11 ते 13 फेब्रुवारीला ग्रामीण भागात गोळया
वाटप
11
ते 15 फेब्रुवारीला शहरी भागात गोळया वाटप
चंद्रपूर दि.4- हत्तीरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी
चंद्रपूर जिल्हयात 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सामुदायिक औषधोपचार
मोहिम राबविण्यात येणार असून या काळात हत्तीरोग नियत्रंणासाठी आपल्या घरी
आरोग्य कर्मचारी येणार असून त्यांनी दिलेल्या गोळया त्वरीत घ्याव्यात असे
आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये यांनी केले. ते आरोग्य विभागाच्या
वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रपूर जिल्हयाच्या ग्रामीण
भागात 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी व शहरी भागात 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान
हत्तीरोग दुरीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. 2015 पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे
निर्मूलन करण्याचा शासनाचा उद्देश असून यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
त्यांनी केले.
या मोहिमेसाठी जिल्हयात डिईसीच्या
55 लाख तर अल्बेंडाझॉल च्या 23 लाख गोळया उपलब्ध असून नागरीकांनी या गोळयांची एकच
मात्रा जेवनानंतर सेवन करणे आवश्यक आहे.
या गोळया 2 ते 5 वयोगटासाठी एक गोळी, 6 ते 14 वयोगटासाठी 2 गोळया व 15 चे
वर वयोगटासाठी 3 गोळया देण्यात येतील.
गंभीर आजारी, गरोदर स्त्रिया व 2 वर्षाखालील बालके यांना या गोळया देण्यात
येवू नये असेही त्यांनी सांगितले. एकदिवसीय
औषधोपचाराने हत्तीरोगावर आळा घालणे, हत्तीरोग रुग्णांवर उपचार करणे व भविष्यातील
अंपगत्व रोखणे शक्य होणार आहे.
हत्तीरोग मुळात डासापासून होणारा
आजार असून या आजाराचा प्रतिबंध करणे शक्य आहे. मात्र आजारी रुग्णांना आलेली विकृती दुर करणे
शक्य नाही. त्यामुळे या मोहिमेत सर्वांनी
गोळयांचे सेवन करावे असेही ते म्हणाले. डासांच्या प्रादुर्भावामुळे होणा-या या
रोगाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी कोरडा दिवस पाळणे महत्वाचे असल्याचे डॉ.आठल्ये
यांनी यावेळी सांगितले.
हत्तीरोगावर डीईसी हे औषध अत्यंत
प्रभावीपणे काम करते. ते स्वस्त व परिणामकारक असल्याने एका वर्षातून एकदा
वयोगटानुसार सेवन केल्यास हत्तीरोगावर आळा घालता येतो. डीईसी गोळया सुरक्षित असून हत्ती रोग नसलेल्या
रुग्णांस गोळया सेवनांने काहीच अपाय होत नाही. परंतु ज्यांचे रक्तात हत्ती रोगाचे
जंतू असतील त्यांना किरकोळ ताप, मळमळ, उलटी इत्यादी लक्षणे दिसतात व त्यामुळे हत्तीरोगाची ओळख पटते असे डॉ.आठल्ये
यांनी सांगितले.
ऑगष्ट 2012 च्या पहाणीनुसार
जिल्हयात पंधराही तालुक्यात 22 हजार 384 हत्तीरोग रुग्ण असून त्यातील 20 हजार 514
ग्रामीण भागात तर 1870 शहरी भागात आहेत. यात
एकूण 12 हजार 32 पुरुष तर 10 हजार 352 स्त्री रुग्ण आहेत असे सांगून
डॉ.आठल्ये म्हणाले की, भविष्यात हा रोग होवू नये म्हणून आतापासूनच काळजी
घेण्यासाठी ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
हत्तीरोग निर्मूलन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे
आवाहन डॉ.अनिरुध्द आठल्ये यांनी केले.