- अश्विन मुदगल
- दीड हजार शेतकऱ्यांना 13 कोटी रुपयांचे नवीन पीक कर्ज
- कर्जमाफीची व्याप्ती वाढल्यामुळे 5 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करा
जिल्हा मध्यवर्ती बँकेची सध्याची समाधानकारक आर्थिक स्थिती आणि उपलब्ध निधीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत नवीन पीककर्ज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. बँकेने 1 हजार 500 शेतकऱ्यांना 13 कोटी रुपयांचा पीककर्ज पुरवठा केलेला आहे. कर्ज सवलतीत पात्र असलेल्या परंतु कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील रकमेचा भरणा करुन शासनाच्या कर्जमाफीच्या दीड लाखापर्यंत कर्ज सवलतीचा तसेच नवीन पीककर्ज उचल करुन शून्य टक्के व्याजदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिलेल्या 23 हजार 119 शेतकऱ्यांना 157 कोटी 67 लक्ष रुपयांची कर्जमाफी झाली आहे. तसेच दीड लाखावरील कर्ज बाकी असलेल्या एकमुश्त कर्ज परतफेड योजनेत पात्र ठरलेल्या 4 हजार 278 शेतकऱ्यांची यादी बँकेला प्राप्त झाली आहे. यापैकी 1 हजार 820 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील दीड लाखावरील रकमेचा भरणा केल्यामुळे 22 कोटी 69 लक्ष रुपये शासनाने अदा करुन या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे. कर्जमाफी अंतर्गत बँकेमार्फत सर्व शेतकऱ्यांवरील दंडव्याज 9 कोटी 43 लक्ष रुपयांची सवलत शेतकऱ्यांना या योजनेमार्फत बँकेने सहभाग दिला असल्याचेही अश्विन मुदगल यांनी सांगितले.
शासनाने कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली असून एप्रिल 2001 पासून मार्च 2009 पर्यंच्या कालावधीत कर्ज घेतलेल्या व 30 जून 2016 पर्यंत थकबाकी असून 31 जुलै 2017 पर्यंत परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेच्या 7 हजार 318 शेतकरी सभासदांना सुमारे 100 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर दिनांक 5 जून 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज करुन पात्र शेतकऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
कर्ज व ठेव योजनेत सहभागी व्हा
बँकेची आर्थिक स्थिती बळकट झाल्यामुळे शासकीय- निमशासकीय तसेच अनुदानित शाळा आदी कार्यालयातील कायम कर्मचारी व अधिकाऱ्यांना सात लाखापर्यंत 10 टक्के व्याज दराने पर्सनल लोन सुविधा सुरु केलेली आहे. सुवर्ण तारण कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज आदी योजना सुद्धा सुरु झाल्यमुळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अश्विन मुदगल यांनी केले आहे. सद्य:स्थितीत बँकेकडे 713 कोटी 58 लक्ष रुपयांच्या ठेवी असून नवीन ठेवी स्वीकारण्यासाठी बँकेने द.सा.द.शे. 8.50 टक्के पर्यंतचे व्याज दराने विविध ठेव योजना तयार केल्या आहेत.