- केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचे निर्देश
- सोमवारी जिल्हाधिकारी घेणार पशुसंवर्धन विभागाचा आढावा
- मुद्रा व अन्य विभागाच्या योजनांचीही घेतली माहिती
चंद्रपूर- जिल्हयातील पशुधनाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणा-या सोयीसुविधांची बळकटी करणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्हयात दुग्ध क्रांतीसाठी शासकीय व केंद्रीय दुध डेअरींच्या संकलन व्यवस्थेचे नियोजन आवश्यक असून त्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करण्यात यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे दिले.
स्थानिक नियोजन भवन येथे पारपडलेल्या बैठकीमध्ये आज मदर डेअरीच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यासोबतच जिल्हाभरातील पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने, तेथील वैद्यकीय व्यवस्था या संदर्भातही महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. मदर डेअरी, शासकीय दुग्ध विकास अधिकारी कार्यालय, रेषीम उद्योग कार्यालय, यासोबतच पतपुरवठा करणारे बँकेचे अधिकारी, मुद्रा बँके योजनेचा आढावा, खासदार निधीचाही आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, सभापती ब्रिजभुषण पाझारे, सभापती अर्चना जिवतोडे, सभापती गोदावरी केंद्रे उपस्थित होते. तर या बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हयात सद्या मदर डेअरी या केंद्रीय दुध संकलन व्यवस्थेमार्फत मोठया संख्येने दुध खरेदी केल्या जाते. याशिवाय जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या अंतर्गत शासकीय दुध संकलनाचे कार्य केले जाते. मदर डेअरीच्या जिल्हयातील आगमनानंतर हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने विविध शासकीय योजनासाठी बँकांव्दारे पतपुरवठा मोठया प्रमाणात सुरु करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात मदर डेअरीव्दारे दुध खरेदीही मोठया संख्येने सुरु होती. तथापि, उन्हाळयाच्या दिवसांमध्ये आवश्यक प्रतीचे दुध मिळत नसल्याच्या तक्रारी मदर डेअरीच्या आहेत. तर उत्तम भाव मिळत नसल्याबाबत तसेच दुध आवश्यक प्रतीचे नसल्यास परत करण्याबाबत मदर डेअरीने लवचिक निर्णय घ्यावा, अशी मागणी दुध उत्पादकांनी केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात जिल्हयात उदभवलेल्या परिस्थितीवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मदर डेअरी दुध खरेदी करण्यास असमर्थ असेल तर शासकीय दुध डेअरीने दुध खरेदी करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. तथापि, अचानक शासकीय दुध डेअरीला वाढीव खरेदी करता येणे शक्य नसल्याचे अधिका-यांचे म्हणने आहे. या संदर्भातील गुंता सोडविण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थित शेतक-यांचे, दुग्ध व्यवसायीकांचे दुध वाया जाता कामा नये, यासाठी मदरडेअरी व शासकीय दुध डेअरीच्या वरिष्ठ अधिका-यांशी आपण बोलू. या संदर्भात सर्वसमावेशक ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करावा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हयातील पशुसंवर्धन अधिका-यांची रिक्त पदे, तालुकास्तरावरील अधिकारी यांचे मुख्यालयी अनुपस्थित राहणे, दवाखान्यांची वाईटस्थिती आणि जनावरांना मिळणारी तुटपूंजी वैद्यकीय सुविधा या संदर्भात आजच्या आढावा बैठकीत अनेक पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हयातील सर्व दवाखान्यांची स्थिती वाईट असून त्यांची दुरुस्ती आणि प्रत्येक ठिकाणी सक्षम अधिका-यांची नेमणूक करण्यासंदर्भात त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिका-यांना निर्देश दिले. जिल्हयाचा दौरा करुन संपूर्ण स्थितीचा आढावा शासनाला कळविण्याचे त्यांनी सांगितले. दुग्ध विकासावर चर्चा करतांना जिल्हयामध्ये दुग्ध उत्पादन वाढीसाठी जनावरांची खरेदी मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. यासाठी बँकांनी देखील मोठया प्रमाणात पतपुरवठा उपलब्ध केला आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये खरेदी यंत्रणांचे सुसूत्रिकरण आवश्यक असल्याचे यावेळी लक्षात आणून दिले. त्यामुळे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सोमवारी जिल्हयातील सर्व पशुसंवर्धन अधिका-यांची बैठक आपल्या दालनात बोलाविली आहे. यावेळी गोंडपिपरी, धानोरी आदी ठिकाणच्या पशुसंवर्धन अधिका-यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेण्यात आले. त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
प्रधानमंत्री यांच्या मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना बँकेने कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याचे तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून आले. मात्र हंसराज अहीर यांनी आज सर्व बँकेच्या अधिका-यांना तरुणांना बँकेतून परत पाठवू नका, कोणत्याही कारणासाठी मुद्रा बँक योजनेतून कर्ज नाकारु नका, पतपुरवठा करण्यासाठी कोणतीही अट नसून प्रत्येकाला कर्ज देता येईल, अशा पध्दतीने बँकेने तरुणांना मदत करावी, असे आवाहन केले.