नागपूर/प्रातिनिधी:
विपरीत परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या, आवड़ीला करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्याच प्रोत्साहनाने ज्यांची मुले विविध क्षेत्रात यशाच्या पताका फड़कवित आहेत, अशा मातांचा ह्रद्य सत्कार आज नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला.
निमित्त होते नागपूर महानगरपालिकेतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात मातृदिनानिमित्त आयोजित "अशी असते आई" या कार्यक्रमाचे. तमन्ना इवेंट यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, उपायुक्त रवींद्र देवतळे, तमन्ना इवेंट्सचे आसीफ खान, नित्यानंद तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रात नागपूर शहराची मान उंचावणाऱ्या कर्तबगार मुलांच्या मातांचा सत्कार करण्यात आला. क्रिकेटपटू मोना मेश्राम हिची आई छाया मेश्राम, बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिची आई अंजली भाले, आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू निखिलेश तभाने याची आई कल्पना तभाने, धावपटू मोनिका राऊत हिची आई सुलोचना राऊत, यांच्यासह गोदावरी झाडे, रेखा शेलारे, अरुणा गौरखेडे, वंदना अंतूरकर, मृण्मयी घनोटे, अर्चना पारधी, अनुपमा रंभाड या मातांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आई या दोनच अक्षरांमध्ये विश्व सामावले आहे. माणसाच्या जन्मापासून अंतापर्यंत ही अक्षरे तो विसरू शकत नाही. आज आपल्या देशात कुटुंब व्यवस्थेतील संस्कार केवळ आईमुळे टिकून आहेत, म्हणूनच येथील संस्कृतीचा अभ्यास परदेशातील लोक करतात, असे म्हणत त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सृष्टी बारलेवार हिने गायलेल्या “लोरी सुना फिर से” या गाण्याने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या गाण्यानंतर सृष्टीची आई रंगमंचावर आली आणि तिच्यासाठी 'निंबोणीच्या झाडामागे” हे गीत गायले. “एकटी एकटी घाबरलीस ना” आणि “मेरी माँ“ ही दोन गाणी तिने सादर केली. श्रेया खराबे हिने “पास बुलाती है” या गाण्याने एन्ट्री घेतली. त्यानंतर “तू कितनी अच्छी है“, “आई सारखे दैवत” आदी गाणी तिने सादर केली. सुप्रसिद्ध गायक फरहान साबरी आणि झैद अली यांनी आईवर आधारित लोकप्रिय गाणी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामल देशमुख हिने केले.
कार्यक्रमाला जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, मंगळवारी झोन सभापती संगीता गिरे, हनुमान नगर झोन सभापती रुपाली ठाकूर, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका मंगला खेकरे, नेहा वाघमारे, विरंका भिवगड़े, पाटील, शीतल कामडी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, क्रीड़ा निरीक्षक नरेश चौधरी, आदीं उपस्थित होते.