निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
मागील चार ते पाच दिवसापासून चंद्रपुरातील तापमान हे देशात पहिल्या क्रमांकाचे ठरले आहे. या चार दिवसात ४४ ते ४६ अंश से. इतके तापमान चंद्रपूर मध्ये नोंदविण्यात आले असून हे देशातील नव्हेच तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. असे असतानाही चंद्रपुरातील शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट सुरूच असून या तापत्या उष्णतेचे दुष्परिणाम या विध्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची दाट श्यक्यता आहे त्यामुळे दुपारून सुरु असलेल्या शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट ला सुट्या देण्यात याव्या अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, दीपक पद्मगीरीवार, विलास सोमलवार, विनोद गोल्लजवार, अशोक खडके, विनोद अनंतवार यांची उपस्थिती होती
चंद्रपूर शहराची राज्यात तापमान शहर म्हणून ओळख आहे. नेहमी एप्रिल आणि मे मध्ये या वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्माघाताचे बळी जात असतात. आणि सध्या तर चंद्रपुरचे तापमान हे जगातील १ ल्या क्रमांकाचे असल्याने येथील शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना इतक्या भर उन्हामध्ये शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांना उष्माघात या सारख्या असंख्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याच्या अगोदर शहरातील संपूर्ण शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट तात्काळ बंद करण्यात याव्या अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळा लागण्याच्या आधी शिक्षणाधिकारी व संपूर्ण शाळांचे मुख्याध्यापक यांना बोलाऊन मार्च महिन्यामध्येच मिटिंग घेऊन एप्रिल महिन्याच्या प्रथम आठवडयामध्येच शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट बंद करण्याच्या संदर्भात उपाययोजना कराव्यात असे यावेळी जोरगेवार यांनी सांगितले. याची तत्काळ दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांना सांगून ज्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय, कॉन्व्हेंट ११ च्या नंतर सुरु असतात त्यांना बंद करण्यात यावे असे नोटीस संपूर्ण शाळांना देण्याचे आदेश दिले आहे.