जिल्ह्यातील हिवताप विभागा अंतर्गत आरोग्य तपासणी व सल्ला देतांना वैद्यकीय अधिकारी |
नागपूर/ललित लांजेवार:
क्युलेक्स या डासांच्या मादीमुळे होणाऱ्या जपानी एन्सेफेलायटीस अर्थात जापनीज मेंदूज्वराने पूर्व विदर्भातला चंद्रपूर जिल्हा सध्या चांगलाच फणफणला आहे. चालू वर्षात आतापर्यंत या आजाराचे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास ५ रुग्ण आढळून आल्याची माहिती चंद्रपूर येथील मलेरिया अधिकारी डॉ.कुक्कुडपवार यांनी दिली. विशेष म्हणजे हे पाच रुग्ण एकट्या मे महिन्यातील आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरात आढळून आले, हे रुग्ण चंद्रपूर व आंध्रप्रदेश राज्याच्या सीमालगतच्या भागात आढळून आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात शिवणी-नंदवर्धन उप.केंद्र अंतर्गत व पोम्भूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे आरोग्य उपकेंद्रात काही दिवसा अगोदर आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णाच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले होते. मात्र यातील काही रुग्णांनी सांगितलेल्या लक्षणा प्रमाणे त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले व ते नमुने नागपूर येथील प्रगोगशाळेत पाठविण्यात आले, नमुने तपासणीचे रिपोर्ट हाती आल्यानंतर यातील ५ रुग्णांना आजाराची लागण झाल्याचे समजते, यात गोंडपिपरी तालुक्यात शिवणी-नंदवर्धन उप.केंद्राअंतर्गत येणाऱ्या २ रुग्णांना व पोम्भूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ३ रुग्णांना क्युलेक्स या डासांच्या मादी चावल्यामुळे जपानी मेंदूज्वर झाल्याचे निष्पन्न झाले,या रुग्णांना या रोगाची लागण नुकतीच झाली असल्याने त्यांना जास्त त्रास जाणवला नाही. मात्र त्याचे लक्षणे आढळून आल्याने आरोग्य विभागाने जिल्हाभर ग्रामीण भागात आरोग्य सेवक व आशा वर्कर यांच्या मदतीने तपासणी शिबीर व जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
घरोघरी जाऊन जनजागृती करतांना |
ग्रामीण भागात तसेच झोपडपट्टीत आढळणारी डुकरे ही या आजाराच्या विषाणूचे मुख्य वाहक असतात. डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू बराच कालावधी टिकतात. क्युसेक्स ही डासांची मादी डुकरांना चावते. त्यामुळे त्याचे विषाणू डुकरांच्या शरीरात जातात. मात्र, या विषाणूपासून डुकरांना अपाय होत नाही. मात्र डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात, तेव्हा ९ ते १२ दिवसांनंतर माणसांमध्ये जपानी मेंदूज्वराची लक्षणे दिसू लागतात. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीतसुद्धा विषाणूंचा प्रसार करतात.
ज्या भागात स्थलांतर करणारे बगळे, पाणकोंबड्यांसारखे पक्षी वास्तव्य करतात, तेथेही या पक्ष्यांकडून डासांमार्फत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या पाचही रुग्णांवर तत्काळ औषध उपचार करू त्यांची फेरतपासणी करण्यात आली त्यात त्यांना कोणताच त्रास नसल्याचे रुग्णांनी म्हटले.
याच रोगाचे आणखी ७ रुग्ण भंडारा व गडचिरोली येथे आढळून आले ज्यात ६ रुग्ण हे भंडारा जिल्ह्यातील असून गडचिरोलीतील एका रुग्णाचा समावेश आहे.या रोगाचे विषाणू रक्तात अल्पकाळ टिकतात. त्यामुळे या रोगाचा प्रसार माणसांमार्फत होत नाही. माणसाला झालेला जंतूसंसर्ग मर्यादित राहतो. या रोगाची लागण लष्करातील सैनिकांना होण्याची जास्त शक्यता असते. विदेशी प्रवासी जर ग्रामीण अधिक काळ वास्तव्य करणार असतील तर त्यांनाही या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे, या रोगाची साथ मोठया प्रमाणावर येत नाही. ज्यांना लक्षणे दिसतात त्यापैकी क्वचित एखादी व्यक्ती दगावते. त्यातही ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आढळते.
