प्लास्टिक, थर्माकोल बंदीसंदर्भातील प्रारुप लवकरच राजपत्रात
- रामदास कदम
मुंबई, दि. 5 : महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल बंदी संदर्भात प्रारुप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या राजपत्रात लवकरच प्रसिद्ध केला जाईल असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
ते आज मंत्रालयात प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते.
श्री. कदम म्हणाले, महाराष्ट्रात प्रतीदिन 1800 टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्याचा फारमोठा परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्यासाठी येत्या गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल पासून बनविलेल्या प्लेटस्, ताट, वाट्या, ग्लास, चमचे, कप,प्लेक्स, बॅनर्स, तोरण अशा वस्तुंवर राज्यात बंदी केली जाणार आहे. प्लास्टिक उत्पादन करणारे कारखाने, साठवणूक करणारे, वापर करणारे अशा सर्व घटकांवर कायदेशिररित्या कारवाई करण्यात येणार आहे.
या नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी व दंडात्मक कारवाईसाठी मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, तलाठी, मुख्य कार्य अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षणाधिकारी, प्रदुषण मंडळाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस, पोलीस पाटील, वन अधिकारी, विक्रीकर अधिकारी आदींना प्राधिकृत केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र अविघटनशिल कचरा (नियंत्रण) कायदा 2006 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक पर्याय निर्माण करण्यासाठी व जनजागृतीसाठी बचतगट, सेवाभावी संस्था यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून निधी उपलब्ध करुन द्यावा असेही या प्रारुप आराखड्यात नमुद केल्याचे श्री. रामदास कदम यांनी सांगितले.
यावेळी प्लास्टिकच्या रिसायकलींगद्वारे ऑईल तयार करणे, चटाया तयार करणे, गार्डनमधील प्लास्टिक बेंचेस,प्लास्टिक दोऱ्या कशा तयार करु शकतो याची माहिती प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीला पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
000
डॉ.संभाजी खराट/वि.सं.अ./5/3/18
वृ.वि. 620 18 फाल्गुन 1939 (सायं 5.40 वा)
शिष्यवृत्ती योजनेसाठी नवीन महाविद्यालयांनी
नाव नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 5 : केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाविद्यालय आणि संस्थांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन2018-19 च्या शिष्यवृत्ती योजनेसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या www.scholarships.gov.in या होमपेजवरील सर्चइन्स्टिट्यूट, स्कुल आणि आयटीआय या लिंकवर दिसत नसेलल्या महाविद्यालय आणि संस्थांनी आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक महाविद्यालयांनी 31 मार्च पर्यंत संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करावी असे उच्च शिक्षण संचालनालयाच्याwww.dhepune.gov.in या संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
000
वृ.वि. 621 18 फाल्गुन 1939 (सायं 6.25 वा)
जागतिक महिला दिनानिमित्त
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार निलम गोऱ्हे
मुंबई, दि. 5 : जागतिक महिला दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ग्रामविकास,महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार निलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.
‘महिला सक्षमीकरणाची वाटचाल’ या विषयावर ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ६ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
ग्रामीण महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक व राजकीय पातळीवरील प्रयत्न,महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना,अस्मिता योजना, विधी मंडळ आणि संसदेत महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न,महिला व बालविकास विभागाच्या योजना, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती श्रीमती मुंडे व श्रीमती गो-हे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००
वृ.वि. 622 18 फाल्गुन 1939 (सायं 6.25 वा)
'दिलखुलास' कार्यक्रमात साहित्यिक प्रा. कृष्णात खोत
मुंबई, दि.5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास” कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिक कृष्णात खोत यांची विशेष मुलाखत "भिलार पुस्तकांचे गाव" येथे घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या मंगळवार दि. 6 मार्च रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी सातारा युवराज पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे
"भिलार पुस्तकांचे गाव" येथील अनुभव तसेच मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याबाबतचे विचार श्री. खोत यांनी दिलखुलास कार्यक्रमातून व्यक्त केले आहेत.
0000
वृ.वि. 613 18 फाल्गुन 1939 (दु.2.15 वा.)
‘बीएनएचएस’च्या डिजिटायझेशन प्रकल्पाला
राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 5 : पशुपक्ष्यांच्या विभिन्न प्रजातींचा निसर्गातील वातावरणावर तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे पशु-पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी बाँम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) करत असलेले कार्य मोलाचे आहे. सोसायटीच्या डिजिटायझेशन प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यास राज्य शासनास आनंद होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘बीएनएचएस’च्या हॉर्निमन सर्कल येथील इमारतीचा भाडेपट्टा करार लवकरात लवकर वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘बीएनएचएस’च्या हॉर्निमन सर्कल येथील कार्यालयास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘बीएनएचएस’चे अध्यक्ष होमी ख्रुसोखान, संचालक दीपक आपटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘एमएमआरडीए’चे सहआयुक्त संजय खंदारे, ‘बीएनएचएस’चे एन वासुदेवन, डेबी गोयंका आदी यावेळी उपस्थित होते.
