वीज खर्चात बचत करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने इमारतीच्या छतावर सोलर पॅनेल बसविले आहेत. या सोलर पॅनेलमधून प्राप्त होणाऱ्या सौर ऊर्जेमुळे मनपाच्या वीज खर्चात मोठी बचत होणार आहे. बुधवारपासून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
मनपाची अद्ययावत इमारत आहे. याच इमारतीतून मनपाचा कारभार चालतो. इमारतीत अनेक विभाग आहेत. पदाधिकारी, अधिकाऱ्यांची पूर्ण वेळ बैठक येथे आहे. त्यामुळे सरासरी सात हजार युनिट विजेचा वापर दर महिन्याला होतो. त्यामुळे महिन्याकाठी एक ते दीड लाख रुपयांचे देयक महावितरणला द्यावे लागते. वाढत्या मागणीमुळे वीज बचतीसोबतच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे.
ही गरज ओळखून मनपा प्रशासनाने मुख्य इमारतीवर सोलर पॅनेलद्वारे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हसन मार्केटिंग प्रा. लि. चंद्रपूर या कंपनीला प्रकल्प उभारण्याचे कंत्राट देण्यात आले. ३२० चौरस मीटर क्षेत्रात प्रकल्प उभारण्यात आला. ५० केडब्ल्यूपी इतक्या क्षमतेच्या या प्रकल्पातून दर महिन्याला सुमारे तीन हजार युनिट विजेचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे मनपाच्या वीज बिलात सुमारे ४० टक्के बचत होणार आहे.
सदर प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, अभियंता विजय बोरीकर, प्रगती भुरे, चिन्मय देशपांडे यांनी पुढाकार घेतला.
ग्रीडला पाठविणार वीज
मनपाचा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या ग्रीडशी जोडण्यात आला आहे. प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेतून मनपाची विजेची मागणी पूर्ण होणार आहे. पावसाळ्यात, हिवाळ्यात शिल्लक राहणारी वीज ग्रीडला पाठविण्यात येणार आहे.