रोगाचा प्रकार : किटकजन्य रोग
पूर्व इतिहास
सामाजिक दृष्टया गरीब वर्गामध्ये मे पासून हिवाळयापर्यंतच्या कालावधीत हा रोग प्रामुख्याने आढळतो. या रोगाचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये विशेष करुन आढळतो. हा आजार स्ञी पुरुष दोघांमध्येही आढळून येतो तरीही पुरुषांमध्ये यांचे प्रमाण जास्त आढळते. जपानी मेंदूज्वराचे रुग्ण विखुरलेला स्वरुपात आढळतात.
साथरोग घटक
जपानी मेंदूज्वराच्या घटना प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब लोकांमध्ये विशेषतः डुकरे पाळण्याचा व्यवसाय करणा-या लोकांमध्ये दिसून येतात. पक्षी किंवा डुकराव्यतिरिक्त गायी, म्हशी आणि वटवाघुळामध्ये सुध्दा या रोगाच्या अॅन्टीबॉडीज आढळून येतात.
रोगवाहक
जपानी मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार आहे तो क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासामुळे पसरतो.
रोगजंतूचे जीवनचक्र
हा प्रामुख्याने प्राण्यांचा आजार असून याचा प्रादुर्भाव कधी कधी माणसांना होतो. या आजाराच्या विषाणूंचे निसर्गातील व्यवस्थापन प्रामुख्याने डुकरे, पक्षी यांमध्ये होते. प्रामुख्याने गाई-गुरांच्या भोवती चरणारे पक्षी (बगळे)किंवा तळयाभोवती वावरणारे पक्षी यांच्या शरीरात हा विषाणू वाढताना दिसतो. या रोगाच्या जैवचक्रात डुकरे व पाणपक्षी हे विषाणूंचे यजमान ( Vriaemia Host ) म्हणून काम करतात. या नैसर्गिक यजमानांमध्ये विषाणू वाढत असला तरी त्यांच्यात रोगाची लक्षणे दिसत नाहीत. या प्राण्यांना चावणा-या प्रामुख्याने क्युलेक्स जातीच्या डासांपासून या रोगाचा प्रसार होतो.
पर्यावरणीय घटक
पावसाळा पूर्व व पावसाळी अशा डासोत्पत्तीस पोषक वातावरणात या रोगाचा प्रसार होताना दिसतो.
रोगप्रसाराचे माध्यम
जपानी मेंदूज्वराचा विषाणू माणसाव्यतिरिक्त प्रामुख्याने प्राणी व पक्ष्यांमध्ये आढळतो.
या विषाणूच्या प्रसाराचे प्राथमिक चक्र
अ) डुक्कर -- डास --- डुक्कर
आ) पक्षी –-- डास --- पक्षी
या प्रमाणे आहे. या रोगाचा प्रसार माणसामध्ये विषाणू दुषित डासांच्या चावण्याने होतो.
अधिशयन काळ
या विषाणूचा माणसांमधील अधिशयन काळ ५ ते १५ दिवसांचा आहे. डासांची मादी '' विषाणू दूषित “प्राण्याला चावल्यामुळे दुषित होते. नंतर या दुषित मादीपासून ९ ते १२ दिवस पर्यंत या विषाणूंचा प्रसार मानवासह इतर प्राण्यांमध्ये होऊ शकतो.
लक्षणे व चिन्हे
सुरुवातीच्या आठवडयात हुडहुडी भरुन ताप, डोकेदुखी व अंगदुखी ही लक्षणे दिसतात. रुग्ण बेशुध्द अवस्थेत जाऊ शकतो. या रोगामुळे प्रामुख्याने लहान मुलांचे मृत्यू जास्त होतात. या आजारामध्ये काही रुग्णांमध्ये मळमळ, डोकेदुखी, ताप, उलटया व कधीकधी वृषणावर सूजही दिसून येते. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार, भावनिक परिणाम व अपंगत्व इत्यादी परिणाम होऊ शकतात.
