भारतीय जनता पक्षांने सत्तेत येणाऱ्यापुर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले. आता सत्तेवर आल्यानंतर आश्वासनाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळेच भाजपाचा निषेध करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे एक मे रोजी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवणार आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहे. हे आंदोलन चिंता करणाऱ्यांचे नव्हे तर चिडलेल्यांचे आहे, अशी माहिती आंदोलनाचे नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत दिली.
दिनांक एक मे रोजी दुपारी बारा वाजेपर्यत संपूर्ण विदर्भातून मोठया संख्येने कार्यकर्ते यशवंत स्टेडीयम येथे एकत्र येतील. दुपारी साडे बारा वाजता विदर्भ मार्च निघेल. यशवंत स्टेडीयम - मुंजे चौक - राण्धी झॉंशी चौक, व्हेरायटी चौक, लोखंडी पूल, रेल्वे स्टेशन, कस्तुरचंद पार्क, रिझर्व बॅंक चौक मार्गे मोर्चा विधानभवनावर जाईल. हजारोंच्या उपस्थितीत विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येईल. देशाला स्वातंत्र मिळण्यापूर्वीची वेगळया विदर्भ राज्याची मागणी आहे. 1947 पासून कॉग्रेस पक्षाने सत्ता असताना काही लहान राज्ये निर्माण केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी यांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीत छत्तीसगढ, उत्तरांचल, व झारखंड ही तीन लहान राज्ये निर्माण केली. राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान भाजपा सरकानेही वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते देण्यास आता टाळत आहेत. त्यामुळेच एक मे रोजी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन्ही नेते आपल्या आश्वासनाला बगल देत आहेत. त्यामुळेच आगामी काळात हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे निमंत्रक राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती , ऍड. नंदा पराते, रंजना मामर्डे, विष्णू आष्ठीकर, अरूण केदार, अरविंद देशमुख, राजकुमार नागुलवार, अरविंद देशमुख यांचा समावेश होता.