दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सावंगी (मेघे) ठाण्यातील पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून शुक्रवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गावठी दारू गाळणाऱ्या चौघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गावठी दारूसह इतर साहित्य असा एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
विवेक मुरलीधर पलटनकर (२०), संदीप अविनाश पवार (२०), रंजीत नेहरु राऊत (२६) व सुभाष बकाराम भलावी (५८) सर्व रा. पांढरकवडा पारधी बेडा, असे ताब्यात घेतलेल्या दारूविक्रेत्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पांढरकवडा पारधी बेडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तेथे छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. सदर मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूविक्रेत्यांनी जमिनीत लपवून ठेवलेल्या कच्चा मोह रसायन सडव्याचा शोध घेवून तो नष्ट केला. या कारवाईत पोलिसांनी दारूसाठ्यासह २ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पारडकर, पोलीस कर्मचारी लोढेकर, साखरे, शंभरकर, नाना कौरती, राऊत, मुसा पठान आदींनी केली.
विदेशी दारू भरलेली कार पकडली
वर्धा/प्रतिनिधी:
शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बोरगाव (मेघे) परिसरात नाकेबंदी करून विदेशी दारू भरलेली कार ताब्यात घेतली. इतकेच नव्हे तर दारूविक्रेता आनंद उर्फ बल्लू रामकृपाल दुबे व अधिक तौशीक शेख दोन्ही रा. इतवारा यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी एम. एच. २९ ए. एच. ०८२० क्रमांकाची कार व १८ बॉक्स विदेशी दारू असा एकूण ५ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार दत्तात्रय ठोंबरे, सचिन धुर्वे, सचिन इंगोले, दिनेश तुमाने, संजय पटेल, विशाल बंगाले, दिनेश राठोड यांनी केली.
दारूभरलेली कार उलटली; मद्यपींची झाली चांदी
गिरड/प्रतिनिधी:
कोरा मार्गावर रात्रीच्या सुमारास दारूची वाहतूक करणारी भरधाव कार अनियंत्रित होत उलटली. सदर घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. याच संधीचे सोने काही मद्यपींनी केले. त्यांनी हाती लागेल त्या ब्रॉन्डची दारू घेवून घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र ठाकूर यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. त्यांनी सदर दारू भरलेली एम. एच. ४० ए. सी ६१५३ क्रमांकाची कार व कारमधील दारूसाठा असा एकूण एकूण साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदर दारूसाठा चोरट्या मार्गाचा अवलंब करीत दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात आणल्या जात होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस कर्मचारी प्रशांत ठाकुर व अजय वानखेडे यांनी पंचनामा केला. सदर प्रकरणी पोलिसांनी दारूची वाहतूक करणाऱ्या विजय कैलास फुलझले रा. गोरक्षण वॉर्ड वर्धा यांना ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रशांत ठोंबरे, अजय वानखेडे, रवी घाटुरले, विवेक वाकडे आदींनी केली.