पक्ष्यांच्या विविध प्रजातींच्या टॅक्सीडर्मीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. क्युरेटर राहुल खोत यांनी दुर्मिळ प्रजातींची माहिती दिली. यावेळी पक्ष्यांच्या उत्पत्तीस्थानाची व स्थलांतराची माहिती इंडियन बर्ड मायग्रेशन ॲटलासचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तुहीन कट्टी व
डॉ. भालचंद्रन यांनी हे पुस्तक लिहले आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, निर्सगातील पशुपक्ष्यांच्या प्रजाती वाचविण्यासाठी ‘बीएनएचएस’चे कार्य संपूर्ण मानव जातीसाठी अतिशय मोलाचे आहे. अनेकदा कळत-नकळतपणे मानवाकडून पक्ष्यांच्या उत्पत्तीस्थानाला धोका पोहचत असतो. त्यामुळे होणाऱ्या निसर्गातील बदलाचे परिणाम मानवाच्या जीवनावर पडताना दिसते. निर्सगात आवश्यक असलेल्या पशुपक्ष्यांच्या वास्तव्याचे महत्त्व ‘बीएनएचएस’ सारख्या संस्थांमुळे कळत असते.
विकास करताना अनेकदा निसर्गाला धक्का पोहोचत असतो. निसर्गाने जे काही दिले आहे, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे निसर्गाला, पशु-पक्ष्यांच्या उत्पत्ती व वास्तव्य स्थानांना धोका न पोहचू देता शाश्वत विकास कामे करण्यासाठी‘बीएनएचएस’ने वेळोवेळी राज्य शासनास मार्गदर्शन मदत करत आहे. पशुपक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धानसाठी करत असलेले ‘बीएनएचएस’चे काम हे सेवाभावी आहे. त्यामुळे राज्य शासन तसेच शासनाच्या एमएमआरडीए, सिडको या सारख्या संस्था बीएनएचएसच्या कार्याला सर्वतोपरी मदत करतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
श्री. आपटे यांनी संस्थेची माहिती व संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती यावेळी दिली. श्री. ख्रुसोखान यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे स्वागत केले.
०००
नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./5.3.2018
वृ.वि. 614 18 फाल्गुन 1939 (दु.2.15 वा.)
महिला मतदार वाढविण्यासाठी मुंबई शहरमध्ये
आंतरराष्ट्रीय महिला दिनी विशेष मोहीम
मुंबई, दि. 5: मतदार यादीत महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिन दि. 8 मार्च रोजी महिलांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसर दि. 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारीत अंतिम मतदार यादी दि. 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण 24 लाख 53 हजार 102 मतदार असून त्यामध्ये 13 हजार 46 हजार 904 पुरुष आणि 11 लाख 6 हजार 94 स्त्री मतदार आहेत. या यादीमधील आकडेवारीनुसार मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 1 हजार पुरुषांमागे 821 स्त्री मतदारांची नोंद आहे.
अद्याप नाव नोंदविले नाही अशा महिलांचे मतदार यादीत नाव नोंदवून यादीमध्ये महिलांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची व हळदी कुंकू आदी कार्यक्रमातून महिला मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. नव्याने मतदार यादीत नोंदणी केलेल्या स्त्री मतदारांना ओळखपत्राचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे.
मतदार यादीत नाव आहे अथवा नाही याची खात्री महिलांनी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करावी. मुंबई शहरात सर्वसाधारण रहिवास असलेल्या व दि. 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या व अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविले नाही अशा सर्व महिलांनी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या किंवा नमुना 6 भरुन जवळील विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात जमा करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संपदा मेहता यांनी केले आहे.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 5.3.2018
वृ.वि. 615 18 फाल्गुन 1939 (दु.2.15 वा.)
राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई, दि. 5: महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून देण्यासाठीच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकींतर्गत दिनांक 12 मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील; तर दि. 23 मार्च 2018 रोजी मतदान घेण्यात येणार असल्याबाबत निवडणुकीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धीस दिली आहे.
उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला उमेदवारासाठीची नामनिर्देशनपत्रे कक्ष क्र. 1, तळमजला, विधानभवन, मुंबई येथे 12मार्च 2018 पर्यंत सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मिळू शकतील. याच ठिकाणी व याच कालावधीत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी विलास गो. आठवले किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष नलावडे यांच्या समक्ष उमेदवाराची नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 13 मार्च 2018 रोजी दुपारी 12 वाजता कक्ष क्र. 712, सातवा मजला, विधानभवन येथे करण्यात येईल.
उमेदवारी मागे घेण्याची सूचना उमेदवार किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाकडून किंवा उमेदवाराकडून लेखी अधिकार दिलेल्या निवडणूक अभिकर्त्याला दि. 15 मार्च 2018 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास दि. 23मार्च 2018 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असेही निवडणुकीच्या सूचनेनुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 5.3.2018
वृ.वि. 616 18 फाल्गुन 1939 (दु.3.20 वा.)
राज्य राखीव पोलीस बलाच्या ७० व्या वर्धापनदिनामित्त आज कार्यक्रम
मुंबई, दि. 5 : राज्य राखीव पोलीस बलाच्या 70 वा वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त उद्या दि. 6 मार्च रोजी सकाळी 7.30वाजता राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 8, गोरेगाव येथील मुख्य कवायत मैदान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पोलीस बलातील उत्कृष्ट परेड संचलन करणारे 130 पोलीस कर्मचारी समारंभावेळी बंदुकीच्या हर्ष फायरद्वारे 360 फैरी हवेत झाडुन प्रमुख अतिथी पोलीस महासंचालक यांना मानवंदना देणार आहेत. तसेच, पोलीस दलामध्ये प्रशंसनीय कामगिरी करणारे पोलीस अधिका-यांचा गौरव करून सत्कार करण्यात येणार आहे. याचबरोबर पोलीस बलाने आयोजीत केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या अधिका-यांना बक्षिस प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस महासंचालक, मुंबई व अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.