नागपूर/प्रतिनिधी:
ईनर्जी ईफिशिएन्सी सर्व्हिसेस लि., द्वारे रु. ५०/- मध्ये एलईडी बल्बचा पुरवठा मोबाईल व्हॅनमार्फत करण्यात येणार आहे. या व्हॅनचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार आणि आणि ईनर्जी ईफिशिएन्सी सर्व्हिसेस लि., चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ कुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून आज केले.
विद्युत मंत्रालय, ग्राम स्वराज्य अभियान, उजाला योजनेंतर्गत केंद्रीय ऊर्जा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी दि. १४ एप्रिल २०१८ पासून सुरू होत आहे. याचे औचित्य साधून मे. ईनर्जी ईफिशिएन्सी सर्व्हिसेस लि., द्वारे रु. ५०/- मध्ये एलईडी बल्बचा पुरवठा करणाऱ्या मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या दरम्यान राज्यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलितवस्ती असलेल्या गावात सर्वांना वीजजोडणी देण्यात येणार असून ही वीजजोडणी राज्यातील १९२ गावांत सौभाग्य योजनेतून देण्यात येणार आहे. सदर गावात वीजजोडणीसाठी शिबीर लावून दिनांकनिहाय कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे. अशा कुटुंबांना ५० रुपयांत एक एलईडी बल्ब मे. ईनर्जी ईफिशिएन्सी सर्व्हिसेस लि., या कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा बल्ब ९ वॅटचा असून त्याची ३ वर्षांची वॉरटी राहणार आहे. म्हणजे काही तांत्रिक कारणाने बल्ब खराब झाल्यास ३ वर्षांपर्यन्त तो मोफत बदलून मिळणार आहे.