पिटीआय वृत्तसंस्था/
जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पनामा पेपर्स घोटाळाप्रकरणी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) लवकरच त्यासाठी बच्चन कुटुंबीयांना नोटीस बजावली जाऊ शकते. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. गेल्यावर्षी पनामा पेपर्स घोटाळा उघड झाल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. जगभरातील अनेक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींनी परदेशात बोगस कंपन्या स्थापन करून आपल्याकडील काळा पैसा त्याठिकाणी गुंतविल्याची माहिती समोर आली होती.
‘पीटीआय’च्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी ‘ईडी’कडे याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्यामुळे आता ‘ईडी’ बच्चन परिवारातील इतर सदस्यांनाही चौकशीसाठी पाचारण करणार असल्याचे समजते. याशिवाय, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक विभागानेही यापूर्वीच बच्चन कुटुंबीयांकडे त्यांनी परदेशात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे तपशील मागितले होते. त्यानंतर बच्चन कुटुंबीयांनी ही माहिती ‘ईडी’पुढे सादर केली होती. आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पनामा पेपर्स घोटाळ्यात अमिताभ बच्चन यांचे नाव समोर आल्यानंतर आयकर खात्यानेही तपासाला सुरूवात केली होती. त्यांच्याकडूनही बच्चन यांच्या परदेशातील गुंतवणुकीची चौकशी सुरू झाली होती.
जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्समध्ये नमूद केल्याप्रमाणे आपला कोणत्याही परदेशी कंपनीशी संबंध नाही, असा दावा अमिताभ यांनी केला होता. मात्र, त्यानंतर अमिताभ यांच्याविरोधात काही पुरावे समोर आले होते. पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदा कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे १९९३ ते १९९७ या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. मात्र, हे वृत्त प्रसिद्ध झाल्याच दुसऱ्याच दिवशी अमिताभ यांनी त्याचा इन्कार करत आपल्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राच्या हाती लागलेल्या माहितीमुळे त्यांच्या दाव्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.