कोलकाता :
त्रिपुरामध्ये लेनिनच्या पुतळ्याची नासधूस केल्याचे पडसाद तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही उमटले आहेत. कोलकातामधील कालीघाट परिसरात जनसंघांचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं. इतकंच नाही तर हा पुतळा उखडून टाकण्याचाही प्रयत्न झाला.
कालीघाट परिसरातील केवायसी पार्कमध्ये असलेल्या या पुतळ्याला आज सकाळी आठच्या सुमारास काळं फासण्यात आलं.
याआधी त्रिपुरामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता ब्लादिमीर लेनिन आणि तामिळनाडूमध्ये समाजसुधारक तसंच द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.
तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना
मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मूर्तीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी आतापर्यंत सहा तरुणांना अटक केली आहे. हे तरुण जादवपूर विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचं म्हटलं जात आहे.
त्रिपुरात भाजप कार्यकर्त्यांचा राडा, लेनिनचा पुतळा बुलडोझरने तोडला!
दुसरीकडे तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटना दुर्दैवी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. "मूर्तींच्या सुरक्षेवर लक्ष द्या, तसंच अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावलं उचला," असा आदेश मोदींनी दिल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
"दरम्यान केंद्रातील भाजप सरकार सर्व विचारधारा सामावून घेणारं आहे. त्यामुळे त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याच्या घटनेचं आम्ही समर्थन करत नाही," असं अमित शाह यांनीही स्पष्ट केलं आहे.