मुंबई /प्रतिनिधी: मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 22 कुटुंबांचा आधार हरपला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मिळून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत गेलेल्या माणसाची उणीव भरुन काढणारी नाही.
चेंगराचेंगरीत कांजूरमार्ग येथील दोन मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला. कंजूरमार्गच्या मिराशी नगरमध्ये राहणाऱ्या शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता शेट्टी या दोघींची चांगली मैत्री होती. दोघी मूळच्या कर्नाटकच्या आहेत. सणाच्या निमित्ताने दोघी फुलांची खरेदी करण्यासाठी एकत्र जात असत.
शुभलता शेट्टी आणि सुजाता शेट्टी दसऱ्याच्या निमित्ताने फुलं आणण्यासाठी एकत्र परेलला गेल्या होत्या. मात्र फुलं खरेदी करुन परतताना एल्फिन्स्टनच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि यातच दोघींचाही मृत्यू झाला.