महानिर्मितीच्या महिलांची अनाथ मुलांना मदत:आर्थिकदृष्ट्या महिला स्वावलंबी होण्याकरिता उपक्रम
भारतीय संविधानाने स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य व अधिकार दिले आहेत. परदेशातील राज्यघटना जसे आखाती देश, अमेरिका, पाकिस्तान येथील स्त्रियांचे अधिकार आणि भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना दिलेले अधिकार याची तुलनात्मक माहिती प्रत्येक भारतीय महिलेस माहित असणे गरजेचे आहे. स्त्रियांना स्वत:चे अधिकार समजले तर त्या जागृत होतील. त्यामुळे, नवनवीन आव्हान स्वीकारण्यासाठी महिलांनो पुढे या आणि स्वकर्तृत्वावर जग बदला असे प्रतिपादन जयश्री शेवारे यांनी केले. महानिर्मितीच्या कोराडी बांधकाम,प्रकल्प आणि स्थापत्य कार्यालयात आयोजित महिला दिनानिमित्त भारतीय संविधानातील महिलांचे अधिकार या विषयावर त्या बोलत होत्या.
याप्रसंगी अर्चना मैंद सरपंच कोराडी, अर्चना दिवाणे उप सरपंच कोराडी, सीमा जयस्वाल नगराध्यक्ष महादुला, विभागीय अभियंता(जलसंपदा) जयश्री शेवारे, अधीक्षक अभियंते अरुण पेटकर, पांडुरंग अमिलकंठावार, मुकेश मेश्राम उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, यशवंत मोहिते जनसंपर्क अधिकारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) सविता झरारीया इत्यादी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
मुद्रा कन्सलटन्सीचे आशिष महाजन यांनी आर्थिक नियोजन करून महिलांनी कसे स्वावलंबी बनावे याचा मंत्र दिला तर बचत आणि संपत्ती यातील फरक व त्याचे दूरगामी परिणाम यावर उत्कृष्ट सादरीकरण केले. महानिर्मितीच्या महिलांनी, महिला दिनानिमित्त विशेष पुढाकार घेत नागपुरातील राहुल बाल सदनच्या अनाथ मुलांना भरीव मदतीचा हात देऊन सामाजिक जाणीवेचा परिचय करून दिला. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उलेखनीय कार्याबद्द्ल महानिर्मिती महिलांना सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी सुषमा पाटील यांनी सुमधुर स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकातून दीप्ती मेश्राम यांनी महिला दिन आयोजनामागची भूमिका विषद केली. सीमा जयस्वाल, अर्चना मैंद, अर्चना दिवाणे, कार्यकारी अभियंते किरण नानवटकर, शिरीष वाठ, अधीक्षक अभियंते अरुण पेटकर, पांडुरंग अमिलकंठावार यांनी महिला दिनानिमित्त समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रक्षिका वासनिक तर दीप्ती मेश्राम यांनी आभार प्रदर्शन केले.
महानिर्मितीचे कार्यकारी अभियंते राजेश अलोणे, पराग आन्दे, मिरगे, प्रवीण रोकडे, जयंत काटदरे, विष्णू ढगे, उमेश तांबोडे प्रामुख्याने उपस्थित होते तर अतुल गावंडे, हीना खय्याम, मंगला गौरकर, उषा अडेकर, सेवा माटे,श्वेता मेश्राम, सोनकूसळे इत्यादींचे मोलाचे परिश्रम लाभले. मुख्य अभियंते राजेश पाटील, अनंत देवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला दिन कार्यक्रमास महानिर्मितीच्या कोराडी बांधकाम, प्रकल्प व स्थापत्य कार्यालयातील महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.