সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 14, 2017

परिस्थिती

कथा..........

- कल्याणी मुळे, नागपूर

नवरा दारू पिऊन सहा महिन्यापुर्वी वारला. तीन मुलांची जबाबदारी तीच्याच खांद्यावर येऊन पडली. ना कसलं शिक्षण ना कसलं कलाकौशल्य.ती आता धुण्या भांड्‌याची कामं करत असे. या पावसात लादी पुसताना तिचं पुर्ण अंग भरुन येई कारण आयुष्यभर नवर्याच्या हातून खाल्लेला मुका मार आता वर तोंड काढत होता. पण आता बादल्या भरभरून धुणं आणि बेसिन ओसंडून वाहणारी खरकटी भांडी घासल्याशिवाय काहीही पर्याय न्हवता. मुलं मोठी होत होती तशी त्यांची भुक पण मोठी झाली होती.

मागच्या महिन्यात लेकीच्या आजारपणात आगाऊ घेतलेली उचल आणि पगार संपून गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून घरात खायला काहीही न्हवतंच. तसेही नेहमी पोटभर होतं असं नाही पण गेले दोन दिवस अक्षरशः काहिच न्हवतं.तिने गेले तीन दिवस पोटाला फडकं करकचून आवळून आणि मिसरीचा तोबरा भरून भुकेला चकवा दिला होता. पण आज सकाळीच कामाला निघताना धाकट्‌या लेकराने पायाला मिठी मारून " आई.... खायला " म्हटलं तेव्हा तिला गलबलून आलं होतं. ती तशीच कामावर पोहचली ....... ! कामं उरकली.
"बाई ..... थोडं काम होतं "
"हं बोल " बाईनी टिव्ही वरुन नजर न ढळवता म्हटलं
"जरा दोनशे रूपये पाहिजे होते " ती खालमानेनं म्हटली
आता बाईंनी टिव्ही वरील नजर हटवून हिच्याकडे पाहिलं तेव्हा त्या नजरेत राग काठोकाठ भरलेला होता.
"मागच्याच महिन्यात उचल दिली होती ना, पैसे काय झाडाला लागतात ?"
"नाय, पण घरात खायला काय सुदीक नाय ..... तवा जरा ....." ती पायाच्या बोटांनी फरशीला खड्डा पाडण्याचा प्रयत्न करत म्हटली
बाईंच्या तोंडावर बरेच शब्द आलेले पण डॉक्‍टरांनी दिलेला मनस्ताप टाळण्याचा सल्ला त्यांना आठवल्यामुळे त्यांनी स्वतःला आवरले
"हे बघ सतत पैसे मागायचे असतील तर तु नाही आलीस तरी चालेल , हे शंभर रूपये घे पण पुढच्या महिन्या शिवाय आता काही मागु नकोस'
किराण्याच्या दुकानात जाईपर्यंत ती शंभर रूपयाची नोट तीने कितीतरी वेळा उलटून पालटून पाहिली. दुकानदाराकडून मसाला ,तेल आणि तांदूळ घेतल्यावर अत्यंत अनिच्छेने त्याच्या हातात ती नोट दिली. सामानाची पिशवी छातीशी धरून ती लगबगीने घराकडं निघाली तेव्हा पावसाने देखिल जोर धरला होता.

"भडव्या तुला चार फोन केले तेव्हा एक उचलतोस. लोणावळ्याला वर्षा विहाराला जायचं हे मागच्या आठ दिवसांपूर्वी आपलं ठरलं होतं ना ?"
"अरे हो पण माझा बाप तुम्हाला माहिती आहे ना , गाडी साठी त्याचं मन वळवता वळवता नाकी नऊ आले तेव्हा कुठे आज गाडी मिळाली "
"चल जाऊ दे, घे एक सिप मार " त्याने बिअर पुढे केली
त्याने गाडीच्या एक्‍सिलेटर वर पाय देत बाटली हातात घेतली आणि ती थंडगार बियर घशात ओतायला सुरुवात केली. पेय उत्तेजक होतं. त्याला बरं वाटलं.त्याने ?क्‍सिलेटर वर आणखी जोरात पाय देत बाटली पुन्हा तोंडाला लावली.
" अरे , अरे समोर ती बाई बघ ...... अरे ब्रेक ब्रेक ..... " गाडीत एकच आवाज झाला
तोपर्यंत उशीर झाला होता . पिशवी घेऊन निघालेली ती बाई एका धक्क्‌यात बाजूला चिखलात जाऊन पडली होती.
" गाडी थांबवू नकोस , पळ, पळ चल पटकन " कुणीतरी ओरडत होतं.
त्याने एक्‍सिलेटर वर आणखी जोरात पाय देत गाडी तिथून सुसाट लोणावळ्याच्या दिशेने दामटली.

ती काही कळायच्या आत एका जोरदार धक्क्‌याने हवेत उडून पडली. "खूप वेदना" एवढीच तिला जाणीव होत होती. कुठलंतरी हाड मोडलेलं असावं. रस्त्यावरील लोक पळत आले होते त्यातील कुणीतरी तरी तिला उठवून बसवलं.
"कोण होते हरामखोर ?"
"हि बड्‌या बापाची मुलं ....... "
"चाबकाने फोडले पाहिजेत एकेकाला ..... "
लोकांचा गलका सुरू होता. पण तीला काहीही ऐकू येत न्हवतं कारण तीची नजर काहीतरी शोधत होती ....... आणि तिला ती दिसली .........
जवळच साठलेल्या काळ्याशार पाण्यात ती उलथी होऊन पडली होती. आतला तांदूळ त्या पाण्यात गडप झाला होता तर तेल त्या काळ्याशार पाण्यावर आपला तवंग उठवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतं.
तीला ते सगळं समजायला काही क्षण जावे लागले आणि मग तीने एकच हंबरडा फोडला. पाऊस पुन्हा पडायला सुरुवात झाली होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.