रोगाचेनिदान
या रोगाचे निदान प्रामुख्याने रुग्णांच्या रक्तजलातील अॅन्टीबॉडीज शोधून किंवा ELISA पध्दतीव्दारे तसेच पाठीच्या मणक्यातील पाण्याच्या तपासणी (CSF) व्दारे करण्यात येते.
औषधोपचार
*जपानी मेंदूज्वरावर कोणताही विशिष्ट असा उपचार नाही. रुग्णास हालवताना खालील काळजी घेणे आवश्यक आहे –
*रुग्णास एका कडेवरच झोपवून ठेवावे.
*रुग्णाच्या तोंडाची पोकळी व नाक स्वच्छ ठेवा. चिकटया ओढून घेण्याच्या यंञाचा उपयोग करावा.
रुग्णास मान वाकवू देऊ नये.
*ताप जास्त असल्यास रुग्णांचे शरीर ओल्या फडक्याने पुसून काढावे.
*मोठे आवाज व प्रखर प्रकाश टाळावा.
प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना
डासांमुळे होणारा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता नाल्यात फवारणी करतांना कर्मचारी |
*मेंदूज्वराच्या रुग्णांची व्यवस्थित नोंद ठेवणे.
*डासांच्या घनतेवर नियंञण ठेवून विषाणूंचा प्रसार रोखणे.
*तातडीची वैदयकिय मदत.
*डासनियंञण व रुग्णाचे पुनर्वसन यासाठी लोकसहभाग.जपानी मेंदूज्वराच्या नियंञणाचे उपाय किटकशास्ञीय अभ्यास करणे.
*लागण झालेल्या गावात धूरफवारणी करणे.
*लोकांचे आरोग्य विषयक प्रशिक्षण, स्वच्छतेचे महत्व समजावणे, तसेच डुकरांच्या संख्येवर नियंञण करणे. *नैसर्गिक डासोत्पादन स्थाने शोधण्यासाठी सर्वेक्षण करुन त्यातील योग्य जागी डासअळी नियंञणासाठी गप्पीमासे सोडणे.उपचाराच्या सुविधा लोकसहभाग.
आरोग्य शिक्षण संदेश
*रुग्णांची नोंदणी करणे.
*रुग्ण मोठया रुग्णालयात हालवण्यासाठी वाहतूक व्यवस्था करणे.
*घरांमधील फवारणी, डास अळीप्रतिबंधक उपाययोजना खड्डे बुजवून पाण्याचे साठे कमी करणे, डुकरांच्या संख्येवर नियंञण करणे, वेळोवेळी भातशेती मधील पाण्याचा निचरा करणे.
*वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, डास प्रतिबंधक विविध साधनांचा वापर करणे. डुकरांची निवासस्थाने वस्तीमध्ये न ठेवणे.
*आपापल्या गावांमध्ये मेंदूज्वराचा रुग्ण आढळल्यास ताबडतोब आरोग्य कर्मचा-यांना किंवा गावच्या सरपंचांना सूचित करणे.
*रुग्णांची नोंदणी करणे.
*रुग्ण मोठया रुग्णालयात हालवण्यासाठी वाहतूक व्यवस्था करणे.
*घरांमधील फवारणी, डास अळीप्रतिबंधक उपाययोजना खड्डे बुजवून पाण्याचे साठे कमी करणे, डुकरांच्या संख्येवर नियंञण करणे, वेळोवेळी भातशेती मधील पाण्याचा निचरा करणे.
*वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, डास प्रतिबंधक विविध साधनांचा वापर करणे. डुकरांची निवासस्थाने वस्तीमध्ये न ठेवणे.
*आपापल्या गावांमध्ये मेंदूज्वराचा रुग्ण आढळल्यास ताबडतोब आरोग्य कर्मचा-यांना किंवा गावच्या सरपंचांना सूचित करणे.