आतापर्यंत काढला आठ हजार घनमीटर गाळ
नागपूर महानगरपालिकेच्या ७ मे पासुन सुरू झालेल्या नदी स्वच्छता अभियाने गती धरली आहे. १३ मे पर्यंत तीनही नदीतून आठ हजार घनमीटर गाळ काढण्यात आलेला आहे.नागपूर महानगरपालिकेद्वारे केंद्रीय नदी व पर्यावरण स्वच्छता योजनेअंतर्गत ७ मे ते २० जून या काळात नागपुरातील नाग, पिवळी, पोरा नदी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे.
विविध झोनमध्ये येणाऱ्या नदी स्वच्छतेच्या या कार्याने गती धरली असून आतापर्यंत आठ हजार घनमीटर गाळ नदीतून काढण्यात आलेला आहे. तीनही नद्या मिळून २८४४ मीटर लांब नदी स्वच्छ करण्यात आली आहे.
या अभियानामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, नागपूर मेट्रो रेल्वे, ओसीडब्ल्यू, तसेच शहरातील उद्योग समूह, संस्था सहभाग नोंदवित आहे. या अभियानात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.