फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्युबिली हायस्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी स्वछता मोहीम हाती घेऊन शाळेच्या दुरवस्थेवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा सभापती राहुल पावडे यांनीसुद्धा पुढाकार घेतला. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाळेच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले होते. याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांच्या कक्षात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. शाळेचे माजी विद्यार्थी जयंत मामीडवार यांनी समन्वय करून ही बैठक घडवून आणली.
यावेळी अभियंता बुरांडे यांनी शाळेच्या नुतनीकरणाचा नियोजन आराखडा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या अवलोकनार्थ सादर केला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आराखड्यामध्ये काही दुरुस्ती व जोड सुचवली. शाळेच्या सभोवताल असलेली सुरक्षा भिंतीची डागडूजी करून उंची वाढवणे, शाळेच्या उजव्या परिसरात खेळाचे पटांगण, व्यायामशाळा तसेच सुशोभीकरण इत्यादी बाबीमध्ये सुधारणा सुचवण्यात आली. शाळेच्या नुतनीकरणाच्या प्रस्तावाचे अंदाजपत्रक साधारण ७ कोटी रुपयांचे तयार करण्यात आले. यामध्ये मुख्य इमारतीच्या नुतनीकरणासाठी साडे पाच कोटी रुपये, वसतिगृह नुतनीकरणासाठी एक कोटी रुपये तसेच संपूर्ण सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची तरतुद असल्याचे बुरांडे यांनी सांगितले.
ज्युबिली हायस्कूलच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव नागपूर येथील रचनाकाराने तयार केला आहे. यामध्ये शाळेच्या संपूर्ण इमारतीची मूळ संरचना कायम ठेवून वर्गखोल्या व प्रयोगशाळा यांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
शाळेच्या मूळ ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हावे, ही सर्व माजी विद्यार्थ्यांची इच्छा लक्षात घेऊनच आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या सूक्ष्म नियोजनासाठी पुढील महिन्यात आणखी एक बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये माजी विद्यार्थी व शाळेचे मुख्यध्यापक यांचे मत विचारात घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बुरांडे यांनी दिली.
इमारतीच्या नूतनीकरणासोबतच शाळेतील इतर सोयी तसेच शैक्षणिक दर्जा पुनर्स्थापणासाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापकांसोबत चर्चा करुन उपाययोजना सुचविल्या.