शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते. त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाठपुरावा करीत नगरविकास विभागाला वारंवार लेखी निवेदन देऊन चर्चा केली होती. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही निवेदन दिले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शहरात सर्वसोयीयुक्त असे वातानुकुलीत सांस्कृतिक व नाट्य सभागृहासाठी चार कोटींच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामाकरिता नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत ब्रह्मपुरी नगर परिषदेला चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रातील विद्यार्थी, पालक व नाट्य रसिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सन १८७४ मध्ये ब्रह्मपुरी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून मागील कित्येक दशकापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी शहरात अनेक सांस्कृतिक व नाटकांचे कार्यक्रम होतात. काही नाट्य कलावंतांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले असता आमदार वडेट्टीवार यांनी दोन वर्षाच्या आत सांस्कृतिक व नाट्य सभागृहाचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून विदर्भ वैधानिक मंडळास देण्यात आलेली जागा त्यांच्या उपयोगी नसल्यामुळे ती जागा सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामासाठी देण्यात यावे, आणि ती जागा नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी केली होती. आता ती जागा नगर परिषदेला देल्याने सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तारांकित प्रश्नातून वेधले होते लक्ष
जागेच्या पत्रासह आमदार वडेट्टीवार यांनी पुन्हा नगर विकास विभागाला लेखी निवेदन देवून सतत पाठपुरावा सुरू केला. विधानसभेत तारांकित प्रश्न, कपात सूचना सादर करून शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला प्रशासकीय मंजुरीसुद्धा प्राप्त झाली आहे.