कोरची : मानधन वाढीच्या विषयावर अंगणवाडी महिला कर्मचाºयांचा राज्यव्यापी संप सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातही या संपाची तीव्रता अद्यापही कायम आहे. अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या समस्यांच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने भामरागड तालुका मुख्यालयी व कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान संतप्त झालेल्या अंगणवाडी महिला कर्मचाºयांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
भामरागड येथे अंगणवाडी महिला संघटनेच्या पदाधिकारी सुनंदा बावणे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, मागणी न करताही आमदार, खासदारांच्या मानधनात हजारो रूपयांची वाढ केल्या जाते. त्यांचे भत्तेही वाढविल्या जातात. मात्र अंगणवाडी महिलांच्या मानधन वाढीसाठी महिलांना रस्त्यावर उतरावे लागते. हे महाराष्टÑाचे दुर्देव आहे, असे ते म्हणाले.यावेळी संध्या रापर्तीवार, उषा मेश्राम, सुनंदा उईके, ज्योती धुर्वाे, राधा मांजी, पावर्ती सिडाम आदी उपस्थित होते.
कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे वंदना टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी करूणा कावळे, वनिता सहारे, उषा शेंडे आदी उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी शासन धोरणाचा निषेध करीत सत्ताधाºयांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या मानधनवाढीसह विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांना संप पुकारावा लागला. संपामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद आहे. त्यामुळे बालविकास प्रकल्प कार्यालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे, असे प्रा. दहीवडे म्हणाले.