रखरखत्या उन्हात निघेल़ ४२ किलोमीटरची ही पायदळ यात्रा
जिल्ह्यातील चंद्रपूर- मूल महामार्गावरून भरधाव आणि बेदरकारपणे जाणाऱ्या वाहनांमुळे वन्यजीवांचे निष्पाप बळी जात आहेत़ मागील महिन्यापासून अपघाताची मालिकाच सुरू असून, अवघ्या १५ दिवसांत २ अस्वल, एका चितळाचा जागीच मृत्यू झाला तर बिबट गंभीर जखमी आहे़ महामार्गावरील जंगलग्रस्त भागात वन्यजीवांच्या कायमस्वरुपी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रोच्या वतीने ३१ मे रोजी मूल ते चंद्रपूर 'पैदल मार्च' सत्याग्रह काढण्यात येणार आहे़ सुमारे ४२ किलोमीटरची ही पायी यात्रा रखरखत्या उन्हात निघेल़ भरधाव वाहनांना निष्पाप बळी पाडणा-या मुक्या प्राणीमात्रांसाठी वन्यप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन इको- प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे़,
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन शेजारून जाणारा मूल-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ९३० म्हणून घोषित झाला असून, त्याचे बांधकाम सुरू आहे़ दोन्ही बाजूने विस्तीर्ण घनदाट जंगल आहे़ त्यामुळे येथे वाघ-बिबट्यासह तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठी आहे़ काही भागात जुन्या रोडचा पोत सुधारणा करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी चारपदरी सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम करण्यात येत आहे़ या बांधकामामुळे वाहने एकाच बाजूने वळविण्यात येत आहे़ शिवाय रात्रीच्या वेळी मालवाहू वाहने भरधाव असतात़ अशवेळी मार्ग ओलांडून जाणाऱ्या वन्यजीवांच्या अपघाताला मोठ्या वाहनांची गती आणि लख्ख प्रकाशदिवेही कारणीभूत ठरत असतात़ थेट वाहन पुढे आले की कुठे पळावे, हे वन्यजीवांना कळत नाही़ यापूर्वी या मार्गावर वाघ, बिबट, अस्वल यांचा मृत्यू झालेला आहे़ हा मार्ग ताडोबा ते दक्षिणेकडे इंद्रावती व्याघ्र प्रकल्प व तेलंगाना वनक्षेत्र यांना जोडणारा महत्वाचा वन्यप्राणी भ्रमणमार्ग आहे़ त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी अंडर पासेस तयार करण्याची गरज आहे़ मात्र, या बांधकाम प्रस्तावात कुठेही 'वाइल्डलाइफ मिटिगेशन' बाबत उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत़ मागील १५ दिवसांत घडलेल्या घटनांमुळे वन्यजीवप्रेमी चिंताग्रस्त असून, भविष्यात कायम तोडगा काढण्याच्या दृष्टीने या पैदल मार्चच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे़.