प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, खरीप कर्ज वाटप व विविध योजनातून जिल्हयातील बँका, विविध मंडळे यांच्याकडून होत असलेल्या पतपुरवठा व त्यावर आधारीत राज्य व केंद्राच्या विविध योजनांचा आढावा केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज घेतला.
या बैठकीला आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा व जिल्हयातील सर्व बँकाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी तालुकानिहाय बँकाचा आढावा घेण्यात आला. मुद्रा बँक योजनेच्या संदर्भात घेण्यात आलेला आढावा. यावर्षी मार्च अखरेपर्यंत 147.52 कोटी रुपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात आले आहे. या कर्जासाठी जिल्हाभरातून 17 हजार 510 लोकांनी अर्ज दाखल केले होते. लोकप्रतिनिधींकडे या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून स्वत: प्रधानमंत्री या योजनेबाबत अतिशय सकारात्मक असून बँकानी पतपुरवठा करतांना विनाकारण अटी व शर्ती घालू नये. कर्ज घेणा-या नागरिकांनी देखील अल्पदरातील कर्ज व्यवसाय सुरु करताच परत करावे. अन्य लोकांना देखील त्याचा फायदा मिळेल, असे सांगितले. यावेळी काही तक्रारींचा त्यांनी उल्लेख केला. जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना बँकेने कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याचे तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून आले. मात्र हंसराज अहीर यांनी आज सर्व बँकेच्या अधिका-यांना तरुणांना बँकेतून परत पाठवू नका, कोणत्याही कारणासाठी मुद्रा बँक योजनेतून कर्ज नाकारु नका, पतपुरवठा करण्यासाठी कोणतीही अट नसून प्रत्येकाला कर्ज देता येईल, अशा पध्दतीने बँकेने तरुणांना मदत करावी, असे आवाहन केले. तसेच उपजिवीका विकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या व्यवसायाचा आढावा त्यांनी घेतला. त्याचप्रमाणे जिवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वंय सहायता समुहाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या लघु उद्योगाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.
पीक कर्जाचा आढावा
यावेळी जिल्हयातील सर्व बँकांना पीक कर्ज वाटपाबाबत सूचना त्यांनी केली. कर्ज वाटपाच्या यशस्वी मोहीमेनंतर यावर्षीच्या पीक कर्ज वाटपाच्या हयगय होऊ देवू नये, याबद्दल त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. सन 2018-19 या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्हयाचा पीककर्जाचा 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सदर उद्दिष्ट सर्व बँकांना कळविण्यात आले असून बँकनिहाय पीककर्ज वाटपाची सूचना सर्व बँकांना देण्यात आली आहे. बँकानी शेतक-यांना कर्ज वाटप करतांना हयगय करु नये, असेही त्यांनी सांगितले.