- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- मेयोत दिनदयाल थाली लोकार्पण कार्यक्रम
आज (दि.18) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दिनदयाल थालीचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री गिरीष व्यास, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, माजी मंत्री रमेश बंग, माजी महापौर प्रविण दटके, उपमहापौर दिपराज पारडीकर, संदीप जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांची उपस्थिती होती.
समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन कसे करता येईल याचा ध्यास पंडीत दिनदयाल यांना होता, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पिडीत, वंचीत व रुग्णांच्या नातेवाईकांना एक आधार म्हणून ही थाली सुरु केली आहे. नाममात्र दहा रुपये घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांना पोटभर जेवण या थालीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. समितीने मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जे मोफत मिळत असते त्याचे महत्त्व नसते. समितीने निशुल्क भोजन न देता किंवा नफा न कमावता केवळ टोकण म्हणून नाममात्र शुल्क घ्यावेत अशी सूचना आपण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुरुवातीला भेटीप्रसंगी केली होती. त्यानुसार नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले, यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दिनदयाल थाली सुरु करण्यात आली. आता मेयोत सुध्दा ही थाली सुरु करण्यात आली आहे. लवकरच डागा रुग्णालयात सुध्दा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दिनदयाल थाली ही व्यवस्था करण्यात येणार आहे. मेयोत येणाऱ्या रुग्णांसाठी सिटी स्कॅन व एमआरआयची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निधीसुध्दा लवकरच देण्यात येईल. त्यामुळे इथल्या आरोग्य सेवेत मोठा बदल झालेला दिसेल, असे सांगून श्री. फडणवीस पुढे म्हणाले ही रुग्णालये गरीबांसाठी आश्रयस्थान आहे. मागील तीन वर्षात मेयोचा कायापालट करण्यात आला असून इथल्या विकासासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) च्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिनदयाल थालीचा शुभारंभ करुन थालीचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाला श्री सालासर सेवा समितीचे पदाधिकारी, मेयोचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सालासर सेवा समितीचे राधेश्याम सारडा यांनी केले. संचालन दयाशंकर तिवारी यांनी केले. उपस्थितांचे आभार आमदार गिरीष व्यास यांनी मानले.