नागपूर/प्रतिनिधी:
मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे पुरस्कारासाठी यंदा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी जे सामाजिक कार्य केले त्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मारवाडी फाउंडेशनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येत असतो. समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद, जुन्या रुढी, परंपरा या बाबींचा नायनाट करण्यासाठी लोकजागृती करणारे सत्यपाल महाराज यांची यंदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापूर्वी (स्व.) डॉ. भा. ल. भोळे, पन्नालाल सुराणा, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. एन. डी. पाटील, रामकृष्णदादा बेलूरकर, शरद जोशी, डॉ़ सदानंद मोरे, अॅड. मा. म. गडकरी, गिरीश कुबेर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार प्रदान समारंभ प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनी, २० नोव्हेंबर २०१८ रोजी नगपुरात होणार आहे.