ताडोबा प्रवेश शुल्काची रक्कम ग्राम विकासासाठी 27
लाख 61 हजार खर्च
चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्र
प्रकल्पात पर्यटनासाठी व सफारीसाठी येणा-या पर्यटकांकडून मिळणा-या प्रवेश शुल्काची
रक्कम ग्राम विकासासाठी खर्च करण्यात येत असून सन 2011-12 मध्ये ग्राम विकासावर 27
लाख 61 हजार खर्च झाला असून आता प्रवेश शुल्क वाढल्यामुळे 2013-14 मध्ये 37 लाख 50
हजार रुपये ग्राम विकासासाठी उपलब्ध होणार आहेत.
मध्ये
प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन शुल्क स्थानिक विकास निधीमध्ये जमा
करुन हा निधी परीसरातील गावाच्या विकासासाठी खर्च करण्यात येतो. याच धर्तीवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात
येणा-या पर्यटकांकडून मिळणा-या प्रवेश शुल्काच्या 30 टक्के रक्कम स्थानिक गावे व
त्यातील नागरीकांच्या विकासासाठी खर्च करण्याचा निर्णय 2010 साली वनविभागाने
घेतला. यासाठी टायगर कंझर्व्हेशन
फांऊडेशनची स्थापना करण्यात आली. 2010
पासून हे फांऊडेशन कार्यरत असून ताडोबामध्ये पर्यटकांकडून प्राप्त होणारे प्रवेश
शुल्क फांऊडेशनच्या खात्यात जमा केल्या जाते.
सदर
फाऊंडेशनमधून प्राप्त होणा-या मिळकती मधून नियामक मंडळाच्या मंजूरीनुसार 30 टक्के
रक्कम स्थानिक गांव व नागरीकांच्या विकासासाठी खर्च करण्यात येते. सन 2011-12
मध्ये 27 लाख 61 हजार ग्राम विकासावर खर्च झाला. तर 2012-13 मध्ये ग्राम विकासासाठी
24 लाख एवढी रक्कम फाऊंडेशनचे अर्थसंकल्पात प्रस्तावित केली असून सन 2012-13 मध्ये
प्रवेश शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळे सन 2013-14 मध्ये ग्राम विकासासाठी अंदाजे 37
लाख 50 हजार रुपये अधिक उपलब्ध होणार आहेत.
ताडोबा
अंधारी व्याघ्र प्रकल्पात सन 2010 पर्यंत जंगल सफारीकरीता प्रवेश शुल्क 10
व्यक्तीसह वाहन 250 रुपये याप्रमाणे
होते. माहे ऑक्टोंबर 2012 मध्ये वाढ करुन
750 रुपये व शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी 1 हजार रुपये करण्यात
आले. यातून वनविभागास मोठया प्रमाणात
महसूल जमा झाला. या पैकी 30 टक्के निधी
स्थानिक विकासावर खर्च करण्याचा निर्णय वनविभागाने घेवून गावक-यांना विकासाच्या प्रवाहात आनण्याचे
कार्य केले. सोबतच स्थानिक युवकांना पर्यटक मार्गदर्शक म्हणून रोजगारही दिला.
वन्यजीव
प्रेमी व पर्यटकांकडून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला देणगी म्हणून काही
देण्याची इच्छा अनेक वेळा व्यक्त केली जात होती.
त्यासाठी योग्य ती व्यवस्था व बदल्यात त्या देणगीदाराला स्मृतीचिन्ह म्हणून
काही भेट वस्तु व सवलती देणे हे विचाराधीन होते.
त्यासाठी नियामक मंडळात चर्चा होऊन स्वच्छेने देणगी देणा-या मर्यादीत
देणगीदाराना वाईल्ड महाराष्ट हे पुस्तक स्मृतीचिन्ह म्हणून देऊन प्राथमिकतेने
प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे फाऊंडेशनच्या राजस्वामध्ये भर पडली व वन्यजीव प्रेमींना ताडोबा
अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मदत करण्याचा मार्ग सुकर झाला.
ताडोबा पर्यटन हे फक्त श्रीमंतासाठी मर्यादित होवू नये म्हणून
प्रस्तावित निसर्ग आराखडयामध्ये पर्यटकांसाठी स्वस्त दरात मिनीबस उपलब्ध करुन
देणे, सवलतीच्या दरात प्रवेश या बाबी प्रस्तावित असून त्या लवकरच अंमलात येतील असे
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक विरेंद्र
तिवारी यांनी सांगितले.