदी टिटवी’ हा पक्षी आपल्या भागात सामान्यपणे आढळणाऱ्या लाल गालाच्या टिटवीपेक्षा आकाराने किंचित लहान, ३१ सेंटिमीटर लांबीचा आहे. याचा चेहरा संपूर्ण काळा आणि डोक्यावर काळी शेंडी असते. छातीवरील भागावर राखाडी रंगाचा पट्टा असून पोट पूर्ण पांढरे असते. पाठ, चोच व शेपटीची टोके काळ्या रंगाची असून पंख मातकट रंगाचे असतात. हिचे इंग्रजी नाव ‘रिव्हर लॅपविंग’ आहे.